Tuesday 24 September 2019

मोर्यकालीन स्तुपाचे संवर्धन हे कर्तव्यच!

इतिहासाच्या पानांतील मजकुर आणि त्याच्या सत्यतेची पाडताळणी करावयाची असेल, तर त्या काळातील ‘हेरिटेज’ वास्तुंचा अभ्यास करावा लागतो. शिलालेख, नाणी, नाण्यांवरील बोधचिन्हे आदींच्या सखोल अभ्यासानंतर इतिहासाला भक्कम पुरावा मिळतो. हे पुरावे कधी थेट जंगलाआड, डोंगरात दडलेले असतात तर कधी मातीच्या कुशीत आपल्या शोधकर्त्याची वाट पाह
त असतात. त्याला हुडकून काढण्याची आणि नवा इतिहास जगासमोर मांडण्याची जबाबदारी ही त्या त्या पिढीच्या खांद्यावर असते. पण भविष्यातील संशोधकांसाठी आपण त्यांच्या अभ्यासाचा अधारच नष्ट करत असू, तर त्यापैक्षा दुर्देव दुसरे काय असेल.
दिल्लीतील सहाशे वर्षांपूर्वीचे रविदासांचे मंदिर असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असो, सरकारने या ऐतिहासिक वास्तु जमिनदोस्त केल्या. ऐतिहासिक वारसे जपण्यात सरकारला किती स्वारस्य आहे, हे या दोन उदाहरणांवरून स्पष्ट झाले. पण येथे विषय निघाला तो महाराष्ट्रातील मौर्यकालीन भोन स्तुपावरून. भोन स्तुप नष्ट करण्याच्या मार्गावर सरकार असून हे स्तुप वाचवण्यासाठी लढा तीव्र झाला आहे. 

मौर्यकालीन साम्राज्याचा इतिहास जगासमोर मांडला तो भारतीय पुरातत्व विभागाचे जनक सर अलेक्झेंडर कनिंग्हॅम यांनी. चीनी प्रवासी ह्युयेनस्तांग यांच्या डायरीमुळे त्यांना तत्कालीन भारताचा भुगोल समजला. ह्युयेनस्तांग भारताच्या भ्रमंतीवर ६ व्या शतकात आले होते आणि त्यांनी भारताचे वर्गीकरण पूर्व, पश्िचम, उत्तर दक्षिण आणि मध्य भारत असे केले आहे. आजही त्याच वर्गीकरणानुसार भारताचे वर्णन केले जाते. त्यांच्या डायरीच्या आधारावर कनिग्हॅम यांनी बुद्धांच्या एेतिहासिक पुराव्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली शहरे, स्तुप आणि दुर्गम डोंगरात दडलेल्या वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या लेण्या त्यांनी प्रकाशात आणल्या. पुरातत्व विभागाची स्थापना झाल्यानंतर मुघलकालीन ऐतिहासिक स्थळे संरक्षित तर झालीच, त्याचप्रमाणे २५०० वर्षांपूर्वीचा इतिहासही समोर आला.
भारतात एकेकाळी बौद्ध धर्म सर्वत्र विस्तारलेला होता. त्यामुळे त्याच्या खुणा या आजही सापडत आहेत. असेच काही पुरावे २००२ मध्ये विदर्भात सापडले. भोन स्तुपाचा शोध  २००२ मध्ये डॉ. बी. सी. देवतारे यांनी लावला आणि येथे उत्खननाने जोर धरला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात मौर्यकालीन बौद्ध स्तुप आढळले. येथे २००३ पासून उत्खनन सुरु झाले आणि २००७ मध्ये उत्खननाचे काम थांबवले. भोन गावाजवळील पूर्णा नदीकिनारी बौद्ध स्तुप सापडले. त्यामुळे याचे नामकरण भोन स्तुप झाले. पुर्णा नदीकिनारी अनेक छोट्या-मोठ्या टेकट्या आहेत. या टेकड्या १० ते १२ हेक्टर परिसरात पसरल्या आहेत. टेकटी क्रमांक ६ येथे उत्खननादरम्यान हे स्तुप आढळले. हे स्तुप साधारण इसवी सन पूर्व ३०० शतकातील असल्याचे सिद्ध झाले. येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवर बोधिवृक्षाची (पिंपळाचे झाड) प्रतिमा आढळली. तसेच एका पत्र्यावरही बोधिवृक्ष आढळून आला. टेराकोटा अर्थात विशेष प्रकारच्या मूर्तीवर ‘त्रिरत्न’ आढळले. एवढेच नाही तर येथे पाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट्य रचना असल्याचे आढळून आले. त्यामुळे येथे उत्खनन वेगाने होण्याची गरज भासू लागली. मात्र इतके भक्कम पुरावे आढळल्यानंतरही पुरातत्व विभागाने २००७ नंतर येथील उत्खनन बंद केले. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
असो, उत्खनन थांबले इथपर्यंत ठिक आहे, पण हा ऐतिहासिक वारसाच नष्ट करण्याचा डाव तत्कालीन काँग्रेस सरकारने मांडला आणि त्यानुसार पुरातत्व विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र घेऊन येथे जीगाव धरण प्रकल्प सुरु केला. मुळात येथे आणखी उत्खनन होणे गरजेचे होते. उत्खनन झाले असते तर नवीन काही हाती लागले असते. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार निवडून आले. यावेळी सरकार ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. काही महिन्यांपूर्वीच्ा दिल्लीतील रविदास मंदिर जमिनदोस्त करण्यात आले. अर्थात हे मंदिर तोडण्याचे आदेश दस्तरखुद्द सर्वाेच्च न्यायालयातून आले होते. त्यामुळे हा निर्णय चुकीचा हाेता, असे म्हणणे म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेचा अपमान करण्यासारखे ठरेल. पण जनभावना लक्षात घेता मंदिराचे संरक्षण करून संवर्धन करणे हे सरकारच्या हाती होते. मात्र सरकारने तसे न करनेच पसंत केले. संत रविदास मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. सिकंदर लोधीने दिल्लीतील तुगलकाबाद येथे १५०० च्या काळात हे मंदिर येथे उभारले. आज दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये संत रविदास यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जनभावनाचा आदर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ही दोन कारणे संत रोहिदास मंदिर न तोडण्यास पर्याप्त होती. मात्र तसे झाले नाही.
हीच बाब आता भोन स्तुपाबाबत होत आहे. मुळात हे स्तुप मौर्यकालीन असल्याने त्याचे संवर्धन करणे हे पुरातत्व विभागाचे आणि सरकारचे कर्तव्यच आहे. पण याबाबत सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने आश्चर्य वाटत आहे. परिणामी आता स्थानिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. भोन स्तुपाच्या संरक्षणासाठी यापूर्वीही आंदोलने झाली. मात्र मागील दोन महिन्यांत आंदोलनाची धार तीव्र झाली. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या बॅनरखाली आंदोलनाची रुपरेषा ठरली आहे. सप्टंेबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाशिममध्ये धरणे आंदोलन झाले. बुलढाण्यात ठिकठिकाणी मोर्चे निघाले आणि टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र होत चालले आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर २०१९) शेगावमध्ये राज्यस्तरीय संमेलन झाले. यामध्ये बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत हजारो स्तुप समर्थकांनी मेळाव्यात हजेरी लावली आणि सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. भोन स्तुप वाचवण्याचा लढा तीव्र झाला असून थेट उत्तरप्रदेशमधूनही लढ्यात आंदोलक सहभागी होत आहेत. हा लढा यशस्वी होईल की नाही हा येणारा काळ ठरवेल. पण  ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.

Thursday 11 July 2019

Learn Pali ‘पालि शिका, धम्म जाणा’

‘धम्म हवे रक्खन्ति धम्मचारि’ अर्थात जो धम्माचे आचरण करतो, त्याचे धम्म रक्षण करत असतो. पण धम्माचे आचारण करणे म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर बुद्धांनी अनेक सुत्तांमधून दिले आहे. या जगात प्रत्येकाला काही ना काही दुक्ख आहे, आणि प्रत्येकाच्या दुक्खाचे निवारण करण्याचा मार्ग बुद्धांकडे आहे. पण बुद्धांपर्यंत पोहचायचे कसे? तर त्याचे सोपे उत्तर आहे, बुद्धांनी दिलेल्या उपदेशांमधून होय. बुद्धांचे सर्व उपदेश हे पालि भाषेमध्ये आहेत. त्यामुळे हे उत्तर शोधणे तितके सोपे नाही. कारण ही भाषा आज वापरात नाही. त्यामुळे धम्म जाणून घ्यायचा असले, तर प्रत्येकाला पालि भाषा येणे गरजेचे आहे.
बुद्धांचा धम्म जाणून घ्यायचा असेल तर पालि भाषा येणे तितके गरजेचे आहे का? कारण अनेक विद्वानांनी बुद्धांनी दिलेले काही सुत्त मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर केलेले आहेत. पण भाषांतर झालेल्या उपदेशांना परिपूर्ण म्हणावे का? तर उत्तर आहे नाही, कारण पालि भाषेच्या तोडीस जगाच्या पाठिवर अशी कोणतीच भाषा नाही, जी बुद्धवचनाला न्याय देऊ शकेल. कारण बुद्धांनी पालि भाषेत दिलेली सुत्त तंतोतंत भाषांतर करणे कठिण काम आहे.  उदा, ‘मेत्ता’ शब्दाचे जेव्हा मराठीत भाषांतर होते, तेव्हा सर्रास त्याला मैत्री संबोधले जाते. पण मराठीमध्ये मैत्री म्हणजे व्यक्तींव्यक्तींमधील आनंदपूर्ण व्यवहार होय. येथे एकमेकांमप्रती आसक्ती अभिप्रेत असते. परंतु, मेत्ता म्हणजे पृथ्वीतलावरील सर्व जीवमात्रांचे मंगल व्हावे, ही भावना मनामध्ये कोणतीही आसक्ती न ठेवता बाळगणे. त्यामुळे जेव्हा पालिचे इतर भाषेमध्ये भाषांतर होत असते, तेव्हा त्यातील मर्म निघून जातो.
अस्सद्धो अकतञ्‍ञू च, सन्धिच्छेदो च यो नरो।
हतावकासो वन्तासो, स वे उत्तमपोरिसो॥
धम्मपदातील अरहंतवग्गामधील ही गाथ आहे. येथे बुद्ध जो अश्रद्धावान आहे, त्याला उत्तम पुरुष म्हणत असल्याचे म्हटले आहे. परंतु, येथे अश्रद्धावान म्हणजे चिकित्सक वृत्तीचा अर्थ अभिप्रेत आहे. ही गाथा बुद्धांनी सारिपुत्तच्या संदर्भात म्हटली असून येथे ‘वन्तासो’ हा शब्द अरहंतसाठी समानार्थी शब्दप्रयोग आला आहे. सन्धिच्छेदो अर्थात त्यांनी आता पुन्हा जन्म घेण्याचा छेद केला आहे. असे जे बारकावे आहेत, ते पालि शिकल्याशिवाय येत नाहीत.
मग ही भाषा कोठे शिकायला मिळणार? हा देखील एक प्रश्नच आहे. कारण आपल्याकडे अशी संस्था किंवा संघटना नाहीच की जे पालिचे ज्ञान देऊ शकेल. पण असे नाही. मुंबई विद्यापीठातील पालि विभाग यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.     
मुंबई विद्यापीठात पालि विभागाची स्थापना होऊन आज १२ वर्षे झाली आहेत आणि या विभागाच्या माध्यमातून पालिचे सर्वांगिण ज्ञान देण्याचे अविरत कार्य सुरु आहे. विशेष म्हणजे पालि विभागात विद्यार्थ्यांना शिकवणारे सर्व ऑक्स्फर्ड विद्यापीठाकडून प्रशिक्षित झालेले शिक्षकवर्ग आहेत. पालि विभागाच्या वाचनालयात सुमारे २ हजारांहून अधिक पुस्तकांचा भरणा आहे. विपस्सना रिसर्च इन्स्टि्युट आवृत्तीचे संपूर्ण तिपिटक, नालंदा आवृत्तीचे तिपिटक, मूळ पालि आणि हिंदी भाषांतर, मूळ पालि आणि मराठी भाषांतर तसेच मूळ पालि आणि इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहेत. विविध शब्दकोष, पुरातत्व विभागाचे अहवाल, ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागाने केलेल्या अहवालांची प्रत आणि असे बरेच काही पालि विभागाकडे संग्रहित असून अभ्यासू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पालि विभाग म्हणजे ज्ञानाचा भंडारच आहे.
पालि विभागात केवळ अॅकॅडमीक शिक्षणावर भर दिला जात नाही, तर विद्यार्थ्यांकडून अनेक उपक्रमही करूवून घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. विभागामध्ये प्रत्येक पोर्णिमेला धातूपूजा घेतली जाते. या धातुपूजेवळी एक वेगळेच वलय निर्माण होत असते. सुमारे दीड तास चालणाऱ्या पूजादरम्यान विपस्सना करतानाचाही अनुभव निराळाच असतो, जो शब्दांमध्ये माडणे शक्य नाही.
सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम पालि विभागाच्या विद्यार्थ्यांकडून होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सलग १२ तास अभ्यासिका राबवून खऱ्या अर्थाने पालि विभागात बाबासाहेबांची जयंती साजरी होत असते. तर बाबासाहेबांच्या महापरिनिब्बाणादिवशी देखील चैत्यभूमीवर पालि विभागाचे विद्यार्थी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सेवेसाठी तत्पर असतात. आजपर्यंत कोणत्याही संस्था अथवा संघटनेने काम केले नाही, असे काम पालि विभागाचे विद्यार्थी येथे करत असतात. येथील येणाऱ्या प्रत्येकाकडून एक सर्व्हे फॉर्म भरवून घेतला जातो. या फॉर्मच्या माध्यमातून समाजामध्ये किती जनजागृती झाली आहे, शिक्षणाचा दर्जा कुठे आहे इत्यादी सर्व माहिती उपलब्ध होते आणि येथे येणाऱ्यांना पालि भाषा शिकवण्यासाठी प्रेरित केले जाते. 
पालि विभागातील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी किंबहुना वर्षातून दोन वेळा अभ्यासदौरा आयोजित केला जातो. बौद्धकालीन ऐतिकासिक स्थळांना भेटी देऊन त्या स्थळांची इतंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. या स्थळांचा अभ्यास कसा करायचा? एखाद्या लेणीवर अथवा बौद्धकालीन ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर नेमके काय पाहायचे, याचे ज्ञान या अभ्यासदौऱ्यातून होत असते.
१४ ऑक्टोबर, धम्मदिक्षा दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर राईटींग अॅण्ड स्पिचेस या गंथ्रावर आधारित दोन दिवसीय पोस्टर सादरीकरण कार्यक्रम आखला जातो. बाबासाहेबांच्या लिखाणाचा संदर्भ घेत कलात्मक पोस्टर प्रदर्शन आणि सादरीकरण या दिवशी होत असते. मुंबईत अशी कोठेच साजरी होत नाही, इतकी भव्यदिव्य बुद्धपोर्णिमा पालि विभागात साजरी केली जाते. तीन ते चार दिवसीय विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आशियाई बौद्ध राष्ट्रांमध्ये ज्याप्रमाणे बुद्ध पोर्णिमा साजरी होते, त्या तोडीस येथे समारंभ आयोजित केला जातो आणि कार्यक्रमाच्या शेवटी विद्यापीठाचा परिसर असंख्य दिव्यांनी खुलून दिसतो. विद्यार्थ्यांद्वारे येथे दिवे लावले जातात आणि बुद्ध पोर्णिमा कार्यक्रमाचा समारोप होतो.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना मिळावी, विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादर करण्याची वेळोवेळी संधी दिली जाते. वर्षभरामध्ये असे अनेक उपक्रम हाती घेतले जातात, जे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वृद्धिगत करतात.
सध्या पालि विभागामध्ये दहावी, बारावीनंतर बी.ए., तर पदवीनंतर एम. ए., तसेच पोस्ट ग्रॅज्युएट अॅडव्हान्स डिप्लोमा, एम.फिल, पीएचडी इत्यादी उच्च शिक्षणाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोईस्कर पडले, अशी वेळरचना करण्यात आलेली आहे. सोबतच ज्यांची दहावी झाली आहे किंवा बारावी झाली आहे, त्यांच्यासाठी एक वर्षीय प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. यामध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडिज, विपस्सना थेरी अॅण्ड प्रॅक्टिस, परियत्ती अॅण्ड पतिपत्ती असे विविध कोर्सेस उपलब्ध आहे. ज्यांची कलेमध्ये आवड आहे, त्यांच्यासाठीही आर्ट अॅण्ड कल्चर डिप्लोमा कोर्स उपलब्घ आहे. दरवर्षी दोन दिवसीय ब्राम्ही लिपी कार्यशाळा होत असते. त्यामुळे येथे केवळ पालिचेच ज्ञान मिळत नाही, तर सर्वांगिण ज्ञान मिळत असते. त्यामुळे शुद्ध स्वरुपात धम्म जाणून घ्यायचा असेल, तर मुंबई विद्यापीठ,पालि विभाग एक उत्तम पर्याय आहे. जोपर्यंत पालि भाषा अवगत होणार नाही, तापर्यंत धम्म समजणे अवघडच आहे. डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते भारत बौद्धमय करण्याचे, पण हे स्वप्न पालि शिकण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून वेळ न दवडता ज्यांना बुद्धांचा धम्म जाणून घ्यायचा आहे, त्यांनी पालि विभागामध्ये आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा आणि आत्म कल्याणासह इतरांच्या कल्याण साधण्यास पुढाकार घ्यावा.  ज्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावयाच्या आहेत, त्यांचे पालि विभागातर्फे नेहमीच स्वागत आहे. 

Wednesday 3 July 2019

‘गिरिलिंग लेणी’

भारतात सुमारे १५०० लेण्या असून सर्वाधिक लेण्या या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राला लेण्या साकारण्यासाठी पोषक पठार लाभल्याने येथे सर्वाधिक लेण्या आढळतात. सुमारे १२०० लेण्या महाराष्ट्रात असून त्यापैकी १ हजार लेण्या या बौद्ध लेण्या आहेत. महारा

ष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक लेण्या कोरल्याचे आढळते. त्यापैकीच एक लेणी सांगली जिल्ह्यात आढळते. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे गिरिलिंग म्हणून येथे लेणी ओळखली जाते. दक्षिण पूर्व दिशेला ही लेणी आहे. वज्रयान काळातील ही लेणी असल्यामुळे येथे कोरीव काम दिसून येत नाही.
पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी वज्रयान बुद्धिझमचे चांगल प्रस्त होते. येथे मोठ्या प्रमाणावर वज्रयान बुद्धिझमचे अनुयायी होते. वज्रयान बुद्धिझममध्ये स्तुपाचा आकार बदलून छोटा झालेला होता. कर्जत तालुक्यातील कोंडाणे लेणी ही साधारण दुसऱ्या शतकामध्ये साकारलेली होती. यामध्ये स्तुपाची विभाजनी मेदी, अण्ड, हर्मिका, छत्री अशा भागात आहे. तर सांगलीतील गिरिलिंग लेणी ही सातव्या शतकामध्ये कोरली गेली असल्याचे त्याच्या वास्तुकलेवरून स्पष्ट होते. भारतात सातव्या शतकामध्ये वज्रयान बुद्धिझमचा प्रभाव होता. त्यामुळे ही वज्रयान बुद्धिझमचे प्रतिनिधित्व करणारी लेणी आहे.  येथे स्तुपाचा आकार तुलनेत छोटा आहे. याला वोटीव स्तुप असे म्हणतात. बहुतांशी अभ्यासक वोटीव स्तुप हे शिवलिंग असल्याची गल्लत करतात, परंतु, ते तसे नाही. वज्रयान बुद्धिझमचे हे एक प्रतिक आहे. दिसण्यास सामर्ध्य असले तरीही दोन्हीमधील वास्तुरचनेतील तफावत हे सिद्ध करते की हे वोटीव स्तुप आहे. चीन, तिबेट, भुतान या इस्ट एशियामध्ये वज्रयान बुद्धिझमला फॉलो करणारे अनुयायी आजही आहेत. वोटीव स्तुप घारापूरी लेणीमध्येही आढळते. त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या सिरपूरमध्ये झालेल्या उत्खनानातूनही वोटीव स्तुप सापडले आहे. आज हे स्तुप छत्तीसगड पर्यटन विभागाने संरक्षित केले आहे. परंतु, याला वोटीव स्तुप आहे, अशी मान्यता मात्र दिलेली नाही.  
 सांगलीतील ही लेणी वज्रयान बुद्धिझमच्या काळातील आहे.  दक्षिण पूर्वच्या दिशेने ही लेणी आहे. येथे फ्लोअरवर भुसभुशीत माती आढळते. सर्वसाधारणपणे लेण्याच्या फ्लोअरवर दगड सापडतो, पण येथे भुसभुशीत माती दिसून येते. फारस पद्धतीचा दगड येथे आढळत असल्यामुळे येथे दगडाची झिज होऊन ही माती झाली असावी बहुतेक. या लेणीमधील दगडाचीही प्रत तशी हलकीच आहे. तसेच लेणी बांधताना लाकडाचा वापर झाल्याचे दिसून येते. दगडाची प्रत हलकी असल्यामुळे येथे अतिरिक्त कामे झाल्याचे दिसून येत नाही. कालांतराने या लेणीचा विकास मागे पडला असावा. या लेणीमध्ये एक ‘कोटक’ (विपस्सना करण्यासाठीची छोटी खोली) दिसून येते. तर आणखी एक कोटक बांधण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. पण दगडाची प्रत चांगली न लागल्यामुळे दुसरे कोटक कोरण्यात आले नाही. सर्वसाधारणपणे लेण्यांमध्ये पोदी आणि कोदी आढळतात. पोदी म्हणजे पिण्यासाठी पाणी साठवणूक करण्याची जागा आणि कोदी म्हणजे वापरण्यास योग्य पाण्याची साठवणूक करण्याची जागा. येथे या दोन्ही गोष्टी आढळत नाहीत. त्यामुळे येथे भिक्खुंचे चिरकाळ वास्तव्य राहिले असेल की नाही, हे प्रश्नांकीत आहे. या लेणीमध्ये पिलास्टर देखील आहे. पिलास्टर म्हणजे असा खांबा जो लेणीशी संलग्न असतो. अर्थात लेणीच्या अगदी जोडून असणाऱ्या खांबाला पिलास्टर म्हणतात. प्रत्येक खांबाची रुंदी ही २.५ इंच असून कोटकची आहे. तर लेणीचा आकारमान २०.७ फुट रुंदी आणि २७ फुट लांबी असा आहे. चेत्यगृहासमान हे बांधकाम असून परंतु, याला चैत्यगृह म्हटले जात नाही. कारण येथे चैत्य किंवा मूर्ती दिसत नाही. अशाच पद्धतीचे वास्तुशिल्प गुजरातमध्येही काही ठिकाणी आढहळे. या लेणीवरून महाराष्ट्रात बौद्धधम्म चांगल्या प्रकारे वाढलेला, विस्तारलेला आणि विकसित झाल्याचे समजून येते. 





Friday 8 February 2019

प्राच्यविद्यामध्ये शब्दांचे फटकारे अन् कौतुक

दर दोन वर्षांनी भरवली जाणारी बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद नुकतीच सांगली येथील प्रसिद्ध विलिंग्डन महाविद्यालयात पार पडली. औपचारिक उद्घाटनानंतर ‘प्राच्यविद्या’ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पूर्वी युरोपमध्ये ऑरिएन्टल काँग्रेस संकल्पना अस्तित्वात होती. साधारण १८७० च्या दरम्यान मध्य युरोपपासून जपानच्या संस्कृतीच अभ्यास करण्याची संकल्पना दृढ झाली. विस्तीर्ण स्वरुपात विस्तारलेल्या भूभागाच्या सार्वंगिक अभ्यास करण्याच्या हेतूने सुरु झालेल्या या परिषदेत नवीन उदयास येणाऱ्या आधुनिक युगाचा उहापोह होत असे. मग अशीच परिषद आपल्याकडे का नाही? आपल्या संस्कृतीची कवाडे जगभरासाठी का खुली करू नयेत? या उदात्त हेतूने १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज २०१९ मध्ये या परिषदेचे १३ वे अधिवेशन सांगलीत पार पडले. 

‘प्राच्यविद्या’च्या नावावरूनच ही संस्कृत भाषेशी निगडीत परिषद असावी, असा बोध होतो. वस्तुत: हे खरेही आहे. कारण या परिषदेत संस्कृत भाषेला आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न झाला. परिषदेच्या उद्घाटनावेळी जरी आयोजकांनी प्राच्यविद्या परिषद ही केवळ संस्कृत भाषा आणि हिंदू धर्माशी निगडीत नसून ही यामध्ये इतर भाषा, धर्मांतील अभ्यासकांसाठी दरवाजे मोकळे आहेत, असे स्पष्ट केले होते. परंतु, जसजशी परिषद पूढे जात होती आणि वेद-पुराणांची दाखले देऊन ज्याप्रमाणे विषय सादर होत होते, यावरून ही परिषद संस्कृत भाषेच्या जवळीचच वाटली. असो.. असे असले तरीही या परिषदचे कवाड सर्वांसाठी मोकळे आहे, हे पालि भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागावरून दिसून आले. या परिषदेत तब्बल १४५ शोधनिबंधांची नोंदणी झाली होती. त्यापैकी जवळपास १३५ शोधनिबंध सादर झाले. या १३५ शोधनिबंधांपैकी तब्बल ४५ शोधनिबंध एकट्या मुंबई विद्यापीठातील पालि भाषा विभागातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे होते. हा आकडा निश्चितच अभिनंदनीय आहे. त्यामुळेच आयोजकांनाही पालि भाषेतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. यंदाचे हे १३ वे अधिवेशन होते आणि सातत्याने मुंबई विद्यापीठाच्या पालि विभागातील विद्यार्थी या प्राच्यविद्या परिषदेत सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे उद्घाटनावेळीच परिषदेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांना या विभागातील विद्यार्थ्यांचे गोडवे गायले. तर परिषदेचे सहसचिव श्रीनन्द लक्ष्मण बापट यांनीही समारोपावेळी पालि विभागाच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले. पालि विभागाच्या विद्यार्थ्यांचे शोधनिबंधही त्याच तोडीचे होते. ‘बाला च पण्डिता च’ अर्थात ‘मुर्ख आणि पण्डित’, ‘सम्मावाचा’, ‘वृद्धाश्रमांची गरजच काय?’, ‘मैत्ता’ अर्थात मैत्री भावना, ‘कार्ला लेण्यांवरील शिलालेख’ असे विविध विषय या परिषदेत हाताळण्यात आले आणि हे सर्व विषय वाखणण्याजोगे होते. विषयांची मांडणी, प्रेक्षागृहातून आलेले प्रश्न, त्यावर उत्तर, उत्तरातून निर्माण झालेला प्रतिप्रश्न हे सर्व पाहण्यासारखे होते.
संस्कृत भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही पूर्ण क्षमतेने विषय सादर केले. नवख्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहण्यासारखे होते. श्लोकांचे स्पष्ट उच्चार, विषयांची मांडणी आणि निष्कर्षापर्यंत येत विषयाचा शेवट आणि त्यानंतर विचारलेला प्रश्नांना सडेतोड उत्तरे, हे सर्व वातावरण अल्हाददायक होते. खतं एवढीच की जर या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाला न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली असती तर परिषद आणखी खुलून दिसली असती. संस्कृतच्या अनेक विद्यार्थ्यांनी विषय तर सादर केले, पण ते तडीस नेताना अडकले. विशेषत: धर्म आणि तत्त्वज्ञान विभागात सादर झालेल्या विषयांमध्ये तर्काचा अभाव प्रकर्षाने दिसून आला. उदाहरण सांगायचे झालेच तर, एका विद्यार्थ्याने ‘व्यक्तिमत्व विकास’ विषय सादर करत असताना सध्याचे ‘सॉरी, ओके, थॅक्स’ या स्मार्ट शिष्टाचाराऐवजी संस्कृत साहित्यात जे ‘पंचयज्ञ’ सांगितले आहेत, ते करावे. जेणेकरून व्यक्तीमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. पण त्यांच्या विषयात तर्काचाच अभाव जाणवला. त्यामुळे मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्या विद्यार्थ्याला अवघडल्यासारखे वाटले. तर अभिजात साहित्यात ‘योगपीठासन स्तोत्र’ सादर करणाऱ्या विद्यार्थ्याला मनशुद्धीचे मॅकॅनिझम विचारले असता तो विद्यार्थी निरुत्तर झाला. एकंदर वाद-संवाद घडत असताना कुठेही द्वेषाचे वलय नव्हते. अर्थात उद्घाटन कार्यक्रमाचा ‘ते’ भाषण सोडले तर सर्व काही खेळीमेळीत चालले. अर्थात येथे ‘त्या’ भाषणाचा उल्लेख करतच नाही, कारण ते अर्थहिन होते. सादर करणारे विद्यार्थी आणि त्यांना प्रश्न विचारणारे मातब्बर यांची जुगलबंदी पाहण्यासारखी होती. परिषद अगदी शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. परिषदेच्या निमित्ताने सांगलीच्या स्थानिक इतिहासाची ओळख देखील झाली. तर्कशुद्ध आणि आध्यात्मिक जोड असणारे निबंध सादर होत असताना त्यावर साधकबाधक चर्चा झाली. मतांचे खंडण झाले. चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेल्या शोधनिबंधनांना शब्दांचे फटकारे बसले. आणि आपल्या गुणकौशल्याने सादर केलेल्या विषयांचे कौतुकही झाले.