Saturday 5 September 2020

Right Speech, निब्बानच्च आरम्मणं करोति’ति ‘सम्मावाचा’


 
सम्मा म्हणजे सम्यक, जे मिच्छा नाही ते सम्मा होय. जे सर्वांगणी योग्य आहे, ज्यामध्ये अणुसमानही दोष नाही. ते म्हणजे सम्मा. बुद्धांनी सांगितलेल्या ‘अट्ठांगिको
मग्गो’ अर्थात अष्ठांग मार्गापैकी एक ‘सम्मावाचा’बद्दला आपण येथे चर्चा करणार आहोत. सम्मा वाचा ही अष्ठांग मार्गापैकी तिसरा मार्ग आहे. तत्पूर्वी, ‘सम्मादिट्ठी’, ‘सम्मासङ्कप्पो’ हे दोन मार्ग. या अष्ठांग मार्गावर चालून निब्बाणाचे धेय्य गाठता येते. येथे पहिला मार्गा ‘सम्मादिट्ठी’ आत्मसात केली की निब्बाण आपोआपच प्राप्त होते. परंतु, केवळ ‘सम्मासङ्कप्पो’ आहे, पण इतर मार्गक्रमण झालेले नाही, तर निब्बाणाचा साक्षात्कार होऊ शकत नाही. त्यासाठी सर्व मार्ग आत्मसात करणे गरजेचे असते. याच मार्गातील तिसरा मार्ग ‘सम्मावाचा’; जे निब्बाणाच्या दिशेने घेऊन जाईल, त्यांनाच सम्मा संबोधले जाते. मी सम्यक मार्गाने अर्थाजन करत आहे, त्यामुळे माजी उपजीविका ‘सम्मा’ आहे, या भ्रमात अनेकजण असतात. पण आपली उपजीविका निब्बाणाला घेऊन जाणारी आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल, तरच ती ‘सम्मा आजिविका’ ठरेल. असो.. येथे ‘सम्मा वाचा’वर बोलताना आधी वाचा म्हणजे काय? हे स्पष्ट व्हायला पाहिजे.

वाचा म्हणजे काय?

‘गिरीतिआदिसु वुच्चति’ति वाचा’ अर्थात शब्दी आदी उच्चारणे म्हणजे वाचा होय. ही वाचा शब्द, शब्दांनी बनलेले वाक्य आणि त्या वाक्यातून स्पष्ट होणारा बोध अशा क्रमाने व्यक्त होत असते.  

‘सम्मावाचा’ची व्याख्या

सम्मावाचा मिच्छावाचं तप्पच्चनीयकिलेसे च पजहति, निब्बानच्च आरम्मणं करोति, सम्पयुत्तधम्मो च सम्मा परिग्गण्हति तस्मा सम्मावाचा’ति वुच्चति.

‘‘सम्मावाचा ही मिच्छावाचाच्या प्रत्ययाने जे क्लेश उत्पन्न होतात, ते काढून टाकते, निब्बाणाला आलंबण (जे बोलणार आहे ते निब्बाणाला नेणारे आहे) बनवते. अशी वाणी जी धम्माशी संलग्न असते. (विखुरलेली नसते) आणि योग्य ते उंचावून धरते, त्याला सम्मावाचा बोलले जाते.’’

सम्मावाचा उंचावून धरण्याच्या अगोदर तिला आत्मसात करावे लागते. आत्मसात केल्यानंतर सतत सतत अनुभव करत एका विशिष्ट उंचीवर ठेवावी लागते. अशी वाणी जी पुन्हा खाली पडणार नाही. अर्थात पुन्हा मिच्छा होणार नाही, इतक्या उंचीवर तिला ठेवणे म्हणजे सम्मावाचा होय. यामध्ये चार प्रकार येतात

१) मुसावादा वेरमणी

२) पिसुणावाचा वेरमणी

३) फरुसवाचा वेरमणी

 ४) सम्फप्पालापा वेरणमी

यालाच वचीकम्म्परिसुद्धी देखील संबोधले जाते. पण जोपर्यंत मिच्छा काय, हे कळत नाही, तोपर्यंत सम्माचा बोध होत नसतो. म्हणून सुरुवातीला मिच्छावाचा येथे स्पष्ट करण्यात येत आहे.

मिच्छावाचा म्हणजे काय?

बुद्धांनी दहा दुचरित्त सांगितली आहेत, त्यापैकी वचीदुचरित्तमध्ये येणाऱ्या चार प्रकारच्या वाचा म्हणजे मिच्छावाचा होय. ‘मुसावादा, ‘पिसुणावाचा’, फरुसावाचा’ आणि ‘सम्फप्पालापा’ होय.

 मुसावादा म्हणजे काय?

एखादा व्यक्ती सभेत, परिषदेत, न्यायदान कक्षेत विपरित कथन करतो. उदा; माहित असेल तर नाही माहित आहे, असे बोलतो. माहित नसेल तर माहित आहे, असे बोलतो. अशाप्रकारे तो स्वत:च्या किंवा इतरांच्या हितासाठी जे सत्य आहे त्याच्या विपरित कथन करतो, असे जो करतो, तो मुसावादा करत असतो. मुसावादा पटिविरत म्हणजेच लांब कसे राहायचे? खोटे बोलण्याचा त्याग करायचा, त्यापासून अलिप्त रहायचे. सत्यावादी आणि प्रामाणिक राहायचे, म्हणजे मुसावादापासून पटिविरत राहायचे होय.  

 

खोटे बोलण्याचे काय परिणाम होतात?

एकं धम्मं अतीतस्स मुसादादिस्स जन्तुनो

वितिण्ण परलोकस्स नत्थि पापं अकारियं|| (धम्म्पद, लोकवग्गो.)

एका सत्य धम्माचे उल्लंघन करून जो खोटे बोलतो, तो परलोकापासून दूर होतो. असे कोणतेही पाप नाही जे तो करत नाही. अर्थात असा व्यक्त सर्व पाप करतो.

 

यो ब्राह्मणं समणं वा, अञ्ञ वापि वनिब्बकं।

मुसावादेन वञ्चेति, तं पराभवतो मुखं’’॥ (पराभवसुत्त)

जो ब्राम्हणाला, श्रमणाला किंवा इतर कोण्या गरीबाला खोटे बोलून फसवतो, त्याला पराभवाचे तोंड पहायला लागते. असा व्यक्ती निंदनास पात्र ठरतो. त्याची दुर्गती होती.

 

मुसावादाच्या संदर्भात बुद्धांनी आयुष्मान राहुलला उपदेश देताना सांगितले आहे की, ज्यांना जाणून-बुजून खोटे बोलण्याची लाज वाटत नाही, ते विश्वासास पात्र नसतात. बुद्धांनी हत्तीची उपमा देऊन हे स्पष्ट केले आहे. ज्याप्रमाणे युद्धातील हत्ती राजासाठी पुढील पायाने, मागील पायाने, शरिराने युद्ध करतो, पण सोंड खाली ठेवतो. असे हत्ती विश्वासास पात्र नसतात. पण जे सोंडेचाही वापर करतात, ते हत्ती विश्वासास पात्र असतात. ज्याला खोटे बोलण्याची लाज वाटत नाही, तो कोणतेही पापकर्म करत असतो, असे सांगत बुद्धांनी राहुलला हसत हसतही खोटे बोलले नाही पाहिजे, असा उपदेश दिला.

पिसुणावाचा म्हणजे काय?

पिसुणावाचा म्हणजे चुगली करणे होय. उदा; एखादा व्यक्ती भांडण लावण्याच्या उद्देशाने इकडून तिकडे सांगतो, तिकडचे इकडे सांगतो. एकतामध्ये भेद पाडतो. भांडणाचा आनंद घेतो. कलहामध्ये ज्याला आनंद वाटतो, असे करणाऱ्याला पिसुणावाचा करणारा व्यक्ती संबोधले जाते.

पिसुणावाचा पटिविरत म्हणजे लांब कसे राहायचे? तर चुगली करण्यापासून अलिप्त राहायचे. तुटलेल्या लोकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा, एकता भक्कम करायची, म्हणजे पिसुणावाचापासून लांब राहायचे होय.  

 

पिसुणावाचाचा परिणाम काय?

पिसुणेन च कोधेन च मिच्छरिना च विभुतनन्दिना

सखितं न करेय्य पण्डितो, पापो कापुरिसेन सङ्गमो||  

चुगली, क्रोध आणि मिच्छा चरियेने विना संकोच आनंदीत राहतो, त्याच्यासोबत पण्डित मैत्री करत नाहीत. संघामध्ये अशा व्यक्तीची घृणा केली जाते.

फरुसावाचा म्हणजे काय?

फरुसावाचा म्हणजे कठोर बोलणे होय. एखादा व्यक्ती असे काही शब्द बोलतो जे असभ्य, कठोर आणि इतरांचे मने दुखवणारे असतात. क्रोधासमान असतात. एकाग्रता भंग करणारे असतात, असे बोलणाऱ्याला फरुसावाचा करणारा व्यक्ती संबोधले जाते.

फरुसावाचा पटिविरत कसे राहायचे? कठोर बोलण्याचा त्याग करायचा, वाणी दोषरहित ठेवायची. प्रेमयुक्त आणि बहुजानांना प्रसन्न करणारी ठेवायाची, म्हणजे फरुसावाचापासून लांब राहायचे हाये. 

 

फरूसावाचाचा परिणाम काय?

मावोच फरुसं कञ्चि वुत्ता परिवदेय्यु तं

दुक्खा हि सारम्भकथा पटिदण्डा फुस्सेय्यु तं||  

 

कठोर वचन बोलू नये, कारण बोलल्यावर दुसरेही तुम्हाला तसेच बोलतील. असभ्य वचन दुक्खदायक असते. प्रत्युत्तर दाखल तुम्हालाही प्रतिदण्ड भोगावा लागेल.

 

सम्फप्पलापा म्हणजे काय काय?

सम्फप्पला म्हणजे व्यर्थ बडबड होय. एखादा व्यक्ती असे काही सांगतो, जे की, ज्याच्यामध्ये तथ्य नाही. अकालवादी आहे. धम्महिन आहे. विनयशीलही नाही. विनाकारण बडबड करतो, असे बोलणाऱ्याला सम्फप्पलापा करणारा व्यक्ती संबोधले जाते.

सम्फप्पलापा पटिविरत कसे राहायचे? अनावश्यक बोलण्याचा त्याग करायचा, प्रसंगाला अनुसरून बोलायचे. अर्थपुणे, धम्मवादी, विनयवादी वाचा ठेवायची, म्हणजे सम्फप्पालापासून लांब राहायचे होय.

 

सम्फप्पलापाचे परिणाम काय?

केव्हा काय बोलावे, याचे भान नसते. ज्याची वाचा अकालवादी असते, अर्थात काळ आणि प्रसंग पाहून बोलली जात नाही, अशा व्यक्तीला जीवालाही मुकावे लागते. हे वेदब्ब जातकातून दिसून येते. काळाला अनुरूप न बोलल्याने वेदब्ब ब्राम्हणाचा मृत्यू झाला होता. मंत्र उंचारून धनवर्षाव करण्याची कला अवगत असल्याचे त्याने चोरांना सांगितले आणि धनवर्षाव केला. परंतु, हीच कृती वेदब्बसाठी घातक ठरली. (क्रमश)