Friday 29 January 2016

दगडाच्या पायी माथा; हट्ट कशाला?

संस्कृतीच्या नावावर आज जे काही घडत आहे, ते धक्कादायक आणि चीड आणण्यासारखे आहे. गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगनापुरचा वाद ज्वालामुखीसारखा महिलांच्या मनात धगधगत आहे. त्याचा उद्रेक प्रजासत्ताकदिनी झाला. भुमाता संघटनेच्या महिलांचे आंदोलन जरी फसले, तरी त्यांच्या आंदोलनाची दखल खुद मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली, हा त्यांचा एकप्रकरे विजयच म्हणावा लागले. पण या सर्व कवायतीमुळे काय साध्य झाले? मुळात विषय हा चौथार्‍याचा नसून समानतेचा आहे. पण जी व्यवस्था ही समता नाकारते, त्याच व्यवस्थेच्या पायी माथा ठेवण्याचा कशासाठी हवाय अट्टाहास?
मंदिर कोणतेही असो, महिलांच्या प्रवेशाबाबत एक नियमावलीच मनुवाद्यांनी आखली आहे. त्या नियमावलीचे पालनही महिला तंतोतत करताना दिसतात. संस्कृतीच्या नावे हे सर्व खपतेही. पण आपली संस्कृती काय? याचा मात्र कोणालाही पत्ता नाही. जो-तो रुढी पंरपरेनुसार पायंडा पाडलेल्या चालीरितींचे आंधळे पणाने समर्थन करताना दिसत आहे. मानवाच्या आयुष्यात पुजा-अर्चा हा भाग का आणि केव्हा आला? याचे मात्र कोणीही उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. सुमारे ५ हजार किंवा त्याही वर्षांअगोदर पुजाची कन्सेंप्ट रुजली असावी. तत्कालीनवेळी आत्ताचे सारखे तथाकथीत ‘देव’ नव्हते. तेव्हा सामान्यतः निसर्गाची पुजा केली जायची. पाऊस, ऊन, वारा, श्रृतू या निसर्गाच्या संपत्तीबद्दल मानवाला ज्ञान नव्हते. साधा पाऊस पडला तरीही तो चमत्कार वाटे, अशी परिस्थिती होती. कोणी जंगलाची पुजा करे, कोणी पवर्तांची! अज्ञानामुळे जन्म घेतलेल्या या पाच हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची आजही जोपासना केली पाहिजे का? अर्थात नाही, कारण त्यावेळचे अज्ञान आज दुर झाले आहे. मग आत्ता विज्ञानाच्या युगात कशाला हवेय असली संस्कृती?
गुरुवारी (२९, जाने.२०१६) पुण्यात मोहन भागवतांनीही संस्कृतीच्या नावावर मंदिरं बांधण्याच्या मुद्दाला समर्थन दिले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात भागवतांना विद्यार्थ्यांनी थेट राम मंदिर कशासाठी? त्यामुळे गरीबांना जेवन मिळेल का? हा प्रश्‍न केला. खरे म्हणजे मंदिरामुळे कोणाचे पोट चालते, हे वेगळे सांगायला नको. पण मंदिरामुळे गरीबांच्या घराची चूल पेटत नाही, हे मात्र वास्तव्य आहे. किंबहूना ज्या चुलीत अर्ध जळते विस्तव आहेत, त्यावरही पाणी फेरण्याची वेळ येते.
राम मंदिराचा मुद्दा भाजपा सरकार प्रत्येकवेळी उपस्थित करत होते; त्या आधारावर मतंही मागितली जात होती. ‘राम मंदिर वही बनायेगे’ अशा वल्गनाही काहींनी केल्या होत्या. मग आता केंद्रात सत्ता आहे ना! का नाही होत राम मंदिर? कारण मुद्दा हा राम मंदिराचा नाहीच, तर जनतेला उल्लू बनविण्याचा आहे. आज देशापूढे अनेक ज्वलंत विषय आहेत. पण संघ मंदिर, संस्कृती याच्यापलीकडे भाषा करताना दिसत नाही. एखादवेळी देशाच्या विकासाची बाब निघते, पण विकास नक्की कोणाचा? हा प्रश्‍न उपस्थित होतो.  देशापुढे आज पाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. गरीबी, बेरोजगारी, सर्वसामान्यांच्या अवाक्यात बसेल असा निवारा, शिक्षण आदी समस्या देशाला आजही भेडसावत आहेत. डॉ. आंबेडकरांनी नद्याजोड प्रकल्प राबवा, अशी मागदर्शक सूचना केली होती. ही १९५० च्या दशकातील कल्पना होती. आज २०१६ उजडले आहेत. अर्थात तंत्रज्ञान क्षेत्राने अमुलाग्र प्रगती केली आहे. पण आजही नद्याजोड प्रकल्प धुळखात पडला आहे. आज भारताला कोणत्या मंदिराची गरज नाही, ना कोणत्या ‘धर्मा’ची! अर्थात धर्म म्हणजे संप्रदायाची. देशाला संप्रदयामध्ये विभागुन टाकले आहे, त्यामुळे प्रगती खुंटली आहे.