Thursday 17 March 2016

संदर्भ विरहीत मालिका ‘अशोका’


 ‘मांझी-द माऊटंन मॅन’, ‘निरजा’, ‘साला खडूस’, ‘मेरी कॉम’ सारख्या वास्तववादी चित्रपटांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. नाट्यक्षेत्रातही समाजाला दिशा देण्याचा ‘प्रयोग’ यशस्वी होत आहे. परंतु, सध्या टेलिव्हीजनवरील मालिकांनी आपली पट्टी सोडली आहे. कथानकाचा पार चोता होईपर्यंत ते चिघळले जात आहे आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवरील मालिकांची तर सहिंताही राहिली नाही. कोणतेही कुठेही संदर्भ जोडून ते प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत. विशेषतः महिलांच्या. कारण मालिका निर्मार्त्यांचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग कोण असेल तर त्या महिला.
टीव्ही मालिकांमध्ये कथानकाचा अत्तापत्ताच नसतो. रेटेल तशी मालिका पुढे रेटली जाते. पाट्या टाकण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. कुठूनही काहीही घुसडवणे ही मालिकांची ‘युएसपी’आहे. आणि आजचा महिलावर्ग या मालिकांमध्ये गुरफटला जातोय. पूर्वीच्या काळी महिलांना स्वातंत्र्य नव्हते. अमानुष नियम त्यांच्यावर लादले जायचे. केरमळमधील इझावास अशी एक अस्पृश्य जमात होती. या जमातीच्या महिलांना कंबरेवरील कपडे घालणे वर्ज्य होते. अर्थात लज्जा झाकण्याचीही त्यांच्यावर बंदी होती. याला मानुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणणेही कमी पडेल. निर्दयी, क्रुर आणि लांछनास्पद प्रकार आपल्या भारतात महिलांबाबत व्हायचे. सध्या महिलांवर अत्याचार होत असल्याची ओरड आहे. दिवसेंदिवस बलात्कारच्या घटना घडत आहे. कॉंग्रेस म्हणतेय भाजपाच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले; तर भाजपा म्हणते, कॉंग्रेसच्या काळात महिलांची सुरक्षा बिकट होती. हे फक्त टोलवाटोलवीची उत्तरे झालीत. पण वास्तविक पाहता, हजारो वर्षांपासून महिलांची अब्रु लुटली जात आहे, ती आजही सुरु आहे. फरक एवढाच पडलाय की, त्यावेळी महिलांना वाचा नव्हती, ती आज आहे. महिलांना सामजिक स्वातंत्र्य मिळाले आहे, पण या सामाजिक स्वातंत्र्यांचा महिला केवळ रटाळ मालिक पाहण्यात आपला वेळी घालवत आहेत. आजकालच्या निर्मात्यांनी महिलांची नस ओळखली आहे. त्यांनी ऐतिहासिक मालिकांमध्येही ‘घोटाळा’ सुरु केला आहे.
आजकालचे निर्माते ‘ही ही मालिका त्या त्या काळातील संदर्भ, लोककथा, काल्पनीकतेची जोड देऊन बनवलेली आहे, याचा वास्तवाशी संबंध नाही’ अशी मालिका सुरु होण्यापूर्वी सूचना देऊन मोकळे होतात. मध्यंतरी अकबरची मालिका फार गाजली होती. महिलांनी ही मालिका अक्षरशः डोक्यावर घेतली होती; ती यासाठी नव्हे की यातून अकबरचा इतिहास उलगडेल, उलटपक्षी बहुतांशी महिलांना या मालिकेली ‘सलीम’वर प्रेम जडले होते. पण कथानकात तारतम्य नसल्यामुळे ही मालिका फार काळ तग धरू शकली नाही. आता ही बाब कलर्स टीव्हीवरील सम्राट अशोकाच्या मालिकेबाबत सांगता येईल. सम्राट अशोकाने फक्त भारतावरच नव्हे तर जगावर आपली छाप सोडली. बौध्द धम्म स्विकारुन पंचशीलचा झेंडा अटकेपार रोवण्याची किमीया अशोकाने केली. पण सध्या त्याच्या नावावर सुरु असलेल्या मालिकेला कोणतेही तारतम्य उरले नाही. मुळात अशोकाबाबत इतिहासाकडे कमी माहिती उपलब्ध आहे; किंबहूना अशोकाचा इतिहास नालंदाच्या अग्नीमध्ये भस्मसातही झाला असेल. नालंदा विद्यापीठावर हल्ला केल्यानंतर भिक्षुंच्या कत्तली झाल्या, विद्यापीठ सहा महिने जळत होते, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे आता अशोकाच्या लहानपणाबाबतची माहिती तोटकीच उपलब्ध आहे. आणि कलर्स टीव्हीवरील प्रसारित होणार्‍या मालिकेच्या निर्मात्यांनी तर अशोकाचा नवा इतिहासच रचायला सुरुवात केली आहे. बिंदूसार राजा हा मुळात शुर-पराक्रमी होता, अशी वर्णने इतिहासात उल्लेखीत आहेत. पण या मालिकेमधील बिंदूसार हा इतरांच्या बुध्दीनूसार आपली मतं बनवणारा दाखवला आहे. त्यात मध्यंतरी चाणक्याचे विनाकारण घुसडवलेले पात्र न पचनी होते. सध्या हे पात्र जरी मृत असले, तरी वेळोवेळी चाणक्य होता; आणि तो अशोकाचा गुरु होता हे प्रक्षकांवर बिंबवण्याचा प्रयत्न वारंवार होताना दिसतो. मुळात अशोकाचा आणि चाणक्याचा केव्हाही संबंध आला नव्हता. अशोकाचे आजोबा, चंद्रगुप्त मोर्या यांचे ते राजकीय सल्लागार होते. अशोकाची ‘स्टोरी’ ही खरी बौध्द धम्म स्विकारल्यानंतर सुरु होते. भारताला आपल्या अधिपत्याखाली आणण्याच्या मनशाने त्याने स्वतःला युध्दात झोकून दिले. तर निर्णायक लढाई कलिंग या लोकशाहीपुरस्कृत गणतंत्र राज्यासोबत झाली. कलिंगनेही अशोकाला कडवी झुंझ दिली; पण विजय शेवटी अशोकाचा झाला आणि हाच अशोकाच्या लाइफमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा रक्तपात नको, अशी शपथ घेतल्यानंतर धम्माची कास धरली आणि प्रवास झाला तो विश्‍वशांतीचा. पण आज कलर्स मालिकेद्वारे अशोकाची प्रतिमा चुकीच्या पध्दतीने मांडण्याचा अट्टाहास होतोय. अशा अनेक मालिका आहेत, ज्या वास्तवाशी निगडीत असून काल्पनिक आहेत. तर काही काल्पनिक मालिकांच्या संहितेचा पत्ता नाही. पूर्वी जाचक अटी लादून महिलांना घरात बसवले जायचे. त्यांचे पाय दोरखंडाने बांधले जायचे. आता फक्त फरक एवढाच आहे की, या मालिकांनी त्यांच्या मनाला जेरबंद केले आहे. हा पिंजरा तोडण्याची आता गरज आहे. 

Wednesday 9 March 2016

आश्‍चर्य... ‘अभाविप’कडून मनुस्मृती दहन

रोहितची आत्महत्या, कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप, आणि त्याही अगोदर एफटीआयमध्ये गजेंद्र चौहानच्या नियुक्तीवरुन विद्यार्थ्यांचे चिघळलेले आंदोलन यामुळे देशातील विद्यार्थी ‘असहिष्णूते’च्या वातावरणात वावरत आहेत, हे प्रकर्षाने अधोरेखीत झाले आहे. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर नैराश्येची परिसीमा गाठल्यानंतर एखादी व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होते. फक्त प्रवृत्त होते; पण प्रत्यक्षात आत्महत्या करण्याची वेळ केव्हा येते? जेव्हा परिसीमाही आपली मर्यादा ओलांडते, तेव्हा एखादा आत्महत्या करतो. ही परिसीमा ओलंडण्यास एचआरडी मंत्रालयाने रोहितला प्रवृत्त केले; आणि या सर्वांच्या मुळाशी ‘अभाविप’ ठाण मांडून बसली होती. त्यामुळे खलनायकाच्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी ‘अभाविप’चा केविलवाना प्रयत्न महिलादिनी दिसून आला.

मुळात ज्या संघटनेवर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे प्रभुत्व आहे, ती संघटना संघाच्या अजेंड्यापलिकडे जाऊन एखादे पाऊल उचलते, हे पचनी पडले नाही. महिलादिनी अखील भारतीय विद्यार्थी संघटनेने मनुस्मृतीचे ‘काही’ पाने जाळून ब्राम्हण्यवादाचा जाहिर निषेध केला. या कृतीतून नक्की त्यांना काय साध्य करायचे होते? हे मात्र अस्पष्टच राहिले. मनुस्मृतीची केवळ ४० पाने त्यांनी जाळली, म्हणजे इतर पानांवर जे काही लिहले आहे, त्याचे ते समर्थन तर करत नाहीत ना? असा प्रश्‍न येथे उपस्थित झाला आहे. सर्वप्रथम मनुस्मृतीचा उगम कोठून झाला, हे माहिती असणे गरजेचे आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी युरेशियन वैदिक आर्यांनी येथील अनार्यांवर आक्रमन केले. ज्यांनी प्रतिकार केला, त्यांच्यावर अमानुष अटी लादल्या. जातींचा टॉवर उभा केला आणि अतिशय चतुराईने टॉवरला लिफ्टच बसवली नाही. मग जो ज्या मजल्यावर जन्मला, त्याने त्याच मजल्यावर मरावे, असा हुकूमच सोडला. ज्यांनी या व्यवस्थेला प्रखरतेने विरोध केला त्यांना बिल्डींगमधून लाथा-बुक्या मारुन हाकलले. पण पुन्हा विद्रोह नको म्हणून मनुने पीडित समाजावर अतिशय घाणेरडे आणि क्रुर नियम लादले. ते नियम म्हणजेचे मनुस्मृती. या मनुस्मृतीने पीडित वर्गांवर अमानुष अत्याचार केले. या अत्याचाराचे वर्णन करायचे झाले, तर अमानुष, क्रुर सारखे शब्दही तोकडे पडतील. हजारो वर्षांपासून मनुस्मृतीने बहुजनांच्या उरावर ‘तांडव’नृत्य केले. पण जसे सुर्याच्या पहिल्या किरणाने अंधकार नाहीसा होतो, तसे प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करुन जातीव्यवस्थेलाच आव्हान दिले. तत्कालीन वेळी उच्चवर्णियांनी बाबासाहेबांच्या या कृतीचा विरोधच केला होता; पण ते न डळमळता लढले, आणि संविधानाने मनुस्मृतीला केव्हाच उन्मळून फेकून दिले. पण देशात मनुस्मृतीच्या पावलावर पाऊल टाकणारे आजही आहेत, हे कन्हैयाच्या प्रकरणावरुन दिसून आले. कन्हैयाने अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उपयोग करत देशात चाललेल्या गंभीर प्रश्‍नांवर बोट ठेवले. रोहित वेमुला हा पीएचडीचा विद्यार्थी; त्याची फॉलोशीप थांबवली; एचआरडी मंत्रालयाने त्याच्याविरोधात हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवले; मग जेव्हा सरकारच तुमच्या विरोधात उभे राहते, तेव्हा या देशातील लेकरांनी जायचे कुठे? पाकिस्तानात? आहो... ते तर सीमेवरच गोळ्या झाडतील; कारण त्यांना माहित आहे की ही मुलं भारतीय आहेत! रोहित आत्महत्या प्रकरणाची झळ जेएनयूपर्यंत पोहचली. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला देशविरोधी घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक केली; पण जेव्हा ही केस दिल्ली उच्च न्यायालयात गेली, सुनावनीवेळी न्यायालयानेच पोलिसांना फटकारले. देशद्रोहाचा अर्थ कळतो का? असाच खडा सवालच हायकोर्टाने पोलिसांना केला, आणि दुसर्‍या दिवशीच कन्हैयाची जामीनावर सुटका झाली. पण त्याच्या सुटकेने चवताळलेल्या भाजपाच्या एका युवा नेत्याने ‘कन्हैयाची जीभ कापणार्‍याला ५ लाखांचे बक्षीस’ अशी जाहिरातबाजी केली. योगायोगाने अस्पृश्यांनी संस्कृत वचन बोलले तर त्याची जीभ छाटावी, असा वटहूकुम मनुस्मृतीत उल्लेखीत आहे. म्हणजे आरएसएसची एक विंग मनुस्मृतीनूसार कन्हैयाची जीभ कापण्याचे फर्मान सोडतेय, तर दुसरी विंग महिलांबद्दल अपशब्द बाळगणार्‍या मनुस्मृतीचे दहन करतेय. हा विरोधाभास नव्हे का?  आता देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका लागल्या आहेत. आणि भाजपाला आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायाची आहे. रोहित वेमुलाची आत्महत्या, कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप या दोघांचे पडसाद या निवडणुकीच्या निकालावर उमटणार आहेत, हे संघाने चांगले ओळखले आहे. सध्या कन्हैयाचा बोलबाला आहे. देशातील विद्यार्थ्यांसह सामान्य जनताही कन्हैयाच्या बाजूने आहे. त्यामुळे बहुजन समाजाला आपल्याकडे खेचण्याची राजनीती भाजपाला करावी लागणार आहे. त्याचीच सुरुवात मंगळवारी महिलादिनी दिसून आली. ‘अभाविप’ या संघाच्या एका विंगने मनुस्मृतीला विरोध करुन आम्हीही बहुजनांना गुलामीची वागणूक देणार्‍या मनुस्मृतीचा निषेध करतो, हा दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे.

Wednesday 2 March 2016

‘त्यांची’ पोळी भाजावी, म्हणून आम्हीच पेटवतोय ‘चूल’

‘सेक्सपिअर’ एक ‘वादळी’ नाव... हे नाव आज साहित्यक्षेत्रात अच्युत्य मानाने घेतले जाते. पंधराशेच्या शतकात त्यांनी रचलेल्या कथा आजही जीवंत आणि चालू घडामोडीशी निगडीत वाटतात. आई मुलाचे प्रेमसंबंध पण ते ‘त्या’ वेगळ्या अर्थाने मांडणारा सेक्सपिअर पंधराशेमध्ये जन्मला. एका स्त्री-पुरुषाचे नाते हे कशा पध्दतीने बदलू शकते, हे त्याने आपल्या कथांमधून वेळोवेळी मांडले; पण सेक्सपिअरच्या कथांचा वास्तवाशी संबंध लावताना भारतीयांना थोडे जड जाते. कारण ‘मुक्त’नातेसंबंध तर सोडाच, येथे महिलांना न्यायहक्कांसाठी आंदोलने उभे करावे लागत आहेत.
अगदी ‘रानटी’काळाचा अभ्यास केला असता, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मानव गुफांमध्ये वास्तव करत होता, तेव्हाही स्त्री ही प्रजनन करणारी वस्तू आणि संघ वाढवणारी मशीन म्हणून तिचा वापर होत होता. त्यावेळी महिलांचे अपहरण हे सर्रास व्हायचे. ज्याचा ‘गट’ मोठा, तो नेता...आजही थोड्याबहुत फरकाने हेच सुत्र वापरले जाते. असो, शिकार करुन उपजीविका भागवत असताना मानवाला शेतीचा शोध लागला. आता हे वेगळे सांगायला नको की, शेतीचा शोध हा एका स्त्रीने लावला. स्त्रीने शेतीचा शोध लावला आणि नव्या क्रांतीला सुरुवात झाली. शेतीचे तंत्र पुरुषांनी स्त्रीकडून शिकून घेतले; आणि पुन्हा स्त्रीला गुलाम बनवले. ही गुलामी आजही कायम आहे. केवळ गुलामीची परिभाषा बदलली आहे.
हाजीआली दर्गा आणि शनिशिंगनापूरच्या वादावरुन स्त्री गुलामी पुन्हा अधोरेखीत झाली. नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश ते शनिशिंगनापूर चौथारा दर्शन, या ७० वर्षांच्या काळात भारतीयांच्या मनात ‘रिव्हॉलूशन’ खरेच झाले का? हा संशोधनाचा विषय आहे. अस्पृशांना येथे ‘हक्क’ म्हणजे काय? ‘न्याय’ कशाला म्हणतात? हेच माहित नव्हते. पण शिवरायांनी त्यांना सन्मान दिला, मान दिला. आता ही वेगळी गोष्ट आहे की, तो सन्मान काय फार काळ टिकू शकला नाही. पेशवाई आली आणि गुलामी पुन्हा सुरु झाली. याआधीही त्यांच्या आयुष्यात सन्मानाचे काही ‘दिवस’ आले होते. उदा. बुध्दांचा काळ, सम्राट अशोकाचे शासन, ब्रुहदत्त, कृष्णा, कनिष्क असे बौध्द राजे होऊन गेले, ज्यांनी आपल्या साम्राज्यात समानता प्रस्तापित केली. पण क्रांतीनंतर प्रतिक्रांती झाल्यामुळे एक वर्ग नेहमी अन्य वर्गाच्या अधिपत्याखाली राहिला. मोगलांच्या साम्राज्यातही अस्पृश्यांची अवस्था वाईटच होती. कारण वर्णव्यवस्था अबाधित होती. पण ब्रिटीशांचे शासन आले आणि आम्हीही माणूस आहोत, याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. अन् लढा झाला तो १ जोनवारी १८१८ चा! पेशवाई संपली. पण सामाजिक समता यायला थोडा वेळ लागलाच. महात्मा जोतीराव फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली आणि त्यांचा समाजकार्याचा वारसा डॉ. बाबासाहेबांनी पुढे चालवला. त्यांनी १९३० मध्ये मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारले. काळाराम सत्याग्रह केला. तेव्हा आंदोलन झाले, हे समजू शकते, पण आता मंदिर प्रवेशासाठी भारतात आंदोलने होत आहेत, ही लज्जास्पद बाब नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक प्रश्‍नांना वाचा फोडल्या आणि सरतेशेवटी समाजव्यवस्थाच बदलून टाकली. संविधानाच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून सुरु असलेली ‘कु’व्यवस्थेला धुळ चारली. आजच्या घडीला अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. तरीही शनी चौथार्‍यासाठी महिलांना आंदोलन करावे लागत आहे. महिलांच्या मासिक धर्मावेळी त्या मंदिराबाहेर राहतात. मग ही अस्पृश्यता नव्हे का?
मुंबईतील सीएसटी फॅशन स्ट्रिटला लागूनच जैन धर्मियांसाठी एक पाणपोई आहे. येथे बिगर जैन नागरिकांना पाणी पिण्यास मज्जाव केला जातो. पूर्वी अस्पृश्यांनी सार्वजनिक पाणवठा येथून चुकून पाणी जरी प्यायले, तर त्याची खैर नसे. आता फक्त विनंतीपूर्वक नकार दिला जातो, एवढाच काय तो बदल झालेला आहे. महिला मासिक‘धर्मा’वेळी मंदिरात जाणे टाळतात. ही एकप्रकारची मानसिक गुलामी नव्हे का! महिलांना पाळी येणे ही एक नैसर्गिक बाब आहे, मग न्यूनगंड का बाळगावा? आणि त्याचा मंदिरात न येण्याचा काय संबंध? म्हणजे तुमचा देव इतका कमकूवत आहे का की त्याला एका महिलेच्या स्पर्शाने विटाळ होईल? अशूध्द होईल? मुळात दगड बाहेरचा असो वा आतला, तो कोणत्याही अर्थी शुध्द अथवा अशुध्द होऊच शकत नाही. पण आपली पोळी भाजण्यासाठी काहींनी आपला ‘तवा’ शेकायला ठेवला आहे; आणि नकळत आम्हीही त्यांची ज्या चूलीवर पोळी भाजली जात आहे, त्याला अग्नी देण्यासाठी लाकडांचा पुरवठा करत आहोत.