Friday 25 December 2015

निर्मळ प्रेमाचा सागर ‘येशू ख्रिस्त’

निर्मळ प्रेमाचा सागर ‘येशू ख्रिस्त’
येशु ख्रिस्त म्हणजे जगाला मिळालेली ‘मैत्री’ची एक देणच आहे. त्यांच्याइतकी अपार मैत्री कोणाकडे असेल, असे बहुदा वाटत नाही. शेवटच्या क्षणपर्यंतही ते बहुजनांच्या हितासाठी, बहुजणांच्या सुखासाठी मंगलमैत्री करत होते. ज्यांनी त्यांना सुळावर चढवले, अशा निर्दयी लोकांचेही भले व्हावे, त्यांना त्यांची चुक समजावी, यासाठी प्रार्थना करत होते. पण ज्यांच्यावर ‘एव्हिल’ आरुढ झालेला असतो, जो अकुशल कर्मांमध्ये इतका बुडाला असतो, की त्याला चांगल्या-वाईटाची जाणीवच उरत नाही. पण जे सदपुरुष आहेत, ते मात्र आपल्या दृढ निश्‍चयापासून कधीच स्वतःला दुर करत नाहीत. हेच येशुंनी केले.
येशु ख्रिस्तांचा आज जन्मदिवस. बॅथेलेहेम या शहरात त्यांचा जन्म झाला; आणि पृथ्वीतलावर जणू देवच अवतरला. म्हणतात ना, अंधारानंतर सुर्योदय होणे हे क्रमप्राप्तच असते. तसेच काहीसे येशुंबाबत झाले. त्यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा रोमन साम्राज्य बहारलेले होते. ऑगस्टस हा रोम साम्राज्याचा सम्राट होता. तो आपल्या क्रुरतेसाठी प्रसिध्द होता. येशूंच्या जन्मावेळी त्याने रोमन साम्राज्याची जनजगणा करण्याचे ठरवले होते आणि सर्वांना  बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदविण्याचे फर्मान सोडले होते. त्याच वेळी येशुंची आई मेरी गर्भवती होती. त्या आपल्या पतीसह बॅथेहेहमला आल्या होत्या; पण त्यांना निवार्‍यासाठी जागा मिळाली नाही आणि उघड्यावरच येशुंचा जन्म झाला. बहुदा एखाद्या महापुरुषाने उघड्यावर जन्म घेण्याची ही दुसरी वेळ होती. येशुंच्या पूर्वी गौतम बुध्दांचाही असाच नेपाळमधील लुंबनी वनात बुध्दांचा जन्म झाला होता. त्याचप्रमाणे एका गोठ्याशेजारी मेरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तसा येशूूंचा जन्म अशा ठिकाणी होईल, हे अपेक्षित नव्हते. मात्र रोमचा सम्राट ऑगस्टसने काढलेल्या फतव्यामुळे हे घडले. येशूंच्या जन्माप्रसंगी ऑगस्टसने आपल्या साम्राज्यातील नागरिकांची गणना करण्याचा आदेश पारित केला होता. त्यानुसार सर्वांवर  बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यामुळे मेरीही आपल्या पतीसह  बॅथेलेहेमला आली होती आणि एका गोठ्याशेजारी येशुंचा जन्म झाला. ‘मैत्रीच्या सागरा’ला जन्म देणारी स्त्री कोणी साधारण नसेल, नक्कीच चारित्र्यसंपन्न असावी, पण समाजात मेरीबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. बहुदा ते निर्माण केलेही असावेत. काही म्हणतात, त्यांचा विवाह झाला नव्हता, तर त्या कुमारी माता होत्या. तर काही ग्रथांमध्ये मेरीच्या पतीचाही उल्लेख आलेला आहे. येशुंच्या जन्माला आता २ हजार १५ वर्षे झाली आहेत, त्यामुळे मेरी नक्की विवाहित होत्या; की कुमारी माता होत्या? हा संशोेधनाचा जरी विषय असला, तरी त्याचे १०० टक्के बरोबर उत्तर मिळणे आता शक्य नाही. असे म्हणतात की, मुलांमध्ये आईवडीलांचे गुण येतात. आजकाल डॉक्टरही महिलांना गर्भवती अवस्थेत आनंदी राहण्याचे सल्ले देतात. जेणेकरुन त्यांची होणारी संतान ही सदृढ आणि निर्मळ मनाची निघावी, हा त्यामागचा हेतू असतो. जर हाच नियम येथे लागू केला, तर येशुंच्या आई किती चारित्र्यसंपन्न असतील, याचा आपण विचारही करु शकत नाही. कारण त्यांनी एका अशा पुत्राला जन्म दिला आहे, ज्याच्या अनुयायांची संख्या आज कोटींच्या घरात आहे.
येशुंच्या बाल्यावस्थेबाबत जास्त काही माहिती इतिहासात उपलब्ध नाही, एक मेंढपाळ म्हणून त्यांची ओळख होती. पण हा असा मेंढपाळ निघाला की, त्याने सर्वांना मैत्री करायला शिकवले, प्रेम द्यायला शिकवले आणि स्त्रीयांनाही सन्मानाने वागणूक द्या, याची शिकवण दिली. त्यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा उल्लेख येथे करावासा वाटतो. एकेवेळी गावातील सर्व मंडळी एका स्त्रीला बांधून दगडाने मारत होते. ग्रामस्थांच्या या कृत्याबाबत येशुंनी सर्वांना विचारले असता ग्रामस्थांनी, ‘ही स्त्री चरित्र्यहिन आहे, पापी आहे’, असे उत्तर दिले. आता येथे एक प्रश्‍न उपस्थित होतो, तो म्हणजे, जर का ती स्त्री खरोखरच चरित्र्यहिन असावी, तर मग काय तिच्यासोबत ज्या पुरुषांचे संबंध आले, ते धुतल्या तांदळासारखे होते का? मग फक्त स्त्रीयांनाच हा दोष का? असा प्रश्‍न पडतो आणि कदाचित हीच भावना येशूंच्या मनाला शिवली असावी. त्यांनीही वेळ न दवडता, ‘जो कोणी पाणी नसेल, ज्यांने कधीही आयुष्यात कोणतीही वाईट कृत्य केले नसेल, त्यांनीच या स्त्रीला दंड द्यावा’, येशूंच्या या वाक्याने लगेचच सर्वांच्याच हातातून दगडे खाली पडलीत. कोणाचेही दोष दाखवताना आपण निर्दोष आहोत का? याचे स्वतः आत्मपरिक्षण करण्याचा धडाच त्यांनी सर्वांना शिकवला. त्यांचा हा धडा आजही जसाच्या तसा लागु पडतो. कारण आजही प्रत्येकजण स्वतःमधील दोष दुर करण्यापेक्षा दुसर्‍यांच्या चुका शोधण्यात धन्यता मानतात. ख्रिचन बांधवांमध्ये वाईन आणि ब्रेडला अनन्यसाधारण महत्व आहे. येशुंनी शेवटचे जेवण म्हणून वाईन आणि ब्रेड ग्रहण केले होते, अशी धारणा आहे. त्यामुळे कोणत्याही मंगलप्रसंगी ख्रिचन बांधव वाईन आणि ब्रेडचा आस्वाद जरुर घेतात.  जेणेकरुन त्यांचे गुण आमच्यातही उतरलीत. त्यांची दया-मैत्रीची क्षमता आम्हालाही प्राप्त होईल, हा त्यामागचा सुप्त हेतू असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार पसरविण्याचे काम ‘त्या’ ४० अनुयायांनी केले. पण आज खरंच येशुंचा अनुयायी त्यांचे विचार अंगीकृत करतो का? हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आणि यंदाच्या ख्रिसमसला येशु ख्रिस्तांमधील असलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा या भावाना आपल्याही अंगी उतराव्यात, याचा संकल्प करावा, म्हणजे खर्‍या अर्थाने मेरी ख्रिसमस साजरा होईल.

Monday 21 December 2015

अमानुष अत्याचाराचा वचपा!

मानवाच्या उत्क्रांतीनंतर स्थलांतर हा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा राहिला आहे आणि भारत हा मानवी वस्ती वाढीसाठी पोषक भुखंड असल्यामुळे भारतात स्थालांतरासाठी अनेकांनी अनुकुलता दर्शवली. साधारण पाच हजार वर्षांपूर्वी युरेशियन येथील रानटी टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले. रानटी युरेशियन टोळ्या आणि येथील स्थानिक नागवंशी यांच्यात संघर्ष झाला आणि जो शेवटपर्यंत या युरेशियन लोकांचा विरोध करत होता, त्यांना या उर्मट लोकांनी शुद्र म्हणून हिनवून अस्पृश्यतेची वागणूक दिली. या अस्पृश्यतेचा उद्रेक झाल्यानंतर जन्म झाला एक अशा इतिहासाचा जो येथील तथाकथित इतिहासकारांनी नेहमीच अंधारात ठेवला.
भारताचा इतिहास हा तथाकथीत उच्च वर्णिय आणि अस्पश्य यांच्यामधील संघर्ष असून दुसरे काही नाही. पण हा संघर्ष कधीच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात उतरला नाही. जातीव्यवस्था ही भारताच्या विकासाला लागलेली मोठी किड आहे. गौतम बुध्द म्हणतात, दुःख संपवायचे असेल तर त्या दुःख उत्पन्न होणार्‍या कारणाच्या मुळाशी गेले पाहिजे. पण भारतात जातीव्यवस्था कशी फोफावली, याचा नेमका इतिहास सापडत नाही. किंबहुना कर्मदरिद्ˆय लोकांनी हा इतिहास लिहून ठेवण्याची मेहनत घेतली नाही. सहाजिकच हे काम तत्कालीन वेळी ज्यांना लिहण्या-वाचण्याचा हक्क होता, त्यांचे होते. पण आपले बिंग फुटेल, या भितीने यांनी इतिहास दडविण्याची खबरदारी नेमकी घेतली. सम्राट अशोकाचा नातू ब्रहदत्त यांच्या हत्येनंतर भारतात जातीवादाने आपली मुळे घट्ट रोवली. बौध्द धम्माचा र्‍हास करण्यासाठी भिक्खुंचे मुंडके कापणार्‍यास पारितोषिके देण्यात येत असत. शुद्रांकडून शिक्षणाचा हक्क काढून घेतला. त्यांना गावाच्या वेशीबाहेर हकलण्यात आले. गुलामीचे जिने जगण्यास भाग पाडले आणि हजारो वर्षांच्या गुलामीचा उद्रेक पेशवाईच्या शेवटाने झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महारा-मागांना मानाचा दर्जा मिळाला होता. महाराजांच्या मावळ्यांमध्ये धनगर, माग, महार, चांभार आदींचा जास्त भरणा होता. त्यात महाराजांकडे निष्ठावंत मुस्लीमही होते. त्यामुळे कोणी राजेंच्या नावावर हिंदुत्वाचा पुरस्कार करत असतील, तर त्यांनी इतिहासातून थोडे धडे घेतले पाहिजेत.
शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविण्यासाठी पोर्तुगिज, ब्रिटीश तडफडत होते; पण राजांच्या दुरदृष्टीमुळे त्यांना ते शक्य नव्हते. त्यांच्या मार्गातला मुख्य अडथळा महार होते. दरम्यान, महाराजांच्या संशयास्पद मृत्यूनंतर (हत्या) महाराष्ट्रात पेशवाईचा जन्म झाला. या पेशवाईला बळ देण्याचे कामही महारांनीच केलेे. प्राचीन काळी महारांना महा+अरी संबोधले जायचे. अरी म्हणजे शत्रू, शत्रुंचा संहार करण्यात तरबेज अशी महाअरी जमात होती. पण नंतर त्याचे अपभ्रश होऊन महार झाले. मुगल आणि ब्रिटीशांच्या फौजेला सीमेवर रोखण्याचे अतुलनीय कार्य महार पार पाडत होते. त्यामुळे तर पेशवाई अबाधित राहिली होती. खर्ड्याच्या लढ्यात सिदनाकच्या नेतृत्वाखाली महार सैनिकांनी पेशव्यांना विजय मिळवून दिला होता. पण या विजयानंतर माधवराव पेशव्याचा उन्मात इतका वाढला की त्याने रणांगनावरच महारांचा अपमान केला. जेव्हा आपले बस्तान बसले, तेव्हा शिंपल्यातील मोती काढून शिंपल्याला केराची टोपली दाखवावी, असे माधवराव पेशव्याने महारांना वेगळे केले. फक्त वेगळेच केल नाही महारांवर अमानुष अत्याचारही केला. मानुसकीला काळीमा; अशी क्रुर वागणूक दिली. पेशवाईने महारांवर किती अत्याचार केले आहेत, याची गणना केली तर संख्या कमी पडायची. पाच हजार वर्षांच्या काळात इतकी क्रुर वागणुक कोणी दिली नव्हती, तेवढी पेशवाईच्या काळात महारांना सहन करावी लागली.  हे पेशवे इतके निष्ठुर आणि क्रुर होते की, ते महारांच्या शिराचा बॉल करुन तलवारीला हॉकीची स्टीक समजून खेळत असत. शनिवारवाड्यात हा खेळ रंजकपणे पाहिलाही जात असे.  गळ्यात मडके, पाठीला झाडू, कंबरेला घंटी, हाता-पायात काळा दोरा ही महारांची ओळख. दुपारी १२ ते ३ या वेळेतच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा; अन्यथा कोणावर या महारांची सावली पडले, तर अनर्थ होई.  त्यांना गावाबाहेर गुरे-ढोरे ओढण्याची, संदेश वाहकाची कामे दिली जात. उष्ट्यांवर पोट भरावे, हा दंडकच!  आणि या अमानुष अत्याचाराचा बदला ‘त्या’ ५०० शुरवीर महारांनी घेतला. तो म्हणजे पेशवाई संपवून. सुमारे २५ हजार पेशवा सैनिकांना केवळ ५०० महार सैनिकांनी चारिमुंड्या चित केले.
(क्रमश)

Wednesday 16 December 2015

नाक दाबून बुक्का मारण्याची गरज

हातावर जळता कोळसा ठेवला, तर त्याचा परिणाम काय होईल, हे वेगळे सांगायला नको. हात जळल्याशिवाय राहणार नाही. याचीच पुनरावृत्ती भारत करत तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाबरोबर मैत्रीपुर्ण संबंध विकसित करण्याच्या मुद्याला आज दुजोरा दिला. पण आपल्या सैनिकांची तिरडी खांद्यावर घेऊन कोणी कसे बरे त्यांच्याशी मैत्री करु शकेल. का आपण इतिहासातून काहीच धडे घेत नाही?
मैत्री प्रस्तापित करणारा देश म्हणून जगाच्या पाठिवर भारताची ओळख आहे. म्हणून काय कोणीही यावं आणि टिकली मारुन जावं, इतकी बिकट अवस्था आमच्यावर आली आहे का? जेव्हा ‘चीन’ची ठेस लागली, तेव्हाच आपण शहाणे होणे गरजेचे होते. तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी चीन बरोबर शांततेचा ‘पंचशील’ करार केला होता. मात्र या कराराचे उल्लंघन करीत चीनच्या सैनिकांनी सीमेवर हल्लाबोल केला. चीनने अनपेक्षित लादलेल्या या युध्दाचा सामना भारताच्या सैनिकांना करावा लागला; आणि शिखस्तही खावी लागली. याच युध्दाची परिणीती म्हणून आजही आपला काही भु-प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. खरे म्हणजे तेव्हा भारत युध्दासाठी तयारच नव्हता. स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताला युध्दाचा सामना करावा लागला. १९४७ ते ४८ दरम्यान काश्मिर मुद्दावरुन भारत-पाक युध्द झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंतर्गत वादाची घडी व्यवस्थित करण्यात सरकार व्यस्थ असताना युध्दामुळे पुन्हा आर्थिक बोजा भारताला सहन करावा लागला. त्यानंतर १९६५, १९७१ च्या युध्दाची भर पडली. याचा विपरित परिणाम आपल्या पंचवार्षिक योजनांवरही झाला. एकंदर विकास खुंटला. आता वर्तमानातही आपण दहशतवादचा सामना करण्यात आपला वेळ खर्ची घालत आहोत.
पाकिस्तान हा आपला कट्टर शत्रु आहे, हे जगजाहीर आहे. पाकने जगाच्या पाठिवर आपली प्रतिमा अबाधीत राखण्यासाठी दहशतवादाला जन्म घातला.  मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट ही त्याची सुरुवात होती. कधी काळी दहशतवादाने फक्त भारताला पोखरले होते, तेव्हा इतर राष्ट्रांनी दहशतवाद बोकळू दिला, आणि आता तो त्यांच्याही उरावर बसू पाहतो आहे, याची जाणीव होताच आता जगभरातील देश दहशतवाद संपविण्यासाठी एकवटले आहेत. दहशतवादाचा उदय ज्या देशातून झाला त्या पाकलाही आता पेरलीली ‘बाभळ’ टोचत आहे. त्यामुळे आता भारताच्या दहशतवादावर चर्चा करण्याच्या प्रस्तावाला तिकडून हिरवा कंदिल मिळतोय. काही महिन्यांपूर्वी दहशतवादावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांकडील राष्ट्रीय सुरक्षा संलागार यांच्यात चर्चा होणार होती. मात्र काश्मिर मुद्दा उपस्थित करत पाकने या चर्चेत  खो घातला; परिणामी नियोजित चर्चेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. खतपाणी घातलेल्या पाकचा आदर्श घेत आता नवी दहशतवादी संघटना उदयास आली आहे. आयसिसने सिरीयात दहशत माजवली आहे. युरोपिय देशांवर आक्रमण होत आहे. अलीकडेच पॅरिसवर मुंबई २६/११ सारखा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर फ्रान्सने दहशवाद्याला ठेचून काढण्याची मोहिम आखली असून इसिसच्या तळांवर क्षेपणास्त्रेही डागली आहेत. आणि दुसरीकडे दहशतवाद मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढणार्‍या पाकनेही आता मान मुरडत चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली आहे. अलीकडेच उफा आणि पॅरिसमध्ये शरिफ आणि मोदींची चर्चाही झाली. पण आता ही चर्चा पुढे सुरु ठेवण्यासाठी युध्द नको, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेविषयी दुमत नाही; पण युध्द नको, हे जगजाहीर करण्याची काय गरज होती. तिकडे शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे, आणि इथे आम्ही गप आहोत. हा आपला दुबळेपणा की सहनशीलता? उलटपक्षी देशाच्या परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांनी खणखाऊन सांगायला पाहिजे होते की, जर कोणी आमच्या नादी लागेल तर त्याची खैर नाही. दहशतवाद हा कळीचा मुद्दा आहेच आणि त्याला संपविणसाठी परराष्ट्रांचे सहकार्य गरजेचे आहे. मग तो पाकिस्तानही का नसो, पण सारासार विचार केला तर आपल्याला धोका हा इसिसपेक्षा लष्कर-ए-तोयबाकडून जास्त आहे आणि लष्कर-ए-तोयबाला लहानाचे मोठे पाकने केले. त्यामुळे पाकसोबत मैत्रीची भाषा नको, तर नाक दाबून बुक्का मारण्याची गरज आहे.

Sunday 13 December 2015

‘कॉंग्रेस’ची कीड ‘कमळा’ला लागली

राज्यात पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई यासारखे ज्वलंत विषय असताना नको त्या मुद्यावर चर्चा घडवून देश चालविणारे आपला वेळ वाया घालवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा फक्त गदारोळामुळे चर्चेचा विषय बनली आहे. विरोधात राहायचे म्हणून विरोध, आणि विरोधीपक्षांच्या मुद्द्याला फारसे महत्व द्यायचे नाही, म्हणून दुर्लक्ष या दोन्ही गोष्टींशिवाय पार्लमेंटमध्ये काहीच होताना दिसत नाही. आज राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यावर मात्र ठोस निर्णय होताना दिसत नाहीत.
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचा विषय हा काही आजचा नाही, ७० च्या दशकापासून खरी त्यांची वाताहत होत आहे.  १९७५ दरम्यान राज्यात भीषण दुष्काळासारखी परिस्थिती होती. त्याचवेळी इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी जाहीर झाली, त्यामुळे जणू दुहेरी संकंटच शेतकर्‍यांवर ओढवले होते. तेव्हापासून शेतकर्‍यांमध्ये ‘कॉंग्रेस’ची कीड घुसली आहे आणि आज तिची लागण इतकी वाढली आहे की, शेतकरी बेजार झाला आहे. तत्कालीन वेळी राज्यात दुष्काळामुळे परदेशी धान्य आयात करण्याची वेळ आपल्यावर आली होती. अमेरिकेने मग हायबे्रड भारतात पाठवला. हायब्रेड म्हणजे ज्वारी सदृश्य धान्य होय. परंतु, या हायब्रेड सोबत कॉंग्रेसनेही आपली पाळेपुळे येथील जमिनीत रोवली. कॉंग्रेस अर्थात एक विषारी गवत. आज पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस गवत हे शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात अनियमित आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे बरेच नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षांत तर हे प्रमाण अधिकच वाढले आहे.
बळीराजाचे पोट हे शेतीवर अवलंबून आहे आणि भारतातील मेट्रो शहरे देखील शेतीमालावर जगत आहेत. पण इथे शेतीमध्येच काही उगवत नसेल, तर खायचे काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कडधान्यांसह डाळींचा भाव गगणाला भिडणे, हा त्याचाच एक भाग आहे. भविष्यातील धोका ओळखून जर यावर आधिक उपाययोजना केल्या असत्या तर ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली नसती. कॉंग्रेसच्या काळात शेतकर्‍यांना योग्य हामीभाव देण्याचा निर्णय होणे अपेक्षित होते. हीच मागणी तेव्हा विरोधामध्ये असलेल्या भाजपाने केली होती. आता भाजप सत्तेमध्ये आहे. एकेकाळी शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आता शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला बगल देताना दिसत आहेत.
हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. पण जेव्हा हे सत्तेत होते, तेव्हा त्यांना शेतकरी दिसले नाहीत का? बॉलीवूडचे दोन कलाकारांनी बीडसाख्या दुष्काळसदृष्य जिल्ह्यात शेतकर्‍यांना मदतीचा हात समोर केला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांनी ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी काम करण्यास सुरुवातही केली आहे. मग जर दोन कलाकार मिळून हे सर्व करु शकतात, मग ज्यांच्या हाती सत्तेची किल्ली आहे, ते का नाही हे सर्व साधू शकत? परंतु, हे सर्व करायला इच्छाशक्ती असवी लागते, बहुदा हे सत्ताधार्‍यांकडे नसावी, म्हणून आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. २००१ पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. जे यापूर्वीच्या सरकारला जमले नव्हते. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन संपेपर्यंत शेतकर्‍यांच्या पदरी काहीतरी पडेल, अशी आपण अपेक्षा बाळगूूया.

Wednesday 2 September 2015

धम्माचे सारथी ‘आगरी-कोळी’

कालपरवा भारतातील ‘धर्म’वारी जाहीर झाली आणि मनात अनेक प्रश्‍नांचे काहुल माजले,  कारण विषयच तसा आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या विविधतेत एकता शोधण्याचा प्रत्येकजण प्रयत्नात असतो. तरीही सरकारने धर्माची आकडेवारी जाहीर करुन एकमेकांत भेद निर्माण करण्याचा जो घाट घातला आहे, तो निदंनिय आहे. केंद्र सरकारने इतिहासाचा सारासार विचार करता संस्कृतीला अग्रस्थानी मानून आकडेवारी प्रसिध्द केली असती, तर कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंतच्या संस्कृतीत बरेच साम्य आढळले असते. भौगोलिक परिस्थिती वगळता आचार-विचाराच्या पध्दती सारख्या आढळल्या असत्या. कारण एकेकाळी या देशामधील नागरिक बुध्दांच्या विचारधारेनुसार जीवन व्यथीत करीत होता. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा विचार केला तर बुध्दांच्या शिकवणीचा प्रभाव आजही येथील स्थानिक आगरी-कोळी बांधवांच्या राहणीमानावरुन दिसून येतो.
आपल्याकडे जसे बॉलीवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टी, नाट्यक्षेत्र, संगीत क्षेत्र अशा विविध ‘कला’दालनांसोबतच एक बुध्द-भीम गीतांची वेगळी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीत नवनवीन कलाकार भरारी घेऊ पाहत आहेत. त्यापैकी एक कबीर शाक्य. या नवतरुण कलाकाराची गरुड झेप पाहता, भीम इंडस्ट्रीला सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. नुकतेच शाक्य यांचा आगरी-कोळी गीतांवर आधारित अल्बमच्या रेकॉर्डींगचा मुहुर्त पार पडला. विशेष म्हणजे ही गीते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक आणि गौतम बध्दांच्या विचारधारेवर आधारीत आहेत, त्यामुळे या अल्बमची उत्सूकता अधिकच वाढली आहे. 
भारतातून इसवी सन १२०० मध्ये बौध्द धम्म पूर्णतः लोप पावला. आता एखादा धर्म लोप पावतोच कसा? कारण तत्कालीन वेळी धर्म म्हणजे विशिष्ट जगण्याची पध्दत, असा त्याचा अर्थ होता. बौध्द धम्म लोप पावला म्हणजे जगण्याची पध्दत लोप पावली का? तर नाही, कारण आजही राज्यांमधील कोकण पट्ट्यात बौध्द जीवनपध्दती पहावयास मिळते. तिचे स्वरुप भले भिन्न आहे, मात्र नाळ मुळ बौध्द संस्कृतीचीच आहे, हे अभ्यासाअंती स्पष्ट होते. सम्राट अशोककालीन मुंबई, ठाणे आणि रागयड जिल्ह्यांना अपरांत म्हणून संबोधले जात होते. सम्राट अशोकाचे जम्बूद्वीपावर राज्य होते. अर्थात आजचा भारत, पाकिस्ताना आणि अफगाणिस्तानपर्यंत सम्राट अशोकाचे राज्य विस्तारले होते. बौध्द धम्माचा स्विकार केल्यानंतर धम्माचा प्रसार आणि प्रचारासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्याचाच एक भाग म्हणून धम्माच्या प्रसारासाठी त्यांनी आपल्या मुलांना आगरी-कोळी बांधवांच्याकडे सुपूर्द केले. हो महेंद्र आणि संघमित्रा श्रीलंकाला (तत्कालीन सिहलद्वीप) नालासोपारा येथील बंदरामार्फत गेले होते आणि त्यांना सिहलद्वीपपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आगरी कोळ्यांना दिली होती. म्हणजे बौध्द धम्माच्या प्रसार आणि प्रसारात आगरी-कोळी बांधवांचा किती मोठा वाटा आहे, हे यावरुन स्पष्ट होते आणि श्रीलंकेच्या इतिहासात तसा उल्लेखही आहे. सम्राट अशोकाचा आगरी-कोळी बांधवांवर एवढा विश्‍वास कसा? तर याचे उत्तर गौतम बुध्दांच्या चरित्रावरुन मिळते. गौतम बुध्दांची आई महामाया या कोळी समाजातून होत्या. त्यामुळे आजही ‘एक’वीराची आई आगरी-कोळी बांधवांसाठी श्रध्देचे स्थान आहे. एवढेच काय तर, कोकण पट्ट्यातील अनेक गावांची नावे बुध्द संस्कृतीशी निगडीत आहेत. उदाहरण द्यायचेच झाले तर अनेक गावे ही ‘पाली’ नावावर आहे. कळंबोलीजवळील रोड‘पाली’, ‘पाली’हिल, पाली, पोटल‘पाली’, बुद्रुक‘पाली’ अशी अनेक गावे पाली नावावरुन सापडतील. कारण पाली ही बौध्दकालीन प्रचलीत भाषा होती. गौतम बुध्दांनी आपले उपदेश पाली भाषेमध्ये सांगितले होते. त्यामुळे आजही कोकण पट्ट्यात अनेक गावांची नावे पाली नावावरुन पडली आहेत. फक्त कोकणच नव्हे, तर पश्‍चिम महाराष्टातही पाली नावाचे काही गावे आहेत. तांत्रिक दृष्ट्या बुध्द जोपर्यंत होते, तोपर्यंत धम्म हा फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागापुरता सीमित होता. मात्र याचा विस्तार सम्राट अशोकाने केला, तो सबंध जगभर आज पसरला आहे. कोकण पट्ट्यात बुध्द धम्मा विस्तारला होता, हे येथील आगरी-कोळी बांधवांच्या संस्कृतीतून स्पष्ट जाणवते. आजही येथे मातृसत्ताक पध्दत पहावयास मिळते. मच्छीमार बांधवाने आणलेल्या मासे विक्रीचा व्यवहार हा पूर्णतः महिलांच्या हाती आहे. आगरी-कोळी महिला अबला नाही. ती स्वतःचे रक्षण चांगल्या प्रकारे करु शकते. हे स्वातंत्र्य फक्त बौध्द संस्कृतीत सापडते.

Saturday 29 August 2015

कलाकारांनो, प्रबोधनाचा वारसा जपा!

लोकसंगीत आणि लोकनाट्य यांची निर्मितीच मुळी समाजप्रबोधनासाठी झाली होती. हेच आजचे कला सादर करणारे विसरले आहेत. कलेला फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून समोर मांडले जात आहे. ‘मांझी-द माऊटंन मॅन’ सारख्ये चित्रपट याला अपवाद आहेत. मात्र १०० पैकी ८० टक्के नाट्य आणि चित्रपट क्षेत्र हे व्यावसायिक झाले आहे. निखळ मनोरंजन करणारे झाले आहे. त्यामुळे समाजाला दिशा मिळेल असे पोवाडे आज गायले जात नाहीत. तेच रहाट गाडगे पुढे सरकत आहे. मग ते टेलिव्हीजन असो वा चित्रपट सृष्टी, सर्वत्र तेच पहावयास मिळत आहे.
संगीत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. पण आपल्या सांस्कृतिक ठेव्यातून हाच आत्मा बदलत चालल्याचे दिसत आहे. काळानुसार कलाक्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आणि कलाकारांमध्येही झाला; तो होणेही अपेक्षित होते. मात्र कलाकारांनी केलेला बदल मुळ गाभ्याला हात न लावता केला असतो तर जास्त सोईस्कर झाले असते. भारतात राजेशाही पध्दत होती, तेव्हापासून कलेची जोपासना होत आली आहे. फरक एवढाच की, तेव्हा कला फक्त संस्थानांच्या राजाच्या मनोरंजनासाठीच होती. प्रजेला दुःखाच्या खाईत लोटून स्वतः राजे मात्र भोगविलासात गुंतलेले असायचे. काही राजे याला अपवाद आहेत. सम्राट अशोकापासून ते राजा शिवछत्रपतींपर्यंत असे काही राजे होऊन गेले की त्यांनी प्रजेच्या हितासाठी निर्णय घेतले. मात्र ‘देवांनाप्रिय’, ‘प्रजापालक’ अशी उपमा ज्यांना दिली जाईल, असे राजे हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच होऊन गेले. जलाल अकबर जरी परकिय राजा होता, तरी त्यांनीही जनहितीचे अनेक निर्णय घेतलेले आहेत, असे इतिहासावरुन दिसते. बाकीचे मात्र भोगविलासात व्यस्थ असायचे. त्यांच्यासाठीच काय ती कला! नृत्यू, गायन आणि संगीत अशा माध्यमातून ही राजेमंडळी स्वतःचे मनोरंजन करीत असत. मात्र परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. या नियमाप्रमाणे कलाच्या पध्दतीत बदल झाला. काळ बदलला तसे कलेचे क्षेत्रही बदलले. जनतेच्या हितासाठी, जनजागृतीसाठी कला सादर होऊ लागली. शहिरांच्या माध्यमातून जनप्रबोधन होऊ लागले. शौर्याच्या गाथा शाहिरीच्या माध्यामतून रंगु लागल्या. रणांगणात तळपणारी तलवार अन् ढाल, डफावर पडणारा हात आणि डोळयासमोर उभा राहणारा शाहिर हे समीकरण एकरुप झाले. तर कीर्तन-अभंगातून आध्यात्मिक उर्जा मिळू लागली. जी कला फक्त राजे महाराजांच्या मनोरंजनाचे साधन होते, ती आता जनसामान्यात रुजू लागली. 
आज समाज प्रबोधन म्हटले की, भला मोठा मंच, संबंधित विषयात पारंगत वक्ते आणि त्यांचे भलेमोठे भाषण असे काहीसे चित्र डोळयासमोर उभे राहते. मात्र याच्या माध्यमातून कितीजणांचे प्रबोधन होते? हा संशोधानाचा मुद्दा आहे. मुळात एखादी गोष्ट जोपर्यंत मनाला भिडत नाही, बोध होत नाही आणि एखादा विचार मनाला भिडवणारी कला कलाकारांकडे अवगत असते. कलेच्या माध्यमातून तत्कालीन संत-महात्म्यांची लोकजागृती केल्याची अनेक दाखले आहेत. संत तुकाराम, संत कबीर, संत चोखोबो, संत गोरा कुंभार, संत रामदास स्वामी, संत ज्ञानेश्‍वर आदी संत मंडळींनी कलेच्या माध्यमातून लोकजागृती केली. एवढेच काय तर खुद्द गौतम बुध्दांनी देखील आपले उपदेश ‘गद्या’मध्ये न सांगता ‘पद्या’मध्ये सांगितले आहेत. अर्थात काव्य रुपात सांगितले आहेत. आजही गद्य पेक्षा पद्य जास्त लक्षात राहतात. शाळेकरी मुलांना याचा चांगलाच अनुभव आहे. शाळेमध्ये शिकविले जणारे धडे यापेक्षा कविता जास्त प्रमाणात रोचक वाटतात. किंबहूना कविता या थेट मनाला भिडतात. यामुळे विद्यार्थी धड्यापेक्षा कविता वाचनात जास्त रस दाखवितात. त्याच अनुषंगाने संत महात्म्यांनी लोकांची मानसिकता ओळखून गद्यामध्ये प्रवचन देण्याचे टाळले अन् पद्याच्या माध्यमातून आपली कीर्तने केली. आजच्या मानाने तेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते. त्यामुळे संबंधित क्षेत्रापुरतेच मर्यादित रहावे लागत असे. परिणामी मनोरंजनाच्या गोष्ठीही फारशा नव्हत्या. त्यामुळे कष्टकरी दिवसभर राबून सायंकाळी मंदिरात कीर्तन-भजनाच्या माध्यमातून मनःशांतीसाठी तल्लीन होत असे. तोच प्रकार शाहिरीचा झाला. शिवाजी महाराजांची कीर्ती गावोगावी पोवाड्याच्या माध्यमातून गायली जाऊ लागली. किंबहूना पोवाडे गायले गेल्यामुळे अनेक मावळे शिवाजी महाराजांच्या सोबतीला आले, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. शिवरायांची कीर्ती जनसामान्यापर्यंत पोहचविण्यात शाहिरांचा मोलाचा वाटा होता. शाहिराच्या शाहिरीमध्ये एवढी ताकद असते की, कोणीही अन्यायाविरोधात रणांगणावर पेटून उटेल. एवढे वजन पोवाड्यात असते. मात्र आज तसेच होताना दिसत नाही. पोवाडा हा जनहितासाठी गायला जातो. काळाची गरज ओळखून त्यामध्ये बदल घडवावे लागतात. आज पोवाडे गायले जातात ते फक्त शिवरायांच्या गोडव्याचे, मराठीच्या अभिमानाचे. पण समाजाला दिशा देता येईल, असे पोवाडे फारच कमी ऐकावयास मिळतात. लोकसंगीत, लोकनाट्य याची निर्मितीच मुळी समाजप्रबोधानासाठी झाली होती. हेच आजचे कला सादर करणारे विसरले आहेत. कलेला फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून समोर मांडले जाते. नाविण्य नावाची गोष्टच राहिली नाही. दहशतवादावरील चित्रपटांची चलती आहे, म्हणून हॉलिडे, बेबीपासून ते उद्या प्रदर्शित होणार्‍या फॅन्टममध्ये तेच विषय येत आहेत. मध्यतरी सलमानचा दबंग हा ऍक्शन मसाला चित्रपट फार गाजला होता. या दरम्यानचे चित्रपट पाहिले तर त्याच पठडीतील होते. एवढेच काय तर एखादा कॉमेडी चित्रपट चालला तर धडाधड कॉमेडी चित्रपट निघतात. म्हणजे एकाने करायचे, आणि दुसर्‍याने गिरवायचे अशी सध्या आपल्या बॉलीवूडने पध्दत अवलंबवली आहे. मल्टील्पेक्सच्या युगात नाट्यगृहाकडे प्रेक्षकांनी तर अक्षरशः पाठच फिरवली आहे आणि आजचा शाहिर देखील दर्जेदार कला सादर करण्यात कमी पडत आहे. दर्जेदार कला सादर करण्यापेक्षा भव्य-दिव्य रंगमंच उभा करण्यात अधिक रस आहे. हेच गायन क्षेत्रातही दिसत आहे. पूर्वीप्रमाणे नैसर्गिक आवाजापेक्षा सॉफ्टवेअरचाच आवाज प्लेबॅकच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळत आहे. पहाडी आवाजात गाणारे शाहिर देखील या सॉफ्टवेअरचा वापर करताना दिसतात आणि प्रेक्षक यालाच दाद देतात. संगीत काळी ५ चे असेल, तर गायकाने काळी चार मध्ये गायले तरी चालते. बाकीची कामे हा संगीत दिग्दर्शक करतो. त्यामुळे आजचे संगीतकार देखील जास्त मेहनत घेण्याची टाळाटाळ करतात आणि या सर्वांमध्ये प्रबोधन म्हणजे काय असते बुवा! अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. अभिनयापासून ते नृत्यू, गायन क्षेत्रातील कलाकारांनी नकली मुखवटे घातले आहेत. मुळ कला कुठेतरी हरवत चालली आहे.

Tuesday 25 August 2015

‘तू खड्ड्यातच रहा’, हीच सरकारची रणनीती

गेल्या काही दिवसांपासून कांद्याने रान पेटवले आहे आणि राज्य सरकार कांद्याचा भाव नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे, असा आव आणत आहे. पण आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला सरकारची निष्क्रीय धोरणेच जबाबदार आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यातही महाराष्ट्राची शेती सधन राष्ट्रांत गणती होती.  असे असूनही आपल्यावर परदेशी अन्नधान्याची गरज भासते, हे हस्यास्पद आणि तितकेच लाजीरवाणे आहे. आज नाईलाजास्तव पाकिस्तान आणि चीनमधून कांद्याची भारतात आयात होत आहे. भारताकडे क्षमता असूनही शत्रुराष्ट्रांची अर्थव्यवस्था भक्कम करण्यावर आपला जोर आहे.
एकेकाळी ‘सोन्याची चिडीया’ म्हणून आपल्याकडे पाहिले जात होते. ही सोन्याची चिमनी दुसरी तिसरी कोणी नसून येथील शेतीव्यवस्था होती. भारताची शेतीव्यवस्था इतकी भक्कम होती की, जगजेत्या अलेक्झेंडरलाही भारताची भूरळ पडली होती. नालंदा, तक्षशीला सारख्या विश्‍वविद्यापिठांमधून शेतीशास्त्रावर गहन शिकवण दिली जायची. जे २ हजार वर्षांपूर्वी करणे शक्य होते, ते आजच्या आधुनिक भारताला जमत नाही, हे आपल्या अपयशाचे महत्वाचे कारण आहे. शेतीव्यवस्थेला बळकटी देण्यात सरकार अपयशी ठरत आहे आणि सरकारच्या अपयशाचे खापर गोरगरीब जनतेवर फुटत आहे. आज विदर्भ, मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न महाराष्ट्रासमोर आहे. राजकारणी दुष्काळ सदृष्य भागाचा दौरा आणि शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर करण्यात व्यस्थ आहे. कालपरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीचा दौरा केला. आता यांनी दौरे केल्यामुळे  त्या शेतकर्‍यांचा प्रश्‍न मिटणार आहे का? समजा सरकारने शेतकर्‍यांचे १०० टक्के कर्ज माफ केले, तरी त्यांच्या उद्याच्या जेवणाची सोय आहे का? उत्तर आहे नाही. कारण पाऊसच नाही, तर पिकणार कुठून? आणि पिकणार नाही तर खाणार काय? हा मुळ मुद्दा ‘जैसे थे’च राहणार. सरकारची उपाययोजना म्हणजे ‘एखादा खड्ड्यात पडला आहे, पण त्याला खड्ड्यातून काढण्यापेक्षा तू खड्ड्यातच रहा, आम्ही तुला अन्नधान्य पुरवितो.’ म्हणजे भूक तर भागवायची मात्र ती कशी भागवता येईल,याचा मार्ग दाखवायचा नाही’, ही निती सध्या सरकारने अवलंबवली आहे. आपल्या शेतकर्‍यांच्या आणि कष्ठकरी कामगारांच्या घामाचा पैस परदेशी कंपन्यांच्या खिशात घालण्याचा घाट सुरु आहे. 
आज चीन, पाकिस्तान आणि इजिप्तमधून कांद्याची आयात केली जात आहे. पण दरवर्षी काद्यांचे भाव चढे का होतात? या प्रश्‍नाची सोडवणूक कधीच केली जात नाही. कांद्याच्या पिकाला लागणारे हवामान आपल्याकडे, जमीन आपल्याकडे, तिमाई हंगाम आपल्याकडे तरीही परदेशी कांद्याची चलती कुठपर्यंत सहन करायची. का नाही आम्ही आमच्या कांद्याच्या उत्पादनाची क्षमता वाढवू शकत. फक्त कांदाच नव्हे, तर इतरही अन्नधान्याच्या उत्पादनात का नाही वाढ होत? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नद्या जोडो संकल्पना मांडली होती. याला ५५ वर्षे उलटून गेले तरी ही संकल्पना प्रकल्पात का रुपांतरीत झाली नाही? जर झाली असती तर दुष्काळाची परिस्थिती आपल्यावर ओढवली नसती. आजच महाराष्ट्र सरकारने राज्यात सरासरी ५८ टक्के पाऊस झाल्याचे म्हटले आहे. मग उर्वरित पाऊस गेला कुठे? हा प्रश्‍न का नाही उपस्थित होत. आपल्याला निसर्गाचे संवर्धन करता येत नाही. शेतकर्‍यांची जमिनी कवडीमोल भावात भांडवलदारांच्या घशात घतली जात आहे. भुसंपादन विधेयकाच्या जोरावर विकासाच्या नावाखाली पाणलोटखालील जमिनी हडपल्या जात आहेत. मग असे असताना काय आपण विकसित होऊ शकतो?  

Sunday 23 August 2015

नाचता येईना अंगण वाकडे!

आम्हीही दहशतवादाचे बळी ठरत आहोत, अशी उसणी आरोळी ठोकणारा पाकिस्तान मात्र दहशतवाद संपविण्याच्या मुद्यापासून फारकत घेताना दिसत आहे. किंबहुना दहशतवाद हे पाकचेच पिल्लू असल्यामुळे स्वतःच्या लेकराला मारायचे कसे? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला असावा. गेल्या दोन दिवसांपासून न झालेली  भारत-पाक चर्चा चांगलीच गाजली. या चर्चेचा विषय होता दहशतवाद. मात्र आडमुठी भूमिका घेतलेल्या पाकला हा विषयच नको होता, म्हणून त्यांनी काल २२ ऑगस्टला होण्यार्‍या संवादाचा विसंवाद करुन टाकला.
भारत-पाकमधील होणारी चर्चा पाकिस्तानकडून रद्द करण्यात आली. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ही चर्चा तीन टप्प्यात होणार होती आणि चर्चेचा दहशतवाद हा एकच अजेंड होता. दोन देशांमध्ये एखादी चर्चा होत असेल तर त्याचे विषय, आशय हे अगोदरच ठरलेले असतात आणि या चर्चाचाही विषय ठरला होता. मग ऐनवेळी पाकिस्तानने हेकेकोरी करण्याचे कारणच ते काय? फुटीरवादी हुर्रियत नेत्यांचा हस्तक्षेप आणि कश्मीर मुद्द्यावर पण चर्चा व्हायला हवी, अशी पाकिस्तानची मागणी होती. तर भारताने आधी ठरविल्यानुसार चर्चा होईल, असे ठणकावले होते. जे व्हायचे ते झाले. चर्चा काही झाली नाही. कारण पाकिस्तानला ही चर्चा नकोच होती. फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा बिघडू नये, म्हणून त्यांनी या चर्चेला सकारात्मकता दाखविली होती. आता मुळ मुद्दा हा की, खरचं पाकिस्तानला चर्चा हवी होती का? जर दहशतवादासोबतच कश्मीर प्रश्‍नावरही चर्चा झाली असती तर काय बिघडले असते? असे जर घडले असते तर कदाचित मुळ मुद्दा दहशतवाद बाजुलाच राहिला असता. म्हणून भारताची भूमिका ही योग्य होती आणि आहे. 
‘उफा’ करारानुसार पाकिस्तान दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले होते. पण जर या विषयावर चर्चा झाली असती तर पाकच तोंडघशी पडला असता. म्हणूनच ही चर्चा नाकारण्यात आली असावी. यासाठी पार्श्‍वभूमी लक्षात घ्यायला हवी. गेल्या काही दिवसांपूूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर नावेद या अतिरेक्याला जीवंत पकडण्यात आले आहे. या दोन्हीही घटनांमध्ये पाकिस्तानचा सक्रिय सहभाग होता, याचे ठोस पुरावे भारताच्या गुप्तचर यंत्रणेकडे आहेत. तर हिंदूस्थान टाईम्सने प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार दाऊद पाकिस्तानमधील कराचीतच लपून बसला आहे. हे सर्व पुरावे भारताच्या ‘रॉं’कडे आहेत. हे सगळे इतक्यात घडले, याला काही आपण कर्मधर्मसंयोग म्हणता येणार नाही. दहशतवादी हल्ले हे पूर्वनियोजित असतात, त्याचप्रमाणे दाऊदचा पत्ता सापडणे ही देखील गुप्तचर यंत्रणेची एक खेळी होती. चर्चेसाठी ठरलेल्या एक दिवस अगोदर दाऊदचा पत्ता होती पुराव्यासह आणि फोटोसह भारताकडे होता. मग जर चर्चा झाली असती, तर हे पुरावे भारताने पकिस्तानसमोर नक्कीच ठेवले असते आणि मोस्ट वॉंटेड डॉन दाऊदच्या हस्तांतरणाची पहिली मागणी केली असती. त्यानंतर दहशवादी नावेद, पंजाब हल्ल्यातील सापडेलेले पुरावे, २६/११ दहतशवादी हल्ल्यातील भारताकडे पाकविरुध्द असलेले पुरावे. असे एक ना अनेक पुरावे भारताने पाकिस्तानसमोर पत्त्यांसारखे टाकले असते. तेव्हा मात्र पाकिस्तानची कोंडी झाली असती. या सर्वांतून पळ काढण्यासाठीच पाकिस्तानने चर्चेला तिलांजली देण्याचा मार्ग पत्कारला. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे जगाला पाकचा खरा चेहरा नक्कीच दिसला असेल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दहशवाद्यांना पोसायचे आणि ‘मी नाही त्यातली कडी लाव आतली’ असे बरळत राहायचे.

Saturday 22 August 2015

स्त्री मुक्तीचा आसुड ‘रविंद्रनाथ टागोर’

तुम्ही अशा व्यक्तीला काय म्हणाल ज्याने कॉलेजचा फक्त एकच दिवस अटेंड केला असेल? ज्याने कॉलेजची पायरी फक्त एकदाच चढली असेल?  ज्याने ऍकॅडमीक शिक्षणच पुर्ण केले नसेल? अशा विद्यार्थ्याला सर्वच ड्रॉप आऊट म्हणून संबोधतील. पण आपल्याला हे ऐकून आर्श्‍चय होईल की, याच ड्रॉप आऊट विद्यार्थ्याने भारतासाठी पहिला नोबेल पुरस्कार पटकविण्याची किमया केली. त्यांनी भारतासाठी राष्ट्रगीत लिहले. त्यांचे नाव आहे रविंद्रनाथ टागोर. नुकताच त्यांचा स्मृतीदिन साजरा झाला. त्यानिमित्त स्त्री शोषणावर त्यांनी केलेले भाष्य या लेखप्रपंचेतून मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
लिटरेचरमधून नोबेल पुरस्कार प्राप्त भारताचे ज्येष्ठ साहित्यिक रविंद्रनाथ टगोर यांनी लिहलेली कविता आज भारताचे राष्ट्रगीत म्हणून ओळखले जाते. एवढेच नव्हे तर बाग्लादेशानेही त्यांनी रचलेली कविता राष्ट्रगीत म्हणून स्विकार केली आहे. त्यांनी भारताला मोलाचा साहित्यिक खजाना दिला आहे. त्यांच्या साहित्यावर आधारित आज बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट झाले आहे. त्यांनी लिहलेली पात्रही तितकीच रोचक ठरली आहेत. ‘चारुशीला’ एक अशी विवाहित स्त्री जी स्वतःला नेहमी एकटी समजत असे. तिचे पती भुपती एक वृत्तपत्र चालविणारे व्यवसायिक. भुपती चारुच्या मनात चाललेली घालमेल ओळखतो आणि आपल्या पत्नीचा एकटेपणा दुर व्हावा, यासाठी आपला चुलत भाऊ आलमला तिच्यासोबत राहावयास सांगतो आणि कहानीत ट्विस्ट येतो. येथे आलमचे आणि चारुचे सुत जुळायला सुरुवात होते, आणि सर्व कथा बहरते. जर ही कथा आजच्या काळात रचली गेली असती तर काही वाटले नसते. कारण अशा धर्तीवर बॉलीवूडमध्ये चित्रपट येऊन गेले आहेत. किंबहूना हे चित्रपट रविंद्रनाथ टागोर यांच्याच कांदबरींवर आधारीत असावेत. परंतु, तत्कानील वेळी अशी कथा लिहणे हे फार धाडसाचे पाऊल होते. या कथेचा काळखंड १८७० चा आहे आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती आजच्या परिस्थितीपेक्षा फार भिन्न होती. 
रविंद्रनाथ टगोरांचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळात ७ मे १८६१ साली बंगला प्रांतातील कोलकत्ता या शहरात झाला. त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत अमुलाग्र बदल झाले आहेत. आजच्या सारखे स्वातंत्र्य तेव्हा नव्हते. अर्थात राजकिय स्वातंत्र्यासह सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यावरही निर्बंध होते. १८७० मध्ये सामाजिक स्वातंत्र्य नव्हते. वर्णव्यवस्थेने ते नाकारले होते. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य, शुद्र आणि अतिशुद्र अशा वर्णांमध्ये जाती विभागल्या होत्या आणि त्यात स्त्रीयांना मग ती कोणत्याही वर्णाची असो, तिला स्वातंत्र्य नव्हतेच. शिक्षणाचा अधिकार नव्हता. आपले मत प्रकट करण्याची मुभा नव्हती. अशावेळी स्त्रीयांनाही स्वतंत्र अस्तित्व आहे, याची जाणीव करुन देणार्‍या कथा त्यांनी रचल्या. 
एकटेपणाने व्याकूळ झालेली आणि प्रेम शोधणारी ‘चारुशीला’, लग्नानंतर विधवा झालेली ‘चोखेर बाली’, ऐन यौवनात मुक्त बागडणारी ‘गोरा’ अशा स्त्रियांच्या मध्यवर्ती भुमिका असणार्‍या कांदबर्‍या रचून रविंद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन रुढीपंरपरेवर आघात केला. त्यावेळी कदाचित त्यांनी रचलेल्या कांदबर्‍यांविरोधात तत्कालीन समाजाची घडी आहे तशीच राहू दे, अशा विचारसरणीच्या लोकांनी विरोध केला असावा. परंतु, टागोर या विरोधाला न जुमानता समाजातील स्त्री जीवनावर भाष्य करीतच राहिले. 
‘चोखेर बाली’ने अशा स्त्रीचे प्रतिनिधीत्व केले होते, ज्या विधवा होत्या. १९०० च्या दरम्यान रचलेली ही कांदबरी. त्यावेळी विधवांना पुर्नंविवाहाची बंदी होती. तपूर्वी राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे लॉर्ड कझिनने भारतात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा कायदेशीररित्या बंद केली होती. विधवांना सती जाणे म्हणजे एकप्रकारे तिची हत्याच होय. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यात आली; तरीही भारतात सती प्रथा ९५ टक्के सुरुच होती. कायदेशीररित्या सतीची चाल बंद जरी झाली असली तरी विधवांची दयनीय अवस्था ‘जैसे थे’ अवस्थेत होती. मुख्यत्वे कोलकत्यात सती प्रथा अधिक प्रमाणात रुढ झालेली म्हणून कायदेशीर मार्गान या अनिष्ट प्रथेला पूर्णविराम लावला असला तरी रुढीवाद्यांच्या मनात ही प्रथा कायमच होती. परंतु, कायद्याच्या धाकामुळे काहीजण ‘सती’ नको रे बाबा...! असे म्हणत. मात्र केशमुंडण, पुर्नंविवाह बंदी आणि इतर जाचक अटी तिच्यावर लादल्या जात होत्या. या प्रथेविरोधात रविंद्रनाथ टागोर यांची चोखेर बाली प्रहार करते. लग्नापूर्वी सर्व सुरुळीत असताना पती गेल्याचे दुःख कुठे पचविलेच होते; तर तिच्यावर अमानुष अत्याचार सुरु होतात. सुरुवातीला साधुसुधी भासणारी आपल्या या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सज्ज होते. या परिस्थितीला जबाबदार लोकांवर सुड उगवायचा, या विचाराने पेटून उठते. अशी या चोखेर बालीची कथा. अर्थात तिचा सुड हा कोण्या एका व्यक्तीविरोधात नसून या समाजव्यवस्थेवर होतो आणि आहे. कारण आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. समाजातील विधवांकडे आजही उपेक्षित घटक म्हणूनच पाहिले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, समतावादी लोकशाहीचा स्विकार केल्यानंतरही चोखेर बाली आजही कुठेतरी जिवंत आहे. अर्थात अशी परिस्थिती सगळीकडे जरी नसली तरी वास्तव आपण बदलू शकत नाही. जरी आजची स्त्री स्वतःला स्वतंत्र समजत असेल, तरीही ती मानसिक गुलामच आहे. हे तिच्या अलंकारावरुन दिसून येते. सातारा भागात एक म्हण प्रचलित आहे. किंबहुन ही म्हण इतर ठिकाणीही बोलली जात असावी. ‘बाईला चारी ठिकाणाहून बांधली असूनही आगाव आहे’, याचा अर्थ असा की, गळ्यात मंगळसुत्र, हातात बांगड्या, पायात पैजण आणि बोटामध्ये जोडवी. हे सर्व दागिणे आजच्या स्त्रीला अलंकार भासत असतील, मात्र हे दागिने नसून स्त्री गुलामगिरीची निशानी आहे. 

संहिता नसलेल्या भरकटलेल्या मालिका

भारत हा कलाप्रेमींचा देश आहे. या देशात अनेक अजरामर कलाकृतींचा उदय झाला आहे. हॉलिवूडलाही लाजवेल अशी कलाकृती आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत. ‘मुगल-ए-आझम’पासून ‘शोले’ आणि ‘डिडिएलजे’ सारखे चित्रपट बॉलिवूडमधील माईलस्टोन ठरले आहेत. लोकनाट्यापासून सुरु झालेला हा सिनेसृष्टीचा प्रवास आता मालिकांपर्यंत पोहचला आहे. पथनाट्य, लोकनाट्य, व्यवसायिक रंगभूमीवर अजरामर कथानकांद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची किमया आपल्या कलाकारांनी साधली. आज मालिकाही प्रेक्षकांना अक्षरक्षा जून ‘खिळे’ ठोकले आहेत, अशाप्रकारे जाग्यावरुन हलू देत नाही, मात्र मालिकाकारांनी नाट्य‘संहिते’ला तिलांजली दिल्याचे प्रकर्षाने जाणवते.
कोणतीही कथा रचताना मग ती सिनेमातील असो, नाटकातील असो वा मालिकेसाठी असो, त्याची एक संहिता ठरलेली असते. कथेचा प्लॉट, त्यामधील पात्रांचा वावर, मध्यंतर आणि शेवट असे या कथानकाचे स्वरुप असते. मात्र मालिका या संहितेला अपवाद ठरत आहेत. आपण चित्रपटांचे अनेक भाग आल्याचे पाहिले असेल. बॉलिवूडमध्ये हे प्रकार फार कमी पहावयास मिळतात, मात्र हॉलिवूडमध्ये एका चित्रपटाचे दहा-दहा भाग झळकले आहेत. प्रत्येक भागाचा आशय वेगळा, विषय वेगळा, तरीही तो पूर्वीच्या भागाशी फारकत घेणारा मात्र नसतो. हे बॉलिवूडला कधीही जमले नाही. असो.. विषय आहे तो मालिकेंचा. आपल्याकडील मालिकांना तर तारतम्याचे भानच नसते. जेव्हा एकता कपुरने टीव्ही सिरियल विश्‍वास निर्माता म्हणून पाय ठेवले, तेव्हा खर्‍या अथाने ही अधोगती सुरु झाली. (आर्थिक दृष्ट्या नव्हे तर कथानकाच्या दृष्ट्या). मग त्या सासू-सुनांच्या मालिका असो, अथवा हॉरर मालिका असो, प्रत्येकाने आपल्या मुळ गाभ्यापासून फारकत घेतल्याचे दिसते. एखादे पात्र मरते काय, नि पुन्हा जिवंत होते काय, अशा कित्येक गोष्टी आहेत, ज्या मालिकांबाबत बोलता येतील. हे सर्व प्रकार झाले एका काल्पनीक कथांबाबत. मात्र ऐतिहासिक मालिकांनाही या निर्मात्यांनी सोडले नाही. त्यांनीही आपल्या पध्दतीने ऐतिहासिक मालिका बनविण्याचा घाट घातला आहे. सम्राट अशोक, बुध्द, जोधा-अकबर, रझिया सुलतान यांनी इतिहास गाजवला आहे. यांच्या कथानकावर आधारित मालिका बनविताना त्यांच्या ऐतिहासिक महत्वाचे भान ठेवून त्या बनवायला पाहिजे होत्या. मात्र तसे घडले नाही. 
सध्या सम्राट अशोकाच्या जीवनावर आधारित मालिका कलर्स टीव्हीवर दाखवली जात आहे. मात्र या मालिकेतील कथानक मुळ अशोकाच्या विपरित आहे. सम्राट अशोकाचा आर्य चाणक्या यांच्याशी संबंध आला होता, असा एकही ऐतिहासिक दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. तरीही मालिकेमध्ये आर्य चाणक्य आणि सम्राट अशोकाचा मेळ घातला आहे. त्यात नाट्यमय पध्दतीने घुसडविलेले ‘खुरासन’, ‘हेलना’, ‘जस्टीन’ ही पात्रे काल्पनिक आहेत. तर राजा बिंदूसारची राणी नूर हिचे अनैतिक संबंधातून झालेला ‘सियामक’ हा मुलगाही आहे. सम्राट अशोकाचा जन्म हा राजमहलात झाला आहे, असे इतिहास सांगतो. मात्र या मालिकेत विपरितच दाखविले आहे आणि हेच प्रकार ‘जोधा अकबर’, रझिया सुलताना या मालिकांबरोबर घडले आहेत. सो
नी टिव्हीवरील ‘महाराणा प्रताप’ही तोच कित्ता गिरवत आहे. आणि हे मालिकावालेही ‘यह धाराविक इस-इस ऐतिहासीक पात्र से प्रेरित है, इसका किसी भी जीवित या मृत व्यक्तीसे कोई संबंध नही है’ असे म्हणून मोकळे होतात. म्हणजे यांनी ऐतिहासिक पात्राला घेऊन काहीही खेळखंडोबा मांडायचा आणि तो आम्ही मुग गिळून पहायचा. ही खर्‍या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे.

Monday 17 August 2015

स्वातंत्र्य की सत्ता हस्तांतरण?

स्वातंत्र्य की सत्ता हस्तांतरण?
१५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आपला देश ब्रिटीशांच्या जाचातून मुक्त झाला, असेच मी शाळेत शिकलो, आणि इतर विद्यार्थीही याच इतिहासाची पुनरावृत्ती करत आहेत. मात्र खरेच भारताला १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले आहे की? हा संशोधनाचा विषय आहे. दोन दिवसांपूर्वीच आपला मानन्यात आलेला स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात आला, परंतु, हे स्वातंत्र्य होते की सत्ता हस्तांतरण? या प्रश्‍नाने गेली दोन दिवस मनामध्ये थैमान घातले आहे.
ब्रिटीशांचे फक्त भारतावरच राज्य नव्हते तर अर्धा जग ब्रिटीशांच्या आधीन होता. एशियासह यूरोपमधील देशांवरही ब्रिटीशांचे अधिपत्य होते. असे म्हटले जाते की, ब्रिटीशांच्या साम्राज्यात सुर्य कधी अस्त पावत नव्हता. म्हणजे जेथे सुर्योदय होत असे, तेथे ब्रिटीशांचे राज्य होते. मग एवढ्या विशाल साम्राज्याचे अधिपती सहजासहजी भारताला कसे सोडतील? हा प्रश्‍न सद्सद्विवेक बुध्दी असलेल्या नागरिकांना पडणार नाही तर नवलच! त्यासाठी १९४७ पूर्वीची पार्श्‍वभूमीचा अभ्यास असणे गरजेचे आहे. भारत स्वतंत्र व्हावा, यासाठी अनेक स्तरांवर लढा सुरु होता. क्रांतीकारकांचा बंड, समान हक्कासाठी न्यायपध्दतीने लढणारे राष्ट्रप्रेमी आणि यामध्ये ब्रिटीशांकडून जगण्याचा हक्क मागणारे समाजसुधार, अशा विविध स्तरावर स्वातंत्र्याचा लढा सुरु होता. प्रत्येकाच्या मागण्या वेगवेगळ्या होत्या. महात्मा ज्योतीराव फुलेंपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरपर्यंत निर्माण झालेल्या समाजसुधारकाच्या फळी देशातील पददलित, उपेक्षित घटकाला जातीवादातून मुक्तता मिळण्यासाठी झटली. तर बाळगंगाधर टिळकांपासून ते गांधी आणि नेहरुंनी सत्तेच्या हक्कासह, देशासाठी आम्हालाही स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे, यासाठी लढा दिला. दरम्यान, १९१४ ते १९१८ पर्यंत पहिले महायुध्द झाले. या पहिल्या महायुध्दातच दुसर्‍या महायुध्दाची बीजे पेरली गेली होती. खवळलेल्या जर्मनीमुळे दुसरे महायुध्द छेडले गेले आणि भारताच्या स्वातंत्र्याची दारे मोकळी झाली. दुसर्‍या महायुध्दात ब्रिटीशांचाही सहभाग होता. ब्रिटीश ज्या पक्षाकडून या युध्दामध्ये उतरले होते, त्या पक्षाचा विजय होतो. मात्र या युध्दामुळे ब्रिटीशांची फार वित्तहानी झाली होती. आर्थिक दृष्ट्या ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, ‘‘ब्रिटीशांना दुसर्‍या महायुध्दामुळे आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांना भारतात राहून देश चालविणे कठीन गेले असते’’.
ब्रिटीशांची आर्थिक परिस्थिती बिघाडल्यामुळे भारतातून पाय काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तत्पूर्वी भारताकडे सत्ता सुपूर्द करणे क्रमप्रात्प होते. त्यामुळे १९४५ नंतर ब्रिटीशांनी भारतीय घटना समिती स्थापन करण्याची कार्यवाही सुरु केली. निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर देशाच्या सीमा ठरविण्यात आल्या. गव्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९३५ नुसार देशाची फाळणी झाली. पाकिस्तान आणि भारत दोन वेगवेगळे देश झाले. भारताची सत्ता हस्तांतरण करण्यासाठीच्या करारावर लॉर्ड माऊंट बेटन, एडवीन बेटन आणि जवाहरलाल नेहरु यांच्या सह्या झाल्या. भारताचे संविधान बनविण्याची जबाबदारी घटना समिती गठीत करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमानंतर २६ नोव्हेबर १९४९ मध्ये संसदेत संविधान सुपूर्द केले. ते २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल दोन वर्षांनतर भारतीय कायदे-नियम लागू झाले. मग दोन वर्षे भारताचा कारभार कोणत्या घटनेनुसार सरु होता? यासाठी ब्रिटीशांनी स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश गव्हर्नरची नियुक्ती केली होती. म्हणजे स्वतंत्र होऊनही ब्रिटीश गर्व्हनरच्या अधिपत्याखाली भारत होता. मग जे १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री १२ वा. झाले ते स्वातंत्र्य नव्हे सत्ता हस्तांतरण तर नव्हे ना? हा संशोधनाचा विषय आहे.  Transfer of Power Agreement  काय आहे? Dominion State म्हणजे काय? एक देश  "One of the self-governing nations in the British Commonwealth" आणि दुसरा देश "Dominance or power through legal authority " याला काय म्हणायंच? या सर्व प्रश्‍नांची पुर्नंलोकन करणे ही काळाची गरज आहे.

Saturday 15 August 2015

आमची विकासाची गाडी पुढे सरकतच नाही!

आमची विकासाची गाडी पुढे सरकतच नाही!
जनतेची कामे सुलभ होण्याऐवजी त्यांना विलंब कसा करता येईल, याची दक्षतेने काळजी घेण्यात कर्तव्यदक्ष असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांपासून ते देशाला पोखरुन काढणार्‍या नेत्यांपासून देशाला स्वातंत्र्य कधी मिळणार? हा महत्वाचा प्रश्‍न आज प्रत्येक भारतीयांसमोर उभा राहिला आहे. आज भारत ६९ व्या स्वातंत्र्यात पदार्पण करत असताना भारतासमोरील मुलभूत प्रश्‍न आजही ‘जैसे थे’अवस्थेत आहे. जे ब्रिटीशकाळी होत होते; तशीच परिस्थिती आजही आहे. फरक एवढाच आहे की तेव्हाचे लुटणारे परकिय होते आणि आताचे स्वकीय आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न निकाली लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र कॉंग्रेस सरकारने नागरिकांचा अपेक्षाभंग केला. कॉंग्रेसच का, कारण की देशाच्या स्वातंत्र्यापासून दिर्घकाळ सत्तेत राहिला पक्ष म्हणून कॉंग्रेसने देशाचा विकास साधणे क्रमप्राप्त होते. परंतु, तसे झाले नाही. आजही आपण विकासनशील असताना स्वतःला विकसित म्हणण्याचा घाट घालत आहेात. पात्रता असूनही विकसित राष्ट्र म्हणून भारताने आपली ओळख निर्माण केली नाही, ही या देशाची दुर्देवी बाब आहे. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्या मिळाले आणि १९५० मध्ये देशाचे संविधान लागू झाल्यानंतर कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी देशाला विकासाच्या पातळीवर नेण्यासाठी पंचवार्षीक योजना आखल्या. सुरुवातीच्या योजना सफलही ठरल्या; परंतु, चुकीच्या परराष्ट्रीय धोरणांचा फटका सबंध भारतीयांना भोगावा लागला. तत्कालीन परराष्ट्रमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परराष्ट्रधोरण ठरविताना शेजारील देशांबाबतच्या संबंधावर विचारपुर्वक गाईडलाईन दिल्या होत्या. चीनशी मैत्री करार घातक ठरू शकतो, असे म्हटले होते. मात्र नेहरुंनी याकडे दुर्लक्ष केले आणि चीनने भाई भाई म्हणत पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून देशाची आर्थिक घडी बिघडती ती सावरता सावरत सरकार जेरीस आले. १९४७ चे पाक युध्द, १९६० चे चीन युध्द, १९७५ चे पाक युध्द यामुळे भारताच्या अर्थधोरणावर मोठा आघात झाला. त्यामुळे १९७५ नंतरच्या पंचवार्षीय योजना प्रभावीपणे राबवित्या आल्या नाहीत.
इंदिरा गांधीच्या कार्यकाळात आणीबाणी जाहीर झाली; राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यानच्या काळात दुष्काळ पडला आणि शेतीप्रधान देशात अमेरिकेकडून धान्य आयात करण्याची वेळ आली. अमेरिकेकडून फक्त धान्यच नाही तर ‘कॉंग्रेस’ही मिळाले. अर्थात कॉंग्रेस नावाच्या गवतामुळे जमीन नापिक होऊ लागली आणि जमिनीचा कस निघून गेला. आजही शेतकर्‍याची उत्पादन कॉंग्रेस गवतामुळे कमी होताना दिसून येते. कॉंग्रेस गवत निष्फळ करण्यासाठी विविध रसायनांचा वापर करावा लागतो. अर्थात हे रसायने परकिय असतात, आणि त्याचा रेव्हेन्यू हा परिकीयांना मिळातो. अफाट मनुष्यबळ, शेतीसाठी पुरक वातावरण, पर्यांप्त सुपीक जमिन असे सर्व काही असतानाही देशाला आज अन्नधान्याची कमतरता भासत आहे, हे केवळ राजकारण्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे. एकीकडे धो-धो पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ यालाही राजकारणीच जबाबदार आहे. १९५० मध्ये नद्या जोडो प्रकल्पाची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. ती आजही अस्तित्वात आलेली नाही. जर देशातील नद्या एकमेकांना जोडल्या असत्या, तर आता चित्र वेगळे असते. एकंदर विकास म्हणजे काय असतो? मोठमोठाल्या इमारती, परकीय कंपन्यांचे बस्तान, नवनवीन उद्योग याला मी विकास म्हणणार नाही. आपल्याकडे किती अन्नसाठा उपलब्ध आहे, आणि जनतेला ते मुबलक प्रमाणात मिळत आहे, अशी परिस्थिती असेल, तर भारत विकसित आहे, असे म्हटले तर वावगे ठरू शकणार नाही. आपल्याकडे दरवर्षी पावसाळ्यात कांद्याचे भाव गगणाला भिडतात, उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. देशातील एक तृतीअंश जनतेला मुलभूत सोयीसुविधा मिळत नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही काही आदीवासी पाड्यांमध्ये वीज उपलब्ध झालेली नाही. तर ग्रामीण भागात १६ तास भारनियमन, याला काय तुम्ही विकास म्हणणार. आणि दर पाच वर्षांनी निवडणुकीत हेच मुद्दे उपस्थित करुन निवडणुक लढविणारे राजकारणी पुढील पाच वर्षांनंतरही याच मुद्यांवर जोर देणार. एकाकडून दुसर्‍याकडे सत्ता जातेय, ऐ रे माझ्या मागल्यासारखी परिस्थिती, मात्र सर्वसामान्य उपेक्षितच. ही परिस्थिीत बदलणार कधी? १९५० मध्ये अन्न-वस्त्र आणि निवारा यावर निवडणुकी झाली, १९७०-७५ च्या दरम्यान गरीबी हटाओ, मुद्दा होता. १९८०-८५ मध्ये रोजगार, १९९०-९५ मध्ये उद्योगधंद्यांसह रोजगार, शिक्षण आणि मागील १५ वर्षांमध्ये रस्ते, वीज, पाणी आदी मुद्दे घेऊन निवडणुक लढवली जात आहे. मात्र जो प्रश्‍न १९५० मध्ये होता, जो प्रश्‍न १९७० मध्ये होता आणि जो प्रश्‍न आज आहे, तो सुटलाच नाही की हो! आमची विकासाची गाडी आहे तिथेच आहे, ती पुढे सरकतच नाही.

अशी झाली फाळणी...!!!

आजच्या दिवशी १९४७ रोजी अर्थात १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण या स्वातंत्र्यानंतर काय मिळाले, तर फाळणी. आज भारतातील कानाकोपर्‍यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना स्वातंत्र्यामुळे झालेल्या फाळणीचाही विचार करावयास वाटतो. स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीमुळे लाखोंच्या संख्येने लोक बेघर झाली. महिनोंमहिने स्थलांतर सुरुच होते. काही भुकबळीने गेले तर कित्येकांच्या हिंदू-मुस्लीम दंगलीत मारले गेले. मोहनदास करमचंद गांधी, बॅ. जीना आणि इतर नेत्यांमध्ये झालेल्या खलबतीचा परिणाम म्हणजे फाळणी.
सम्राट अशोकाच्या काळात एकसंघ असलेला अखंड भारत सम्राट अशोकाच्या तिसर्‍या पिढीनंतर विखुरला. त्यानंतरच्या काळात छोट्या-मोठ्या राष्ट्रांमध्ये विभागलेल्या भारताला पुन्हा जलाल अकबरने एकसंघ केले. अकबरची आताच्या पाकिस्तानापासून ते दिल्लीपर्यंत सत्ता होती. भारताची राजधानी दिल्लीचा तख्त कोणत्याही राजाला जिंकता आला नाही, तो फक्त ब्रिटीशांनी काबीज केला आणि भारतात विभाजनाची बीजे रोवण्यास सुरुवात झाली. याच अर्थ असा होत नाही की, भारतात समानता होती. बौध्द धर्माच्या र्‍हासानंतर भारताला असमानतेने पोसले होते. त्यामुळे परकियांना राज्य प्रस्तापित करण्यात सुकर झाले.

* भारतावर ब्रिटीशांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सुमारे १०० वर्षांनंतर म्हणजे १९०० भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली. लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत १९०५ मध्ये बंगालची फाळणी झाली. त्यानुसार पूर्व बंगाल आणि पश्‍चिम बंगालची निर्मिती झाली. खरेतर ही फाळणी भारतीयांना मान्यच नव्हती. बंगालच्या फाळणीला बाळ गंगाधर टिळक, लाल बहादुर शास्त्री आणि लाला लाजपत राय यांचा विरोध कायम होता. इग्लंड येथे १९३३ साली झालेल्या गोलमेज परिषदेत मुस्लीम नेत्यांनी स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी केली.

* ऍड. रेहमत अली यांनी पाकिस्तान आणि हिंदूस्तान अशी दोन राष्ट्रे झाली पाहिजेत, अशी मागणी केली.  राज्यसंघ स्थापन करण्यासाठी ब्रिटीशांनी गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९३५ संमत केला. या कायद्यान्वये मुस्लीम लीगने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राच्या मागणीचा जोर धरला.

*स्वतंत्र राष्ट्रासाठी ऑल इंडिया मुस्लीम लीगची २७ ऑगस्ट, १७ आणि १८ सप्टेंेबर, २२ ऑक्टोबर १९३९ मध्ये बैठक पार पडली. यामध्ये मुस्लीम लीगने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी जोर लावून धरली. फेबु्रवारी १९४० मध्ये झालेल्या परिषदेतही मुस्लीम लीग स्वतंत्र मुस्लीम राष्ट्रासाठी ठाम राहिली.

* हिंदू महासभेचा दोन राष्ट्र असावीत, याला विरोध होता; तर मुस्लीम लीग दोन स्वतंत्र राष्ट्रांसह मुस्लीम स्टेटच्या मागणीसाठी ठाम होता. बॅरिस्टर जीना पाकिस्तानलही स्वतंत्र मिळावे, तेही भारताच्या अगोदर यासाठी प्रयत्नशील होते.

* ऍड. रेहमत अली, सर मोहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्रांच्या सीमा तयार केल्या. त्यांच्या सीमांकनानुसार बलुचिस्थान, मुस्लीम बहुल पंजाबचा काही भाग, बंगालचा काही भाग अशा स्वरुपात पाकिस्तान आणि इतर पाच इस्लामीक स्टेटची आखली केली.

* दरम्यान,  मोहनदास करमचंद गांधी कॉंग्रेसमध्ये येण्यापूर्वी भारतात दोन संघटना होत्या. एक म्हणजे लिबरल पार्टी आणि दुसरा गट क्रांतीकारकांचा. या दोन्ही संघटनामध्ये सामील असीम राष्ट्रप्रेम आणि बलीदान देण्याची अट होती. लिबरल पार्टी विद्वानांचा भरणा होता. ते शासकीय पध्दतीने स्वातंत्र्यासाठी झटत होते. तर क्रांतीकारी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रयत्नात होते.

* अशावेळी गांधी कॉंग्रेसमध्ये आली आणि त्यांनी लढ्याची दिशा बदलली. प्रांतवार आणि भाषावर पध्दतीने कॉंग्रेसची मुख्यालये स्थापन केली.

* भारताची फाळणीचा आधारही प्रांत, धर्म आणि भाषा होता. त्यामुळे मुस्लीम बहुल लोकसख्या असलेला प्रांत वेगळा करण्याची मागणी मुस्लीम लीगने लावून धरली. सरतेशेवटी देशाची फाळणी झाली.

* या फाळणीचे परिणाम आजही दोन्ही राष्ट्रांना भोगावे लागत आहे.  

Monday 3 August 2015

दुःखमुक्तीचा पाया रचणारे बुध्द


बुध्द धम्म जितका व्यापक, गहन आणि खोल आहे; तितकाच तो सुटसुटीत आणि स्पष्ट आहे. त्यामुळेच आज जगभरातील लोकांनी हा धम्म स्विकारला आहे. धम्म स्विकारण्याचे दुसरे कारण सांगायचे झालेच तर ते या धम्माची शुध्दता! बौध्द धम्म सर्वांगाणी शुध्द आणि परिपूर्ण आहे. बौध्द धर्माची इतर कोणत्याही धर्माशी तुलना करणे म्हणजे हास्यास्पद ठरेल. सर्व धर्म संस्थापक स्वतःला इश्‍वर, इश्‍वराचा पुत्र, इश्‍वराचा दुत म्हणून स्वतःची ओळख करुन देतात; आणि आम्ही जे सांगतो तीच पूर्व दिशा, असे सांगून माणसाची सद्सद्विवेक बुध्दीचा वापर करण्यावरच टाळे जावायला सांगतात. उलटपक्षी बौध्द धम्म असा कोणताच दावा करत नाही.
सिध्दार्थ गौतम बुध्द यांचा जन्म कोण्या दिव्यशक्तीच्या जोरावर नव्हे तर सर्वसाधारण निसर्ग नियमानुसार राणी महामाया यांच्या पोटी झाला होता; तोही एका जंगलात. हजारों सैनिक आणि दासी यांच्या साक्षीने. तद्नंतर सर्व शिक्षण एक राजपूत्र म्हणून पूर्ण केले. शाक्य संघाचे सर्व अटीशर्तींसह सभासदत्व पत्कारले, संघासाठी कार्यही केले. दरम्यानच्या काळात कोलीय आणि शाक्य या दोन गणराज्यामधून वाहणार्‍या रोहणी नदीच्या पाणी वाटपावरुन दोन गटात वाद झाला. हा वाद थेट दोन्ही राजदरबारी गेला आणि पहिले पाणी कोण घेणार? या मुद्द्यावरुन शीतयुध्दासारखी परिस्थिती निर्माण झाली. दोन्हीकडील कोणीही कमीपणा घेण्यासाठी तयार नव्हते. अखेर शाक्य संघ सैन्यबलाने मजबुत असल्यामुळे त्यांनी युध्दाचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाला सिध्दार्थने विरोध दर्शविला. शाक्य संघाचा युध्दाचा निर्णय पटला नाही, संघाच्या निर्णयाविरुध्द गेल्यामुळे सिध्दार्थला दंड देण्याचा निर्णय झाला आणि त्यांनी देशत्यागाची शिक्षा कबूल केली. (आजही ग्रामीण भागात वाळीत टाकण्याची प्रथा आहे, मात्र ही प्रथा संविधानाने नाकारली आहे)
बुध्दांचा प्रवास खडतर होता. सिध्दार्थ गौतमाने जेव्हा गृहत्याग केला, त्यावेळी तो एक राजपूत्र होता. सर्व सुखसोयींमध्ये वाढलेला राजपुत्र एका निर्जन जंगलात सन्यासाचा वेश धारण करुन साधनामध्ये तपू लागला. कोणताही धर्म आपल्या धर्मसंस्थापकाला अथक परिश्रमाच्या कसोटीतून जायला सांगत नाही. मात्र बुध्द धर्म हा एक असा एकमेव धर्म आहे, ज्यामध्ये अरहंत, बुध्द बनण्यासाठी कठोर साधना करावी लागते. दहा पारमीता पूर्ण कराव्या लागतात. कठोर शीलांचे पालन करावे लागते, गंभीर ध्यानसाधना करावी लागते. हे सर्व सिध्दार्थ गौतमाने केले आणि वैशाख पौर्णिमेला बुध्दात्व प्राप्त झाले.
बुध्द धम्माचा पाया हा दुःखाशी निगडीत आहे. दुःखमुक्ती हा एकमेव उद्देश धम्माचा आहे. जगात दुःख का? हा प्रश्‍न सिध्दार्थला नेहमी सतावत होता. त्यामुळे त्यांनी दुःखाचे मुळ शोधण्यासाठी कठोर साधना केली. विपस्सनेचा शोध लावला आणि दुःखाचे मुळ शोधले. तृष्णा हे दुःखाचे मुळ कारण आहे. आसक्ती, जगण्याची इच्छा दुःखाचे विणते. इच्छा असो वा तिरस्कार असो, दोन्ही तर्‍हेने फक्त दुःखच उत्पन्न होते. हे त्यांनी जाणले. त्यावर मात कशी करायची, याचाही त्यांनी मार्ग शोधला. सर्व तृष्णांचे मुळ आसक्ती आणि द्वेश आहे. जो कोणी कोणत्याही धर्माचा असो वा पथाचा प्रत्येकाचे दुःख सारखेच असते. ठेच लागली की प्रत्येकाच्या पायातून रक्तच येते. दुःखदच वेदना होते. त्यामुळे भिन्न असे काहीही बुध्दांनी सांगितले नाही. जे काही सांगितले ते मानसाच्या मनाशी निगडीत सांगितले. कोणत्याची दैवी चमत्काराच्या गोष्टी केल्या नाहीत. अवताराचा दावा केला नाही. स्वतःला मोक्षदाता म्हंटले नाही. उलटपक्षी इतर धर्म संस्थापकांनी स्वतःला देवच सिध्द केले. बुध्द धम्म शुध्द आणि वास्तववादी असल्यामुळेच कदाचित आज या धम्माच्या अनुयायांची संख्या जास्त आहे.

Saturday 1 August 2015

आषाढी पोर्णिमा आणि बुध्द धम्म

आषाढी पोर्णिमा आणि बुध्द धम्म
बौध्द धम्मात पोर्णिमांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक पोर्णिमा या तथागत गौतम बुध्दांच्या आयुष्याशी जोडल्या गेल्या आहेत. गौतम बुध्दांच्या आयुष्यात प्रत्येक पोर्णिमेदिनी मंगलमय प्रसंग घडले आहेत. आज शुक्रवारी आषाढी पोर्णिमा आहे; या पोर्णिमेलाही गौतम बुध्दांच्या आयुष्यात अनेक महत्वाच्या घडल्या. बौध्द धम्मात जसे वैशाख पोर्णिमेला महत्व आहेत, तितकेच महत्व आषाढी पोर्णिमेलाही आहे. सिध्दार्ंथ गौतम यांची आई महामाया यांना गर्भधारणा, सिध्दार्थ गौतमाचा गृहत्याग करुन परिव्रज्या, पहिले धम्म प्रवचन आणि वर्षावास प्रारंभ याच पोर्णिमेपासून सुरु झाला. वर्षावास मुख्यत्वे भिक्खूंच्या जीवनाशी निगडीत असून तत्कालीन वेळी पाचशेच्या पाचशे भिक्खूंचा संघ एका गावातून दुसर्‍या गावात जात असतं, पावसाळ्यात शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्याची सुरुवात बुध्दांनी केली होती. उपासक म्हणून वर्षावास काळात सर्वांनी उपोसथ पालन केले पाहिजे. जमेल तसे आठ शीलांचे पालन केले पाहिजे.
सम्यक सम्बोधी प्राप्त झाल्यानंतर भगवान बुध्दांनी आषाढी पौर्णिमेला कौण्डिण्य, भद्दीम, महानाम, वप्प व अश्वजीत या पंचवर्गीय भिक्खूसह ऋषीपतन हरणाच्या बागेत सारनाथ येथे पहिला उपदेश दिला; यालाच पहिले धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. पहिला उपदेश देताना सम्यक बुध्द म्हणाले, ‘इदं खो भिक्खवे, जाती पी दुखं, जरा पी दुखं, व्याधी पी दुखं, मरणं पी दुखं!’ अर्थात हे भिक्षू, जन्म दुखःद आहे, जगणे दुखःद आहे, आजार दुखःद आहे आणि मरणे दुखःद आहे. पुढे म्हणातात, ‘संक्खीतेणं पंचुपादन खंदा दुखा’ अर्थात सक्षिप्त मध्ये पाहिलं गेल तर पंचस्कंद दुखःद आहे. (पाच स्कंदः रुप, वेदना, संज्ञा, विज्ञान, संस्कार) पुढे ते म्हणतात, काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा या दुखःचे मुळ आहे. या तृष्णांचा अंत करण्यासाठी आर्यसत्याची जाणीव करुन घ्यायला पाहिजे. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात (सुत्तपिठक, विनयपिठक आणि अभिधम्मपिठक) चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य धम्माचा पाया आहे. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला. भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे. दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे. दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख कां होते? त्याला दु:ख कां भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो. परंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्माच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद या सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही. तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.
कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधीही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो. जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा? तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल. हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो.
भगवान बुध्दांनी अष्ठांग मार्गाचा अवलंब करावा, असा उपदेश दिला. सम्यक दृष्टी, सम्यम संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक कर्म, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे आठ मार्ग आहेत, ज्याच्या माध्यमातून दुखःतून मुक्ती मिळू शकते. रुप अनित्य आहे, वेदना अनित्य आहे, संज्ञा अनित्य आहे, विज्ञान अनित्य आहे आणि संस्कारही अनित्य आहे. सर्व संस्कार हे अनित्य आहेत, असा उपदेश धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात दिला आहे.
जगात आषाढी पौर्णिमा सर्वात मोठा सण व आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान बुध्दांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधःकरातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान उपदेशिले. प्रथमच मानवाला दुःख मुक्तीचे ज्ञान धम्मचक्क पवत्तन सुत्ताच्या द्वारा अर्पण केले. त्यामुळे मनुष्य मात्राने आषाढी पौर्णिमेला हा उपदेश केल्यामुळे या घटनेला पहिले धम्मचक्रप्रवर्तन म्हणून सार्‍या जगाने मानले आहे. भगवान बुध्दांनी याच दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमेला इ.स.पूर्व ५२८ ला भिक्खुसंघाची स्थापना केली आणि भिक्षूंना आदेश केला, ‘चरथ भिक्खवे चारीकं बहुजन हिताय बहुजन सुखायं! लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुस्सानं! देसेथ भिक्खवे, धम्मं आदी कल्याण मज्झे कल्याण परियोसान कल्याणं! सात्थं सव्यज्जनं केवल परिपून्न परीसुद्ध ब्रम्हचरियं पकासेथ!’ अर्थात हे भिक्षुंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही चालत रहा, लोकांवर अनुकंपा करीत देव (देव म्हणजे इश्‍वर नव्हे, दानशुर व्यक्तीच्या अर्थाने अर्थ घ्यावा) आणि मनुष्याच्या सुख आणि हितासाठी प्रयत्नशील रहा, हा मी धम्म जो देत आहे, तो सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्यम कल्याणकारी आहे आणि शेवटीही कल्याणकारी आहे, अशा धम्माचा उपदेश करुन त्यांनी धम्माच्या मार्गावर आरुढ होण्याची प्रेरणा भिक्खूंना दिली. त्याचप्रमाणे बौध्द धम्मामध्ये वर्षावासाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. संघाची स्थापना झाल्यानंतर महिन्याचे तीसही दिवस संघ गावोगावी जाऊन धम्माचे प्रचार व प्रसार कार्य करु लागला. पूर्वीच्या काळात अनेक ठिकाणी वर्षावास होत असत व सारे वातावरण धम्ममय होऊन जात असे. आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरु होतो व अश्विनी पौर्णिमे पर्यंत चालतो. या वर्षी दि. ३१ जुलै पासून ते दि. २७ ऑक्टोबर २०१५ कालावधीत वर्षावास आहे. हा काळखंड पावसाळ्याचा असतो. वैशाखाचा कडक भाजून काढणार्‍या ऊन्हाचा ताप नसतो. वातावरणात सुखद गारवा असतो. माणसांची अवस्था प्रसन्न असते. म्हणून हा कालखंड धम्म श्रवण करण्यास योग्य असतो. बुध्दांच्या आदेशाला अनुसरून भंते वर्षभर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी चारिका करीत धम्म प्रचाराचे व प्रसाराचे महान कार्य करीत असत. पूर्वीच्या काळी आताच्या काळासारखे सारखे दुषित वातावरण नव्हते त्यामुळे खूपच पाऊस पडत असे. पावसाळ्यात या चार महिन्यांच्या काळात त्यांच्या या धम्म प्रचाराच्या व प्रसाराच्या कार्याला मर्यादा पडत असत. पावसामुळे भिजलेले चिवर लवकर वाळत नसे आणि ओले चिवर वापल्यामुळे आजारी पडण्याचा संभव असे. याशिवाय एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी आजच्या सारखी वाहने नव्हती. पायी प्रवास करावा लागत असे. रस्यात चिखल व पाणी साचलेले असल्याने रस्त्यातून चालणे कठीण होत असे. रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेल्या गवतातून अनेक जीवजंतू व प्राणी रस्त्यात वाटेत आल्यामुळे रस्त्याने चालणे अवघड व गैरसोईचे होत असे. शिवाय शेतातून मार्गक्रमण करतांना पिकांचे नुकसान होत असे. भंतेंकडून धम्म प्रचार तर व्हायला पाहिजे. परंतु या अडचणी लक्षात घेऊन आणि चतथ भिक्खवे चारीकं या आदेशाऐवजी भंतेंना वर्षावासाच्या काळात एका ठिकाणी रहाण्याची सवलत दिली गेली. या काळात भंते एखाद्या विहारात, लेण्यात अथवा गावात राहतात. त्या ठिकाणी गावातील लोक एकत्र येऊन धम्म प्रवचन ऐकतात, धम्म देसना घेतात. अशाप्रकारे लोक धम्माच्या प्रवाहात येतात. ध्यानाच्या माध्यमातून सुध्दा अनेकजन धम्म जाणून घेतात आणि दु:खमुक्त होतात. बौध्द धम्म विघातक शक्तींनी व मनुवाद्यांनी बुध्द धम्म भारतातून नष्ट केल्यानंतर या वर्षावासाचे चातुर्मासात रूपांतर केले. आता १९५६ साली बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केल्यामुळे या वर्षावासानिमित्त ठिकठिकाणी धम्म शिबिरांचे कार्यक्रम राबविणे, अनेक बुध्द विहारांमधुन लहान मोठ्यांना सर्वांना वंदना शिकविणे. धम्म शिकविणे असे कार्यक्रम मोठया प्रमाणात राबविले जातात. उपासक म्हणून वर्षावास कसा साजरा करावा, यामध्ये अनेक मतभिन्नता असतील, मात्र उपासक या नात्याने जमेल तसे उपोसथ पालन अर्थात आठ शिलांचे पालन सर्वांनी केले पाहिजे.

- विनय शाक्य