Monday 14 November 2016

शिक्षणासाठी ‘करुणा’मय फुंकर

सर्व शिक्षा अभियानांतर्गत सरकारने मोफत  आणि सक्तीचे शिक्षण केले. शिक्षणगळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर जनजागृती अभियानही राबविले, मात्र तरीही शिक्षणगळती काही थांबली नाही. सक्तीचे शिक्षण असूनही आजही अनेक मुलं डम्पिंगवर कचरा वेचताना दिसतात. तर कुठे विटभट्टीवर काम करताना दिसतात. घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या या मुलांना दोन वेळचं काही मिळतेय का, याची भ्रांती लागलेली असते. यातूनच अल्पवयीन गुन्हेगारीही वाढत आहे. त्यामुळे उद्याचे भविष्य असलेल्या या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचा विडा काही सामाजिक संस्थांनी उचलला आहे. आजच्या बालदिनाचे औचित्य साधून मुलांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी युद्धपातळीवर स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्यांविषयी हा लेख. 
शिक्षणगळीतीची आकडेवारी काढायची असेल तर मुंबईतील झोपडपट्ट्या चाळल्या तर लगेच मिळेल. मुंबईतील बहुतांशी झोपडपट्टीमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यातही डम्पिंग परिसरात राहणाऱ्या मुलांनी शाळाही पाहिली नसेल. याच मुलांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले जाते. त्यांना बालमजुरीकडे ढकलले जाते. प्रगतीचा आव आणणाऱ्या आर्थिक राजधानी मुंबईचे हे कटू सत्य आहे. परंतु, या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ‘कारुण्या’ ट्रस्टच्या मार्फत होत आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ही संस्था झटत आहे. शिक्षणासह पोषक आहारावरही या संस्थेचा भर आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी या संस्थेने गोवंडीत ‘ज्ञानसाथी’ ही शाळा सुरु केली. उद्देश होता येथील मुलांचा सर्वांगिण विकास करायचा. मग संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी डम्पिंग परिसरात जाऊन मुलांच्या पालकांचे पहिले समुपदेशन केले. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी खेळाच्या माध्यमातून सुरुवात झाली. खेळाबरोबर पौष्टीक आहार मिळताेय, म्हणून मुलंही आकर्षित होऊ लागली. मग मुलांना मुळपदावर आणण्याचे काम सुरु झाले. ‘जो खड्ड्यात आहे, त्याला खड्ड्यात राहू दे, आम्ही अन्नपुरवठा करतो’, अशी काहींची प्रवृत्ती असते. म्हणजे मुलांना आश्रय देणे आिण त्यांच्या नावावर फंड गोळा करणाऱ्या अनेक संस्था आज आपण पाहत आहोत. त्यापैकी काही बोगसही आहेत. केवळ फंड मिळवणे हा त्यांचा धंदा. पण कारुण्या ट्रस्ट याला अपवाद आहे. मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी शिक्षणाला प्राथमिकता दिली. आज ‘ज्ञानसाथी’तील मुलं चांगली शिक्षीत झाली आहेत आिण या संस्थेचे कार्य आजही अविरत सुुरु आहे. आज या संस्थेच्या माध्यमातून ३५० मुलांना दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जात आहे. सोबतच पोषक आहारह पुरवला जातो. ज्ञानसाथीने आपली एक शाखाही स्थापन केली आहे. ‘ज्ञानसाथी-१’ मध्ये २०० मुलं आिण ‘ज्ञानसाथी-२’ मध्ये १५० मुलांना शिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे.
शिक्षणाबरोबर या मुलांना कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. बॉलीवूड कलाकारांनीही ‘कारुण्या’च्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. केवळ शिक्षण ही आजची परिस्थिती राहिली नाही. शिक्षणाबरोबर क्रीडा­-कलामध्येही मुलांना विकसित करणे गरजेचे आहे. दुर्देवाने पालिकांच्या शाळेमधून असे होताना दिसत नाही. ‘कारुण्या’ने डम्पिंग परिसरात राहणाऱ्या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. ही त्यांची अचिव्हमेंट आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी ‘कारुण्या’चे स्वयंसेवक डम्पिंग परिसरात जाऊन मुलांच्या पालकांचे समुपदेशन करत होते. मुलांचे शिक्षण का महत्वाचे आहे, हे पटवून देत होते. त्यानंतर या ‘उनाड’ मुलांना शिक्षणाची गोडी लावणे, हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते. लहानपणापासूनच अशिक्षित राहण्याचा ‘संस्कार’ खोडून काढण्याचे दिव्य काम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. हे करत असताना कार्यकर्त्यांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागला. परंतु, कार्यकर्त्यांचे अधिष्ठान पक्के असल्यामुळे आज ही संस्था यशाचे शिखर गाठू शकली आहे. ‘कारुण्या’च्या या प्रयत्नांना आज यशाची फळे आली आहेत. गतवर्षी राज्यात शिक्षणगळती झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १.६ कोटी होती. मुंबईतही शिक्षणच न घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, कारुण्या सारख्या संस्थांमुळे हे प्रमाण निश्चितच कमी होत आहे.
कारुण्या ट्रस्टप्रमाणेच कर्जत आदिवासी पाड्यातही एक संस्था गरीब-गरजु मुलांना शिक्षण देण्यासाठी झटत आहे. गेल्या ३ वर्षांपासून आदिवासी पाड्यांवर ‘अर्थ’ संस्था काम करत आहे. कर्जत तालुक्यातील डोनेवाडी या आदिवासी पाड्यात ही संस्था कार्यरत असून येथील मुलांना मोफत प्राथमिक संगणक प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या पाड्यात प्राथमिक शाळेचा केवळ एक वर्ग असून यामध्ये पहिली ते चाैथीच्या विद्यार्थ्यांना एकाच खोलीमध्ये बसवले जाते. या चार वर्गांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक. तोही नेहमी गैरहजर असतो. ‘सर्व शिक्षा अभियाना’चे हे कटू वास्तव आहे. परंतु, या मुलांचा शैक्षणिक विकास करण्याची जबाबदारी ‘अर्थ’ या संस्थेने उचलली आहे.