Monday 14 August 2017

स्वराज्याची ‘दौलत’

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे झाली. गुलामगिरीच्या प्रदीर्घ दीडशे वर्षांच्या कालावधीत अनेक क्रांतीकारकांच्या स्मृती आज काळाच्या ओघात पुसट झाल्या आहेत. काही विस्मरणातही गेल्या आहेत. परंतु, आजचे स्वातंत्र्य हे त्यांच्या रक्ताची देण आहे. भारताच्या सुवर्ण इतिहासातील ही रत्ने इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवली आहेत. सामाजिक व राजकीय अशा दुहेरी साखळदंडात अडकलेल्या क्रांतीविरांनी ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले होते. गुलामगिरीच्या नकर पाशातून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी उभारलेल्या लढ्यातील योद्ध्यांना मात्र ब्रिटीशांनी ‘लुटारु’चा स्टॅम्प लावला. ब्रिटीश इंडियातील ‘ठग’ ज्यांनी जुलमी राजवटीविरोधात बंड पुकारला, त्यांना इतिहासात नगण्य स्थान मिळाल्याने स्वातंत्र्यलढ्यातील या नायकांच्या गाथा आज मिटत चालल्या आहेत.
रामोशी एक अशी जमात ज्यांनी नेहमीच क्रांती केली. त्यांची निष्ठा आणि पराक्रम पाहून चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामोशी जमातीतील लोकांना महत्त्वाची जबाबदारी दिली होती. शिवरायांच्या मावळ्यांमध्ये बहुतांशी सैनिक आजच्या एससी, एसटी प्रवर्गातील होते. रामोशींवर विशेष जबाबदारी होती. अफझल खानाचा पडाव, सुरत स्वारी ही रामोशी बहिरजी नाईक आणि त्यांच्या बहाद्दर साथीदारांमुळे फत्ते झाली होती. त्यामुळे रामोशींना किल्लेदारी बहाल झाली. कालांतराने सत्तातरे झाली. ब्रिटीशांनी गडकिल्ल्यांवर मोर्चा वळला. परंतु, पुण्यातील उमाजी नाईकांसारख्या किल्लेदारामुळे त्यांचे गडकिल्ले काबाजी करण्याचे स्वप्न भंगले. अखेर ब्रिटीशांनी रामोशींना लुटारु म्हणून घोषित करत त्यांची धरपकड सुरु केली. हे इतके जुलमी होते की, गर्भातील रामोशी देखील लुटारुच; त्याच्यावरही खटला भरला जात असे. हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतात होत होते. लढवय्या जमातींना लुटारु घोषित करुन त्यांचा बिमोड करण्याचा एककलमी कार्यक्रमच ब्रिटीशांनी आखला होता. 
ब्रिटीशांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात पेठून उटलेल्या उमाजींनी संघटन मजबुत करत रक्तरंजीत लढा दिला. १८५७ पूर्वीचा हा उठाव होता. आणि हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर लढा सुरु झाला होता. फरक एवढाच ही तो संघटीत नव्हता. बिहारच्या भागलपूरचे ‘धतुरया’ टोळीचा चतुर सिंग असो, की राजस्थानचे रखवालदार या सर्वांनी ब्रिटीशांविरोधात आवाज उठवला. उमाजी नाईकांनीही अशीच सशस्त्र क्रांती घडवली. पण त्यांचा संर्घष फारकाळ टिकला नाही. ब्रिटीश दस्ताएवजात त्यांना एक दरोडेखोर म्हणून घोषित करत फासावर लटकवले आणि येथून उडालेल्या ठिणगीचा वणवा दौलतराव नाईकाच्या रुपाने भडकू लागला. उमाजी नाईक आणि दौलतराव यांच्यातील कालावधी साधारण ५० वर्षांचा. १८३२ मध्ये उमाजींना फासावर चढवले. तर दौलतराव आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंचा उजवा हात. उमाजी नाईकांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची खुणगाठ मनाशी बांधून दौलतरावांनी रायगड गाठले. जशी शिवाजी-तानाजीची जोडी, तशी वासुदेव-दाैलतराव यांची. फडकेंच्या भेटीपूर्वीच दौलतरावांनी ब्रिटीशांच्या नाकीनऊ आणले होते. ब्रिटीशांचे हस्तक सावकार, जमीनदारांना लुटायचे आणि जे द्रव्य गोळा होईल, ते स्वराज्यकामी आणयचे हे एकच धोरण दौलतरावाने आखले होते आणि रामोशी जमातीतील इतर शूरवीरांना घेऊन एक संघटना बांधली होती. फडकेही अशाच क्रांतीकारकांच्या शोधात होते आणि त्यांना स्वराज्याची दौलत सापडली. फडकेंच्या फौजमध्ये रामोशी, महार, मातंग, कोळी, कुणबी, चर्मकार, नाभिक, मराठा आणि मुसलमान अशा विविध जातीधर्मातील क्रांतीवीरांचा समावेश होता. ब्रिटीश राजवटीच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी धनदांगड्यांच्या घरावर दरोडा घालयाचा आणि त्याचा उपयोग स्वातंत्र्यलढ्यासाठी करायचा, हे काम दौलतरावाचे. या कामात मोलाची साथ मिळायची तरी हरी मकाजी नाईक याची. वासुदेव बळवंत फडकेंच्या लढ्यातील शिलेदार हे दोन ‘नाईक’ होते. दौलतरावाचा शेवट लढताना हुतात्म्य पत्कारत झाला झाला तर हरी नाईकाला त्याच्या कुटुंबासह ब्रिटीशांनी १८७९ मध्ये चकमकीत ठार मारले. 
उमाजी नाईकांच्या समकालीन एक असाही नायक होता जो इतिहासाच्या पानांमधून हरवला आहे. त्याचे नाव चतुर सिंग. अर्थात इतिहासात क्रांतीकारी म्हणून याची गणना झाली नसली तरी त्याने ब्रिटीश राजवटीला जेरीस आणले होते. ब्रिटीश व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी त्यानेही धनदांडग्यांना लुटण्याचा चंग बांधला होता. परंतु, त्याचा लढा रक्तरंजीत नव्हता. ‘धोतरा’ या विषारी गवताच्या फुलांचा वापर करुन जमीनदारांचा विश्वास संपादित करुन त्यांच्यावर विषप्रयोग करायचा आणि त्याची ‘धतुरया’ टोळी सर्व माल लुटायची. मंदिरेही या टोळीने सोडली नव्हती. ब्रिटीश कायद्यात शस्त्रच्या संज्ञेत ‘धोतरा’ नसल्यामुळे नक्की पकडायचे कोणाला? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण चतुर सिंग यांच्याच टोळीतील एका फितुराने घात केल्यामुळे धतुरया टोळी ब्रिटीशांच्या तावडीत सापडली. 
ब्रिटीशांची आर्थिक कुचंबणा करण्यासाठी क्रांतीविरांनी १८०० सालापासूनच सुरुवात केली होती. यात काही पेशेवर ठग होते तर काही स्वराज्याच्या लढ्यासाठी लुटमार करत होते. मद्रास प्रांतात किम सिंग, पुण्यात उमाजी नाईक, बिहारमध्ये चतुर सिंग, झारखंडमध्ये बिरसा मुंडा, पिंडारी जमात आणि अशा अगणीत शुरवीरांनी ब्रिटीश राजवटीला खिळखिळी केली. त्यामुळे ब्रिटीशांनी विल्यम स्लीमनच्या नेतृत्वाखाली ‘ठगांचा’ बंदोबस्त करण्याची एककलमी कार्यक्रम आखला. १८१० पासून जमीनदारांविरोधात जाणाऱ्यांचा बदोबस्त ब्रिटीशांनी लावला. १८२६ ते १८३५ च्या हजारोंच्या संख्येने क्रांतीकारकांना फासावर लटकवले. रामोशींवर तर आईच्या उदरात असतानाच खटले चालवले आणि त्यांना शिक्षा केली. ब्रिटीशांची ही जुलमी राजवट मोडीत काढण्यासाठी उमाजी नाईकांचा आदर्श वासुदेव बळवंत फडकेंनी बंड पुकारला. तत्पूर्वी, १८५७ चा उठाव झाला होता. पण हा श्रीमंतांचा उठाव होता. जमीनीशी सलग्न असलेले किंबहुना जंगलात राहणाऱ्या आदिवासींपैकी बिरसा मुंडाने जमीनदारी व्यवस्थेलाच आव्हान दिले. आदिवासींची आंदोलने उभारली. परंतु, जमीनदारीविरोधात आवाज उठवणे ब्रिटीश शासनाला परवडण्यासारखे नव्हते. परिणामी त्याला तुरुंगवास झाला आणि तुरुंगातच १९९० च्या सुमारास मुंडाने शेवटचा श्वास घेतला. स्वराज्याच्या या ‘दौलती’च्या जोरावर पुढे चाफेकर बंधु, लाला लाजपतराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस आदींनी क्रांतीची मशाल तेवत ठेवली. त्यामुळे आज स्वांतत्र्याचा प्रकाश चहूबाजूने झळकत आहे. 

Monday 19 June 2017

bhandardara Kajva Mohotsav MTDC (काजवा महोत्सव )



अवकाळी पावसाच्या ढगांनी आकाशात आपली जागा व्यापताच येथे जमीनीवर जणू चांदण्यांचा सडाच उतरतो. मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागताच काजव्यांची किरकिर रात्रभर सुरु राहते आणि निसर्गप्रेमींची पाऊले आपोआप भंडारदराच्या खोऱ्याच्या दिशेने पडू लागतात. भंडारदरामध्ये काजव्यांचा हा अनोखा चमत्कार पाहणे अलौकिकच असते. पर्यटकांना काजव्यांच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या जैवप्रकाशाचे दर्शन घडविण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घडवून आणली आहे. भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये सध्या काजवा महोत्सव सुरु असून हा महोत्सव आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ इथे अधिकच वाढला आहे. गेल्या मे महिन्याच्या २० तारखेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाची सांगता २० जून रोजी झाली.
‘काजवा’ हा काही आपल्यासाठी नवीन नाही. मग या काजवा महोत्सवात एवढे विशेष काय आहे की पर्यटकांची ही एकच गर्दी भंडारदरामध्ये होत आहे. हे पाहण्यासाठी स्वत: भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती केली आणि काजव्यांचा अविस्मरणीय देखावा पाहून नेत्र सुखावले. भंडारदरातील जंगलात जिथे नजर जाईल तिथे काजव्यांची लुकलुक दिसत होती. विशेष म्हणजे, या काजव्यांमध्ये कमालीचे समन्वय पहायवास मिळाले. कि्रकेट मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत क्रीडारसिक ज्याप्रमाणे खेळाडूंना आळीपाळीने दाद देतात, अगदी तसाच नजारा इथे पहावयास मिळत होता. एका झाडामागून एका झाडावरील काजव्यांचा जैवप्रकाश चमकत जात होता. हे पाहणे अविस्मरणीय. मुंबईपासून १८५ कि.मी. दूर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे पर्यटकांसाठी अगणीत खजाना दडला आहे. नाशिक-अहमदनगर मार्गे आटगाव - कसारा बुद्रुक - इगतपूरी- शिर्डी सिन्नर घोटी मार्गे भंडारदराला आस्वाद घेण्यासाठी जाणे सोयीस्कर पडते.
‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात शंकर महादेवन ‘मन मंदिरा’चा सूर छेडल्यानंतर जे काजव्यांचे दर्शन घडते, ते साक्षात येथे पहावयास मिळते. किंबहूना चित्रपटापेक्षाही कित्येक पटीने हे दर्शन विलोभनीय आहे. पण काजवे पाहण्यासाठी भंडारदराच का? हा प्रश्न वाचकांना पडणे साहजिकच आहे. कोकण आिण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना काजवा काही नवीन नाही. एवढेच काय, विदर्भातही काजव्यांचा मेळा भरलेला काही ठिकाणी पहावयास मिळतो. परंतु, भंडारदराची बातच निराळी. इतर ठिकाणी तुरळक संख्येेने काजव्यांचे दर्शन घडते. तर भंडारदरात लाखों, कोटींच्या संख्येने काजव्यांचा सडा पडलेला दिसतो. येथे कजव्यांना पोषक असणाऱ्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काजव्यांची चादरच पसरलेली दिसून येते. खोऱ्यांचे भंडार असल्यामुळेच याला भंडारदार म्हटले गेले आिण खोऱ्यांत खेळती हवा नसल्या कारणामुळे काजव्यांना प्रजननासाठी ही जागा पोषक ठरते. येथे हिरडा, बेहड, सदडा अशी वनौषधी झाडांसह आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि या झाड्यांवरच काजवा टिकाव धरू शकातो. या झाडांची पानं ही काजव्यांचा अन्न असते. त्यामुळे भंडारदरात इतर ठिकाणांच्या तुलनेत काजव्यांचे प्रमाण कित्येक पटीने अधिक असते.
विद्युत दिव्यांची रोषणाई केल्यासमान प्रत्येक झाडांवर काजव्यांचा जैवप्रकाश मन मोहून जातो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि पावसाळा सुरु होण्यापूर्वीचे काही दिवस हा कालावधी काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. या दिवसांत काजवे मोठ्या संख्येने प्रजननासाठी बाहेर येतात. नर-मादीला आकर्षिक करण्यासाठी आपल्याजवळील नैसर्गिक प्रकाशाने ते एकमेकांना इशारे करतात. त्यांचा एकमेकांना आकर्षिक करण्याचा हा जो काही प्रयत्न असतो, तो अलौकिक असतो. हे पाहण्यासाठी दूरदूरुन पर्यटक भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती करतात आणि अगदी सहजच त्यांना जैवप्रकाशाची चादर टिमटिम करताना दिसून येते. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे चांगली सोय केली आहे. येथील काजव्यांची अफाट संख्या पाहता एमटीडीसीने पर्यटन विकासाच्या दृष्टीने येथे गेल्या चार वर्षापासून काजवा महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येथील स्थानिकांशी हातमिळवणी करुन पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीने एक पाऊल पुढे टाकले आहे. एमटीडीसीच्या या निर्णयाचा फायदा येथील स्थानिकांना मिळत आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. भंडारदरा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बहुतांशी आदिवासी वस्ती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही. यांना प्रशिक्षण देऊन ‘गाईड’ म्हणून एमटीडीसीने सेवेत रुजू केले आहे. तर काहींना हॉटेल व्यवसाय टाकण्यासाठी परवानगी देखील दिली आहे. या काजवा महोत्सवाला येथील स्थानिक केशव खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. किंबहुना त्यांच्यामुळेच हा महोत्सव येथे दरवर्षी भरतो. आजमतीस दरदिवशी सुमारे ४०० ते ६०० पर्यटक येथे भेटी देतात आणि या अलौकिक महोत्सवाचा आनंद घेतात. २० तारखेला हा महोत्सव संपत आहे. याचा अर्थ असा नव्हे की येथे काजव्यांचे दर्शन होणार नाही. जोपर्यंत मुसळधार पाऊस होत नाही, तोपर्यंत काजवे येथे लुकलुक करत राहणारच, यात शंका नाही. शिवाय खोल दऱ्या, मोठेधरण, सरोवर, धबधबे, एतिहासिक किल्ला व पुरातन मंदिर आहेच पर्यटकांना खुणवायला. त्यामुळे तुम्ही कधीही येथे जा, निसर्गाने तुमच्यासाठी नवीन काहीतरी वाढून ठेवले असेल, हे नक्कीच!

Monday 5 June 2017

रेन वॉटर हार्वेस्टिंग गरजेचे

रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाळी पाण्याची साठवणूक करणे, ही फार पूर्वीपासून चालत आलेली संकल्पना. कचऱ्याचे रुपांतर खतामध्ये करण, हे देखील आपल्यासाठी काही नवीन नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपल्याकडे रुढ झालेल्या संकल्पना आता मात्र विस्मरणात गेल्या आहेत. परिणामी आज ग्लोबल वॉर्मिंगसारखा प्रश्न समोर आला आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ, ओला दुष्काळ असे पर्यावरणाची संबंधित प्रश्नांवर आपली ऊर्जा खर्ची होत आहे. तसे या परिस्िथतीलाही आपणच कारणीभूत आहोत, हे देखील मान्य करावे लागले. ही परिस्थिती भयावह होऊ नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. शहरी भागात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही काळाची गरज बनली असून ग्रामीण भागात जल संधारण काळाची गरज बनली आहे.
विविध समाजिक संस्थांमार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती सुरु आहे. ठाण्यात सुमारे १ हजार हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांनी पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याची यंत्रणा उभारली आहे. हे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणाकडे पडलेले एक इवलेसे पाऊलच म्हणावे.
निसर्गाशी आपले असलेले नाते म्हणजे पर्यावरण होय. माणसाने खूप प्रगती केली. आपण अंतराळापर्यंत पोहचलो आहोत. परंतु, काही मुलभूत गोष्टी अशाही आहेत (हवा, पाणी) ज्यांची आपण निर्मिती नाही करु शकत. त्या निसर्गातूनच मिळवाव्या लागतात. शहरी भागात मुख्यत्वे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे पर्यायी साधनांतून पाण्याची बचत कशी करता येईल, याकडे ठाण्यातील पर्यावरण जनजागृती मंचने लक्ष वेधले. त्यातूनच रेन वॉटर हार्वेस्टिंगची कल्पना पुढे आली. २००३ पासून पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याच्या विषयाची जनजागृती सुरु झाली आणि अवघ्या तीन वर्षांत मंचच्या या कामाची युनिस्कोने सुद्धा दखल घेतली. त्यामुळे आजमतीस ठाण्यात बहुतांशी सोसायट्यांनी पाण्याची साठवणूक करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. परंतु, पर्यावरणाबाबत दक्ष असणे म्हणजे पाण्याची साठवणूक करणे, एवढेच नसते. हा तर केवळ एक भाग झाला.
आज पर्यावरणासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये डम्पिंग ग्राऊंड हा कळीचा मुद्दा झाला आहे आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न देखील सुरु आहेत. पंरतु, कचऱ्याने काय आताच जन्म घेतला आहे का? पूर्वीही कचरा होताच ना! मग त्याची विल्हेवाट कशी लागत असावी? पूर्वी खेड्यांमध्ये ‘उकीरडा’ नावाचा प्रकार होता. त्यात ग्रामस्थ कचरा टाकत असत आणि कालांतराने त्याचा वापर शेतीसाठी खत म्हणून व्हायचा. अगदी पारंपारकी पद्धतीने बनलेल्या या कचऱ्यामुळे जमिनीचा कसही अबाधित राहायचा. परंतु, आज ‘युरिया’ने जमिनीची प्रतही खलावली आिण उत्पन्नही कमी झाल्याचे दिसून येते. ज्या कारणासाठी उकीरडा ओळखला जात होता, ती संकल्पनाच आज लोप पावली आहे. एकेकाळी जे आपल्या अंगवळणी होते, ते सांगण्यासाठी आज सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुरडा करावा लागत आहे. ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणावर आज कोट्यवधी खर्च होत आहेत. ही प्रगती म्हणावी की अधोगती? निसर्गाशी मानवाचे असलेले नाते म्हणजे पर्यावरण. परंतु, आपण निसर्गापासून दूर लोटलो आहोत. मग पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही तर काय होणार. परिणामी आज निसर्गाचे चक्रही बदललेले दिसते. असह्य उकाडा हे त्याचेच प्रतिक आहे. अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ ही त्याचीच फळे आहेत. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जावे लागेल. कार्बनडाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण मानव जातीसाठी धोकादायक आहे. या कार्बनचे स्थितीकरण करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या हे अवाक्याबाहेर असले तरी जितकी जास्त झाडे असतील तितका कार्बन नियंत्रणात राहिल, हे समजायला कोणत्या रॉकेट सायन्सची गरज लागत नाही. हो पण त्यासाठी शाळा मात्र हवी, हे मान्य. आज शाळांमध्येही पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी भिंतीचित्रांच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. ठाण्यात तर पर्यावरण शाळा देखील आहे. ही एकप्रकारची अचिव्हमेंट म्हणावी. जो झोपलेला आहे, त्याला उठवता येऊ शकते, मात्र ज्याने झोपेचे सांेग घेतले आहे, त्याला उठवता येत नाही, अशी एक म्हण आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत तर सर्वांनी झोपेचे साेंगच घेतले आहे. त्यांना उठविण्यासाठी मोठ्या धक्क्याची गरज आहे. केवळ जनजागृतीने ही लोकं उठणारी नाहीत. आपण किती पाण्यात आहोत, हे समजावून सांगण्यासाठी, आपल्याला किती धोका आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी ‘पर्यावरण शाळां’ची आज चौकाचौकांत गरज आहे.

Monday 27 February 2017

मराठी भाषेची स्थित्यंतरे

उपेक्षित हा शब्द भारतीयांसाठी काही नवीन नाही. गेल्या कित्येक पिढ्यांनी या देशात उपेक्षा सहन केली आहे. पंरतु, स्वातंत्र्यानंतरही येथे साहित्यिकांनाही उपेक्षाची भावना सहन करावी लागते, हे या संपन्न भारताचे दुर्दैवच म्हणावे लागेल. साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. पण तरीही येथे एक असा घटक आहे, ज्यांना या संमेलनात दुय्यम स्थान मिळते. म्हणून त्यांनी स्वत:चे व्यासपीठ उभे करण्याचे ठरविले आहे. त्यांची ही धडपड गेल्या २५ वर्षांपासून सुरु आहे. उर्दूचा पगडा असलेल्या मुस्लिम समाजातही मराठी साहित्यिक निर्माण होऊ पाहत आहेत. त्यांना व्यासपीठ देण्यासाठी मुस्लिम मराठी साहित्य मंडळ प्रयत्नशील आहे.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांची मुलाखत घेतली. येत्या मे महिन्यात १९, २० आणि २१ रोजी अकरावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पनवेलमध्ये संपन्न होणार आहे. शासनाकडून निधी मिळत नसल्यामुळे या साहित्य संमेलनाला वलय प्राप्त नसले तरी मुस्लिम समाजासह उपेक्षित साहित्यिकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. यानिमित्ताने डॉ. शेख यांनी मराठी भाषेच्या स्थित्यांतराची सविस्तर माहिती दिली. मराठी भाषेला कोणत्याही एका चौकटीत बसवता येणार नाही. ही कालांतराने विकसित झालेली भ्ााषा आहे आणि  भाषेवर इतर भाषांचा मोठा पगडा पडला आहे. जशी उर्दू विकसित झाली, तशी मराठीही विकास पावत गेलेली भाषा आहे. उर्दु ही लष्कारी भाषा म्हणून ओळखली जायची. अल्लउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानंतर उर्दू भाषेचा जन्म झाला. खिल्जीच्या सैन्यात कर्नाटक, आध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि हैदराबाद येथील सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा होता. प्रत्येक राज्याची बोलीभाषा वेगळी असल्यामुळे या सर्वांच्या बोलीभाषेतून एकरुप होत उर्दुचा विकास पावला. मराठी भाषाही तशीच विकसित पावली. मराठी भाषेवर पाली आणि संस्कृत भाषेचा मोठा पगडा दिसून येतो. मराठीतील बहुतांशी शब्द पालीमधून आले आहेत. हे प्रत्येक भाषेसोबत घडते. इंग्रजीने मराठीचा शब्द ‘लूट’ जशाचा तसा घेतला आहे. तसेच ‘दवाखाना’ हा पारशी शब्द मराठीत आज रुळला आहे. ‘दरवाजा’ हा मूळ शब्द उर्दूतून आला आहे. आज इंग्रजीचा शब्द ‘टेबल’ला मराठीत काय पर्याय आहे? काहीच नाही. ‘मात्र’ हा शब्द हिंदी आिण मराठी या दोन्ही भाषांमध्ये आढळतो. विशेष म्हणजे दोन्ही भाषांमध्ये त्याचा अर्थ हा एकच आहे. ‘पाली’ भाषेतला ‘राग’ आणि मराठीतील ‘राग’ हा थोड्याफार अंतरात भिन्न्ा जाणवतो. ‘पाली’तील ‘रागा’चा अर्थ आसक्ती तर मराठीतील ‘रागा’चा अर्थ क्रोध आिण हा ‘क्रोध’ मुळचा संस्कृत शब्द आहे. तर ‘क्रोधा’ला ‘पाली’त ‘कोधं’ म्हटले जाते. ही आहे भाषेची गंमत! गुजराती भाषा आिण मराठी भाषा जेमतेस सारखीच भासते. बहतांशी गुजराती भाषेतील शब्द हे मराठी आहेत. भाषा ही अशा प्रकारचे विकास पावते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात मराठी भाषेचा लहजा वेगळा होता. संत ज्ञानेश्वरांच्या काळी मराठी वेगळी होती. संत ज्ञानेश्वरांच्या काळातील तत्कालीन मराठी आता संस्कृतप्रमाणे भासते. परंतु, ती संस्कृत नाही. शिवाजी महाराजांच्या मराठीवर पारसी आणि उर्दुचा पगडा होता. ‘फितुर’ हा मूळ मराठी शब्द नाही, परंतु, शिवाजी महाराजांच्या बखरींमध्ये हा सर्रास आढळला जाणार शब्द आहे. पेशवेकालीन मराठीही तशीच थोडी बदललेली जाणवते. त्यानंतर महात्मा ज्योतीराव फुले यांच्या कालखंडातील अर्थात अठराशेच्या शतकात मराठीतील बोलीभाष्ाा आणि आज बोलली जाणारी ‘मराठी’ यामध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसतो. महात्मा फुलेंच्या साहित्यावरुन त्याची प्रचिती येते. महात्मा फुलेंच्या ‘शेतकऱ्यांचा आसुड’ या ग्रंथात ‘आमिष’ ऐवजी ‘मिष’ असा शब्दप्रयोग काही ठिकाणी सापडतो. येथे ‘आ’ हे अक्षर सायलेंट आहे. लिखाणामध्ये म्हणायचे झाले तर अगदी अलीकडे काही शब्द बदलले आहेत. उदाहरणार्थ ‘ह्या’ ची जागा ‘या’ ने घेतली तर ‘यांचे’चे ‘यांच्या’ असा वापर होऊ लागला आहे. अशा प्रकारे मराठी ही विकासित होणारी भाषा आहे. तिला कोणत्याही बंधनात बांधता येत नाही. आपल्याकडे प्रत्येक बारा किलोमीटर अंतरावर मराठी भाषेत फरक जाणवतो. अनेकवळा भाषेवर गावंढळ, शुद्ध असे लेबल लावले जातात. परंतु, डॉ. शेख यांना हे लेबल अमान्य आहेत. विशिष्ट प्रकारे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे, ही जी खुळचट संकल्पना रुजली आहे, ती मुळातच अत्यंत हस्यास्पद आहे. प्रमाण-अप्रमाण असे काहीच नसते. भाषा ही संवाद साधण्याचे माध्यम आहे. निजामशाहीच्या प्रभावाखाली असल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात मराठी भाषेत अनेक उर्दु, हिंदी आिण पारसी शब्द आज दुधात साखरेप्रमाणे मिसळले आहेत. मराठवाड्यात भाड्याच्या घराला सरार्ससपणे ‘किरायाचे घर’ म्हटले जाते.   पश्िचम महाराष्ट्रातील लोकांचा मराठी बोलण्याचा लेहजा वेगळा आहे.  साताऱ्यातील मुस्लिम बांधव मराठी बोलताना अर्ध हिंदीचा सर्रास वापर करतात. त्यामुळे ते चूकीचे मराठी बोलत आहेत, असे म्हणण्यापेक्षा ते ‘खडी बोली’त मराठी बोलत आहे, हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. व्यक्त होण्यासाठी असलेले माध्यम ‘मराठी’ एवढेच काय ते मानावे. प्रमाण-अप्रमाण, शुद्ध-गांवढळ बाेलून समृद्ध भाषेचा अपमान करु नये.            

Tuesday 14 February 2017

This Valentine Say....‘लिव्ह ईन’च्या बाधेपासून आम्ही दूरच

पूर्वी विद्यार्थ्यांची ओळख त्यांच्या गुणांवरुन व्हायची. खेळ, कला आणि शिक्षणामध्ये अव्वल असलेला कॉलेजचा हिरो असायचा. मात्र अलीकडच्या काळात ही परिभाषा बदलत गेली. हल्ली मुलींना फिरवणाऱ्याची कॉलेजमध्ये चलती असते. किंबहुना जो मुलींमध्ये जास्त परिचयाचा असतो, तोच त्या ग्रुपचा अॅडमीन असतो. येथे ग्रुप म्हणजे व्हॉट्सअॅप नव्हे बरं का! मित्रांच्या खऱ्याखुऱ्या ग्रुपचा तो म्होरक्या असतो. मुलींना पटविण्यासाठी त्याचा मार्गदर्शक सल्ला मोलाचा ठरतो. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत ‘टाईमपास’ असलेली ‘ती’ जीवनसोबती कधी बनते, हे त्याचेच त्याला कळत नाही. पण अलीकडे रिलेशनशिप लाँग टाईम ठेवण्याचा ट्रेण्डच गायब होताना दिसत आहे. करण जोहरच्या चित्रपटांचा हा परिणाम आहे, असे म्हटले तरी वागवे ठरणार नाही.
अलीकडे प्रेमपटातून निराळेच ‘संबंध’ दाखविण्यात येत आहेत. किंबहूना आजच्या तरुण पिढीचे ते प्रतिबिंबच म्हणावे लागेल. पबमधील डान्स फ्लोअरवर मैत्री होते आणि त्याच रात्री प्रेमाचा ‘अंकूर’ही फुलतो. शहरात मुख्यत्व मेट्रो सिटीमध्ये मुलांमुलींमधील मित्रत्वाचे नाते प्रेमात रुपांतरीत होते, हे काही नवीन नाही. आता तर थेट ‘आय लव्ह यू’ पासून सुरुवात होते. प्रेमाच्या बाबतीत ग्रामीण भागानेही कात टाकली आहे. एकेकाळी ग्रामीण भागात फ्रेन्डशिप देते का? या प्रश्नावरुन प्रेमप्रकरणे फुलत होती. परंतु, येथीलही लाईफ फास्ट झाली आहे. नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या प्रेमपटांमुळे प्रभावित झालेला प्रत्येक तरुण ‘तिला’ कशी बाटलीत उतरवता येईल, यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. यासाठी ‘त्याच्या’ पेक्षा त्याच्या मित्रांचाच जास्त वाटा असतो. तू हो बोलली नाहीस तर हा वैफल्यग्रस्त होईल... वगैरे, वगैरे. जसा शेतीचा हंगाम असतो, प्राण्यांचा प्रजनन काळ असतो, तसा या तरुणांचाही फेब्रुवारी महिना रोमान्सचा पिरियड असतो. ‘रोझ डे’पासून रोमान्सचा लेक्चर सुरु होतो आणि व्हेलेन्टाईन डे दिवशी समारोप. ‘व्हेलेन्टाईन डे’नंतर ती सध्या काय करते? अशी म्हणायची वेळ येऊ नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. परंतु, खरी गंमत ‘प्रपोझ डे’ला उडते. काल गुलाबाचे फुल देऊन सिग्नल तर दिला खरा, पण आज प्रेमाच्या गाडीचा एक्सलेटर रेटायचा कसा? या विवंचनेतच कॉलेजची पायरी चढायची आणि हिंमत करुन एकद्याचे बोलून टाकायचे. बहुतांशी मुलगीही होच म्हणते आणि तिचा नकार असेल तरी तो होच आहे, ही आमच्या तरुण पिढीची श्रद्धा असल्यामुळे तिच्या नकारामुळे फारसा फरकही पडत नाही. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ उक्तीप्रमाणे चिकाटी सोडायची नाही. आज नाही उद्या हो म्हणणारच; नाहीतर जाणार कोणाकडे? अशी प्रत्येक तरुणाची भावना असते. ‘तिच्या’ हो म्हणण्याच्या आशेवर तिसऱ्या दिवशी चॉकलेट देऊन पुन्हा तिला गटविण्याचा प्रयत्न सुरु हाेतो. तसे प्रत्येकाची वेगवेगळी ‘आयटम’ ठरलेली असते, त्यामुळे कोणीही एकमेकांच्यामध्ये लुडबुड करत नाही. फार फार तर मैति्रणी काय त्या मदत करतात, एवढेचं. पण मैत्रिणींची मदतच मोलाची ठरते. कारण हे मित्र साले स्वत:ची पोळी तळण्यासाठी टपलेलेच असतात आणि दुसरे म्हणजे एक मुलगी शिफारस करत असल्यामुळे ‘तिचे’ मन पलटण्यासाठी ते फार उपयोगी ठरते. ‘लोहा गरम’ झाल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी थोडासा खर्च करायचा आणि व्हेलंटाईन डे मग आपलाच की राव! या ‘कष्टा’ची जाणीव कदाचित गर्भ श्रीमंतांच्या मुलांना नसावी. त्यांचं काय, पार्टीमध्ये एखादी भेटली की ड्रिंक घेता घेता ‘सेट’ होते. दुसऱ्या दिवशी ‘तिची’ही उतरते आणि ‘त्याची’ही. काही वेळ त्यांचे हे रिलेशन खुप काळ चालते. प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते. मध्य असतो आणि शेवटही असतो. कोणतेही नातेसंबंध टिकविण्यासाठी या तीन पायऱ्या चढाव्याच लागतात. कॉलेजमध्ये हसण्या-खेळण्याच्या वयात झालेले प्रेम फुलत जाते. एलआयसीचे हप्ते भरल्यानंतर जशी पॉलिसी मॅच्युर होते, तसे प्रेमही प्रगल्भ होत जाते. शेवटचे वर्ष येईपर्यंत दोघांमध्येही सुसंवाद वाढलेला असतो. करिअरनंतर लग्नाच्या गोष्ठी ठरलेल्या असतात. त्यांनतर फॅमिली प्लॅनिंग आिण पुढील आयुष्य. असा या व्हेलंटाईनचा शेवट होतो़  निदान मध्यमवर्गीयांमध्येही हिच प्रथा सुरु आहे. कर्मधर्मसंयोगाने ‘लिव्ह ईन’ची बाधा सध्याच्या मध्यमवर्गीय तरुणांना झालेली नाही, हे पाहून नक्कीच आनंद होतो.