Monday 19 June 2017

bhandardara Kajva Mohotsav MTDC (काजवा महोत्सव )



अवकाळी पावसाच्या ढगांनी आकाशात आपली जागा व्यापताच येथे जमीनीवर जणू चांदण्यांचा सडाच उतरतो. मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागताच काजव्यांची किरकिर रात्रभर सुरु राहते आणि निसर्गप्रेमींची पाऊले आपोआप भंडारदराच्या खोऱ्याच्या दिशेने पडू लागतात. भंडारदरामध्ये काजव्यांचा हा अनोखा चमत्कार पाहणे अलौकिकच असते. पर्यटकांना काजव्यांच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या जैवप्रकाशाचे दर्शन घडविण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घडवून आणली आहे. भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये सध्या काजवा महोत्सव सुरु असून हा महोत्सव आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ इथे अधिकच वाढला आहे. गेल्या मे महिन्याच्या २० तारखेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाची सांगता २० जून रोजी झाली.
‘काजवा’ हा काही आपल्यासाठी नवीन नाही. मग या काजवा महोत्सवात एवढे विशेष काय आहे की पर्यटकांची ही एकच गर्दी भंडारदरामध्ये होत आहे. हे पाहण्यासाठी स्वत: भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती केली आणि काजव्यांचा अविस्मरणीय देखावा पाहून नेत्र सुखावले. भंडारदरातील जंगलात जिथे नजर जाईल तिथे काजव्यांची लुकलुक दिसत होती. विशेष म्हणजे, या काजव्यांमध्ये कमालीचे समन्वय पहायवास मिळाले. कि्रकेट मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत क्रीडारसिक ज्याप्रमाणे खेळाडूंना आळीपाळीने दाद देतात, अगदी तसाच नजारा इथे पहावयास मिळत होता. एका झाडामागून एका झाडावरील काजव्यांचा जैवप्रकाश चमकत जात होता. हे पाहणे अविस्मरणीय. मुंबईपासून १८५ कि.मी. दूर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे पर्यटकांसाठी अगणीत खजाना दडला आहे. नाशिक-अहमदनगर मार्गे आटगाव - कसारा बुद्रुक - इगतपूरी- शिर्डी सिन्नर घोटी मार्गे भंडारदराला आस्वाद घेण्यासाठी जाणे सोयीस्कर पडते.
‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात शंकर महादेवन ‘मन मंदिरा’चा सूर छेडल्यानंतर जे काजव्यांचे दर्शन घडते, ते साक्षात येथे पहावयास मिळते. किंबहूना चित्रपटापेक्षाही कित्येक पटीने हे दर्शन विलोभनीय आहे. पण काजवे पाहण्यासाठी भंडारदराच का? हा प्रश्न वाचकांना पडणे साहजिकच आहे. कोकण आिण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना काजवा काही नवीन नाही. एवढेच काय, विदर्भातही काजव्यांचा मेळा भरलेला काही ठिकाणी पहावयास मिळतो. परंतु, भंडारदराची बातच निराळी. इतर ठिकाणी तुरळक संख्येेने काजव्यांचे दर्शन घडते. तर भंडारदरात लाखों, कोटींच्या संख्येने काजव्यांचा सडा पडलेला दिसतो. येथे कजव्यांना पोषक असणाऱ्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काजव्यांची चादरच पसरलेली दिसून येते. खोऱ्यांचे भंडार असल्यामुळेच याला भंडारदार म्हटले गेले आिण खोऱ्यांत खेळती हवा नसल्या कारणामुळे काजव्यांना प्रजननासाठी ही जागा पोषक ठरते. येथे हिरडा, बेहड, सदडा अशी वनौषधी झाडांसह आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि या झाड्यांवरच काजवा टिकाव धरू शकातो. या झाडांची पानं ही काजव्यांचा अन्न असते. त्यामुळे भंडारदरात इतर ठिकाणांच्या तुलनेत काजव्यांचे प्रमाण कित्येक पटीने अधिक असते.
विद्युत दिव्यांची रोषणाई केल्यासमान प्रत्येक झाडांवर काजव्यांचा जैवप्रकाश मन मोहून जातो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि पावसाळा सुरु होण्यापूर्वीचे काही दिवस हा कालावधी काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. या दिवसांत काजवे मोठ्या संख्येने प्रजननासाठी बाहेर येतात. नर-मादीला आकर्षिक करण्यासाठी आपल्याजवळील नैसर्गिक प्रकाशाने ते एकमेकांना इशारे करतात. त्यांचा एकमेकांना आकर्षिक करण्याचा हा जो काही प्रयत्न असतो, तो अलौकिक असतो. हे पाहण्यासाठी दूरदूरुन पर्यटक भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती करतात आणि अगदी सहजच त्यांना जैवप्रकाशाची चादर टिमटिम करताना दिसून येते. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे चांगली सोय केली आहे. येथील काजव्यांची अफाट संख्या पाहता एमटीडीसीने पर्यटन विकासाच्या दृष्टीने येथे गेल्या चार वर्षापासून काजवा महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येथील स्थानिकांशी हातमिळवणी करुन पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीने एक पाऊल पुढे टाकले आहे. एमटीडीसीच्या या निर्णयाचा फायदा येथील स्थानिकांना मिळत आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. भंडारदरा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बहुतांशी आदिवासी वस्ती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही. यांना प्रशिक्षण देऊन ‘गाईड’ म्हणून एमटीडीसीने सेवेत रुजू केले आहे. तर काहींना हॉटेल व्यवसाय टाकण्यासाठी परवानगी देखील दिली आहे. या काजवा महोत्सवाला येथील स्थानिक केशव खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. किंबहुना त्यांच्यामुळेच हा महोत्सव येथे दरवर्षी भरतो. आजमतीस दरदिवशी सुमारे ४०० ते ६०० पर्यटक येथे भेटी देतात आणि या अलौकिक महोत्सवाचा आनंद घेतात. २० तारखेला हा महोत्सव संपत आहे. याचा अर्थ असा नव्हे की येथे काजव्यांचे दर्शन होणार नाही. जोपर्यंत मुसळधार पाऊस होत नाही, तोपर्यंत काजवे येथे लुकलुक करत राहणारच, यात शंका नाही. शिवाय खोल दऱ्या, मोठेधरण, सरोवर, धबधबे, एतिहासिक किल्ला व पुरातन मंदिर आहेच पर्यटकांना खुणवायला. त्यामुळे तुम्ही कधीही येथे जा, निसर्गाने तुमच्यासाठी नवीन काहीतरी वाढून ठेवले असेल, हे नक्कीच!

Monday 5 June 2017

रेन वॉटर हार्वेस्टिंग गरजेचे

रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाळी पाण्याची साठवणूक करणे, ही फार पूर्वीपासून चालत आलेली संकल्पना. कचऱ्याचे रुपांतर खतामध्ये करण, हे देखील आपल्यासाठी काही नवीन नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपल्याकडे रुढ झालेल्या संकल्पना आता मात्र विस्मरणात गेल्या आहेत. परिणामी आज ग्लोबल वॉर्मिंगसारखा प्रश्न समोर आला आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ, ओला दुष्काळ असे पर्यावरणाची संबंधित प्रश्नांवर आपली ऊर्जा खर्ची होत आहे. तसे या परिस्िथतीलाही आपणच कारणीभूत आहोत, हे देखील मान्य करावे लागले. ही परिस्थिती भयावह होऊ नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. शहरी भागात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही काळाची गरज बनली असून ग्रामीण भागात जल संधारण काळाची गरज बनली आहे.
विविध समाजिक संस्थांमार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती सुरु आहे. ठाण्यात सुमारे १ हजार हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांनी पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याची यंत्रणा उभारली आहे. हे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणाकडे पडलेले एक इवलेसे पाऊलच म्हणावे.
निसर्गाशी आपले असलेले नाते म्हणजे पर्यावरण होय. माणसाने खूप प्रगती केली. आपण अंतराळापर्यंत पोहचलो आहोत. परंतु, काही मुलभूत गोष्टी अशाही आहेत (हवा, पाणी) ज्यांची आपण निर्मिती नाही करु शकत. त्या निसर्गातूनच मिळवाव्या लागतात. शहरी भागात मुख्यत्वे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे पर्यायी साधनांतून पाण्याची बचत कशी करता येईल, याकडे ठाण्यातील पर्यावरण जनजागृती मंचने लक्ष वेधले. त्यातूनच रेन वॉटर हार्वेस्टिंगची कल्पना पुढे आली. २००३ पासून पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याच्या विषयाची जनजागृती सुरु झाली आणि अवघ्या तीन वर्षांत मंचच्या या कामाची युनिस्कोने सुद्धा दखल घेतली. त्यामुळे आजमतीस ठाण्यात बहुतांशी सोसायट्यांनी पाण्याची साठवणूक करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. परंतु, पर्यावरणाबाबत दक्ष असणे म्हणजे पाण्याची साठवणूक करणे, एवढेच नसते. हा तर केवळ एक भाग झाला.
आज पर्यावरणासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये डम्पिंग ग्राऊंड हा कळीचा मुद्दा झाला आहे आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न देखील सुरु आहेत. पंरतु, कचऱ्याने काय आताच जन्म घेतला आहे का? पूर्वीही कचरा होताच ना! मग त्याची विल्हेवाट कशी लागत असावी? पूर्वी खेड्यांमध्ये ‘उकीरडा’ नावाचा प्रकार होता. त्यात ग्रामस्थ कचरा टाकत असत आणि कालांतराने त्याचा वापर शेतीसाठी खत म्हणून व्हायचा. अगदी पारंपारकी पद्धतीने बनलेल्या या कचऱ्यामुळे जमिनीचा कसही अबाधित राहायचा. परंतु, आज ‘युरिया’ने जमिनीची प्रतही खलावली आिण उत्पन्नही कमी झाल्याचे दिसून येते. ज्या कारणासाठी उकीरडा ओळखला जात होता, ती संकल्पनाच आज लोप पावली आहे. एकेकाळी जे आपल्या अंगवळणी होते, ते सांगण्यासाठी आज सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुरडा करावा लागत आहे. ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणावर आज कोट्यवधी खर्च होत आहेत. ही प्रगती म्हणावी की अधोगती? निसर्गाशी मानवाचे असलेले नाते म्हणजे पर्यावरण. परंतु, आपण निसर्गापासून दूर लोटलो आहोत. मग पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही तर काय होणार. परिणामी आज निसर्गाचे चक्रही बदललेले दिसते. असह्य उकाडा हे त्याचेच प्रतिक आहे. अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ ही त्याचीच फळे आहेत. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जावे लागेल. कार्बनडाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण मानव जातीसाठी धोकादायक आहे. या कार्बनचे स्थितीकरण करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या हे अवाक्याबाहेर असले तरी जितकी जास्त झाडे असतील तितका कार्बन नियंत्रणात राहिल, हे समजायला कोणत्या रॉकेट सायन्सची गरज लागत नाही. हो पण त्यासाठी शाळा मात्र हवी, हे मान्य. आज शाळांमध्येही पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी भिंतीचित्रांच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. ठाण्यात तर पर्यावरण शाळा देखील आहे. ही एकप्रकारची अचिव्हमेंट म्हणावी. जो झोपलेला आहे, त्याला उठवता येऊ शकते, मात्र ज्याने झोपेचे सांेग घेतले आहे, त्याला उठवता येत नाही, अशी एक म्हण आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत तर सर्वांनी झोपेचे साेंगच घेतले आहे. त्यांना उठविण्यासाठी मोठ्या धक्क्याची गरज आहे. केवळ जनजागृतीने ही लोकं उठणारी नाहीत. आपण किती पाण्यात आहोत, हे समजावून सांगण्यासाठी, आपल्याला किती धोका आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी ‘पर्यावरण शाळां’ची आज चौकाचौकांत गरज आहे.