Thursday 11 July 2019

Learn Pali ‘पालि शिका, धम्म जाणा’

‘धम्म हवे रक्खन्ति धम्मचारि’ अर्थात जो धम्माचे आचरण करतो, त्याचे धम्म रक्षण करत असतो. पण धम्माचे आचारण करणे म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर बुद्धांनी अनेक सुत्तांमधून दिले आहे. या जगात प्रत्येकाला काही ना काही दुक्ख आहे, आणि प्रत्येकाच्या दुक्खाचे निवारण करण्याचा मार्ग बुद्धांकडे आहे. पण बुद्धांपर्यंत पोहचायचे कसे? तर त्याचे सोपे उत्तर आहे, बुद्धांनी दिलेल्या उपदेशांमधून होय. बुद्धांचे सर्व उपदेश हे पालि भाषेमध्ये आहेत. त्यामुळे हे उत्तर शोधणे तितके सोपे नाही. कारण ही भाषा आज वापरात नाही. त्यामुळे धम्म जाणून घ्यायचा असले, तर प्रत्येकाला पालि भाषा येणे गरजेचे आहे.
बुद्धांचा धम्म जाणून घ्यायचा असेल तर पालि भाषा येणे तितके गरजेचे आहे का? कारण अनेक विद्वानांनी बुद्धांनी दिलेले काही सुत्त मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर केलेले आहेत. पण भाषांतर झालेल्या उपदेशांना परिपूर्ण म्हणावे का? तर उत्तर आहे नाही, कारण पालि भाषेच्या तोडीस जगाच्या पाठिवर अशी कोणतीच भाषा नाही, जी बुद्धवचनाला न्याय देऊ शकेल. कारण बुद्धांनी पालि भाषेत दिलेली सुत्त तंतोतंत भाषांतर करणे कठिण काम आहे.  उदा, ‘मेत्ता’ शब्दाचे जेव्हा मराठीत भाषांतर होते, तेव्हा सर्रास त्याला मैत्री संबोधले जाते. पण मराठीमध्ये मैत्री म्हणजे व्यक्तींव्यक्तींमधील आनंदपूर्ण व्यवहार होय. येथे एकमेकांमप्रती आसक्ती अभिप्रेत असते. परंतु, मेत्ता म्हणजे पृथ्वीतलावरील सर्व जीवमात्रांचे मंगल व्हावे, ही भावना मनामध्ये कोणतीही आसक्ती न ठेवता बाळगणे. त्यामुळे जेव्हा पालिचे इतर भाषेमध्ये भाषांतर होत असते, तेव्हा त्यातील मर्म निघून जातो.
अस्सद्धो अकतञ्‍ञू च, सन्धिच्छेदो च यो नरो।
हतावकासो वन्तासो, स वे उत्तमपोरिसो॥
धम्मपदातील अरहंतवग्गामधील ही गाथ आहे. येथे बुद्ध जो अश्रद्धावान आहे, त्याला उत्तम पुरुष म्हणत असल्याचे म्हटले आहे. परंतु, येथे अश्रद्धावान म्हणजे चिकित्सक वृत्तीचा अर्थ अभिप्रेत आहे. ही गाथा बुद्धांनी सारिपुत्तच्या संदर्भात म्हटली असून येथे ‘वन्तासो’ हा शब्द अरहंतसाठी समानार्थी शब्दप्रयोग आला आहे. सन्धिच्छेदो अर्थात त्यांनी आता पुन्हा जन्म घेण्याचा छेद केला आहे. असे जे बारकावे आहेत, ते पालि शिकल्याशिवाय येत नाहीत.
मग ही भाषा कोठे शिकायला मिळणार? हा देखील एक प्रश्नच आहे. कारण आपल्याकडे अशी संस्था किंवा संघटना नाहीच की जे पालिचे ज्ञान देऊ शकेल. पण असे नाही. मुंबई विद्यापीठातील पालि विभाग यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.     
मुंबई विद्यापीठात पालि विभागाची स्थापना होऊन आज १२ वर्षे झाली आहेत आणि या विभागाच्या माध्यमातून पालिचे सर्वांगिण ज्ञान देण्याचे अविरत कार्य सुरु आहे. विशेष म्हणजे पालि विभागात विद्यार्थ्यांना शिकवणारे सर्व ऑक्स्फर्ड विद्यापीठाकडून प्रशिक्षित झालेले शिक्षकवर्ग आहेत. पालि विभागाच्या वाचनालयात सुमारे २ हजारांहून अधिक पुस्तकांचा भरणा आहे. विपस्सना रिसर्च इन्स्टि्युट आवृत्तीचे संपूर्ण तिपिटक, नालंदा आवृत्तीचे तिपिटक, मूळ पालि आणि हिंदी भाषांतर, मूळ पालि आणि मराठी भाषांतर तसेच मूळ पालि आणि इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहेत. विविध शब्दकोष, पुरातत्व विभागाचे अहवाल, ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागाने केलेल्या अहवालांची प्रत आणि असे बरेच काही पालि विभागाकडे संग्रहित असून अभ्यासू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पालि विभाग म्हणजे ज्ञानाचा भंडारच आहे.
पालि विभागात केवळ अॅकॅडमीक शिक्षणावर भर दिला जात नाही, तर विद्यार्थ्यांकडून अनेक उपक्रमही करूवून घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. विभागामध्ये प्रत्येक पोर्णिमेला धातूपूजा घेतली जाते. या धातुपूजेवळी एक वेगळेच वलय निर्माण होत असते. सुमारे दीड तास चालणाऱ्या पूजादरम्यान विपस्सना करतानाचाही अनुभव निराळाच असतो, जो शब्दांमध्ये माडणे शक्य नाही.
सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम पालि विभागाच्या विद्यार्थ्यांकडून होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सलग १२ तास अभ्यासिका राबवून खऱ्या अर्थाने पालि विभागात बाबासाहेबांची जयंती साजरी होत असते. तर बाबासाहेबांच्या महापरिनिब्बाणादिवशी देखील चैत्यभूमीवर पालि विभागाचे विद्यार्थी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सेवेसाठी तत्पर असतात. आजपर्यंत कोणत्याही संस्था अथवा संघटनेने काम केले नाही, असे काम पालि विभागाचे विद्यार्थी येथे करत असतात. येथील येणाऱ्या प्रत्येकाकडून एक सर्व्हे फॉर्म भरवून घेतला जातो. या फॉर्मच्या माध्यमातून समाजामध्ये किती जनजागृती झाली आहे, शिक्षणाचा दर्जा कुठे आहे इत्यादी सर्व माहिती उपलब्ध होते आणि येथे येणाऱ्यांना पालि भाषा शिकवण्यासाठी प्रेरित केले जाते. 
पालि विभागातील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी किंबहुना वर्षातून दोन वेळा अभ्यासदौरा आयोजित केला जातो. बौद्धकालीन ऐतिकासिक स्थळांना भेटी देऊन त्या स्थळांची इतंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. या स्थळांचा अभ्यास कसा करायचा? एखाद्या लेणीवर अथवा बौद्धकालीन ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर नेमके काय पाहायचे, याचे ज्ञान या अभ्यासदौऱ्यातून होत असते.
१४ ऑक्टोबर, धम्मदिक्षा दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर राईटींग अॅण्ड स्पिचेस या गंथ्रावर आधारित दोन दिवसीय पोस्टर सादरीकरण कार्यक्रम आखला जातो. बाबासाहेबांच्या लिखाणाचा संदर्भ घेत कलात्मक पोस्टर प्रदर्शन आणि सादरीकरण या दिवशी होत असते. मुंबईत अशी कोठेच साजरी होत नाही, इतकी भव्यदिव्य बुद्धपोर्णिमा पालि विभागात साजरी केली जाते. तीन ते चार दिवसीय विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आशियाई बौद्ध राष्ट्रांमध्ये ज्याप्रमाणे बुद्ध पोर्णिमा साजरी होते, त्या तोडीस येथे समारंभ आयोजित केला जातो आणि कार्यक्रमाच्या शेवटी विद्यापीठाचा परिसर असंख्य दिव्यांनी खुलून दिसतो. विद्यार्थ्यांद्वारे येथे दिवे लावले जातात आणि बुद्ध पोर्णिमा कार्यक्रमाचा समारोप होतो.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना मिळावी, विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादर करण्याची वेळोवेळी संधी दिली जाते. वर्षभरामध्ये असे अनेक उपक्रम हाती घेतले जातात, जे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वृद्धिगत करतात.
सध्या पालि विभागामध्ये दहावी, बारावीनंतर बी.ए., तर पदवीनंतर एम. ए., तसेच पोस्ट ग्रॅज्युएट अॅडव्हान्स डिप्लोमा, एम.फिल, पीएचडी इत्यादी उच्च शिक्षणाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोईस्कर पडले, अशी वेळरचना करण्यात आलेली आहे. सोबतच ज्यांची दहावी झाली आहे किंवा बारावी झाली आहे, त्यांच्यासाठी एक वर्षीय प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. यामध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडिज, विपस्सना थेरी अॅण्ड प्रॅक्टिस, परियत्ती अॅण्ड पतिपत्ती असे विविध कोर्सेस उपलब्ध आहे. ज्यांची कलेमध्ये आवड आहे, त्यांच्यासाठीही आर्ट अॅण्ड कल्चर डिप्लोमा कोर्स उपलब्घ आहे. दरवर्षी दोन दिवसीय ब्राम्ही लिपी कार्यशाळा होत असते. त्यामुळे येथे केवळ पालिचेच ज्ञान मिळत नाही, तर सर्वांगिण ज्ञान मिळत असते. त्यामुळे शुद्ध स्वरुपात धम्म जाणून घ्यायचा असेल, तर मुंबई विद्यापीठ,पालि विभाग एक उत्तम पर्याय आहे. जोपर्यंत पालि भाषा अवगत होणार नाही, तापर्यंत धम्म समजणे अवघडच आहे. डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते भारत बौद्धमय करण्याचे, पण हे स्वप्न पालि शिकण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून वेळ न दवडता ज्यांना बुद्धांचा धम्म जाणून घ्यायचा आहे, त्यांनी पालि विभागामध्ये आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा आणि आत्म कल्याणासह इतरांच्या कल्याण साधण्यास पुढाकार घ्यावा.  ज्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावयाच्या आहेत, त्यांचे पालि विभागातर्फे नेहमीच स्वागत आहे. 

No comments:

Post a Comment