Wednesday 2 September 2015

धम्माचे सारथी ‘आगरी-कोळी’

कालपरवा भारतातील ‘धर्म’वारी जाहीर झाली आणि मनात अनेक प्रश्‍नांचे काहुल माजले,  कारण विषयच तसा आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या विविधतेत एकता शोधण्याचा प्रत्येकजण प्रयत्नात असतो. तरीही सरकारने धर्माची आकडेवारी जाहीर करुन एकमेकांत भेद निर्माण करण्याचा जो घाट घातला आहे, तो निदंनिय आहे. केंद्र सरकारने इतिहासाचा सारासार विचार करता संस्कृतीला अग्रस्थानी मानून आकडेवारी प्रसिध्द केली असती, तर कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंतच्या संस्कृतीत बरेच साम्य आढळले असते. भौगोलिक परिस्थिती वगळता आचार-विचाराच्या पध्दती सारख्या आढळल्या असत्या. कारण एकेकाळी या देशामधील नागरिक बुध्दांच्या विचारधारेनुसार जीवन व्यथीत करीत होता. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा विचार केला तर बुध्दांच्या शिकवणीचा प्रभाव आजही येथील स्थानिक आगरी-कोळी बांधवांच्या राहणीमानावरुन दिसून येतो.
आपल्याकडे जसे बॉलीवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टी, नाट्यक्षेत्र, संगीत क्षेत्र अशा विविध ‘कला’दालनांसोबतच एक बुध्द-भीम गीतांची वेगळी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीत नवनवीन कलाकार भरारी घेऊ पाहत आहेत. त्यापैकी एक कबीर शाक्य. या नवतरुण कलाकाराची गरुड झेप पाहता, भीम इंडस्ट्रीला सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. नुकतेच शाक्य यांचा आगरी-कोळी गीतांवर आधारित अल्बमच्या रेकॉर्डींगचा मुहुर्त पार पडला. विशेष म्हणजे ही गीते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक आणि गौतम बध्दांच्या विचारधारेवर आधारीत आहेत, त्यामुळे या अल्बमची उत्सूकता अधिकच वाढली आहे. 
भारतातून इसवी सन १२०० मध्ये बौध्द धम्म पूर्णतः लोप पावला. आता एखादा धर्म लोप पावतोच कसा? कारण तत्कालीन वेळी धर्म म्हणजे विशिष्ट जगण्याची पध्दत, असा त्याचा अर्थ होता. बौध्द धम्म लोप पावला म्हणजे जगण्याची पध्दत लोप पावली का? तर नाही, कारण आजही राज्यांमधील कोकण पट्ट्यात बौध्द जीवनपध्दती पहावयास मिळते. तिचे स्वरुप भले भिन्न आहे, मात्र नाळ मुळ बौध्द संस्कृतीचीच आहे, हे अभ्यासाअंती स्पष्ट होते. सम्राट अशोककालीन मुंबई, ठाणे आणि रागयड जिल्ह्यांना अपरांत म्हणून संबोधले जात होते. सम्राट अशोकाचे जम्बूद्वीपावर राज्य होते. अर्थात आजचा भारत, पाकिस्ताना आणि अफगाणिस्तानपर्यंत सम्राट अशोकाचे राज्य विस्तारले होते. बौध्द धम्माचा स्विकार केल्यानंतर धम्माचा प्रसार आणि प्रचारासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्याचाच एक भाग म्हणून धम्माच्या प्रसारासाठी त्यांनी आपल्या मुलांना आगरी-कोळी बांधवांच्याकडे सुपूर्द केले. हो महेंद्र आणि संघमित्रा श्रीलंकाला (तत्कालीन सिहलद्वीप) नालासोपारा येथील बंदरामार्फत गेले होते आणि त्यांना सिहलद्वीपपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आगरी कोळ्यांना दिली होती. म्हणजे बौध्द धम्माच्या प्रसार आणि प्रसारात आगरी-कोळी बांधवांचा किती मोठा वाटा आहे, हे यावरुन स्पष्ट होते आणि श्रीलंकेच्या इतिहासात तसा उल्लेखही आहे. सम्राट अशोकाचा आगरी-कोळी बांधवांवर एवढा विश्‍वास कसा? तर याचे उत्तर गौतम बुध्दांच्या चरित्रावरुन मिळते. गौतम बुध्दांची आई महामाया या कोळी समाजातून होत्या. त्यामुळे आजही ‘एक’वीराची आई आगरी-कोळी बांधवांसाठी श्रध्देचे स्थान आहे. एवढेच काय तर, कोकण पट्ट्यातील अनेक गावांची नावे बुध्द संस्कृतीशी निगडीत आहेत. उदाहरण द्यायचेच झाले तर अनेक गावे ही ‘पाली’ नावावर आहे. कळंबोलीजवळील रोड‘पाली’, ‘पाली’हिल, पाली, पोटल‘पाली’, बुद्रुक‘पाली’ अशी अनेक गावे पाली नावावरुन सापडतील. कारण पाली ही बौध्दकालीन प्रचलीत भाषा होती. गौतम बुध्दांनी आपले उपदेश पाली भाषेमध्ये सांगितले होते. त्यामुळे आजही कोकण पट्ट्यात अनेक गावांची नावे पाली नावावरुन पडली आहेत. फक्त कोकणच नव्हे, तर पश्‍चिम महाराष्टातही पाली नावाचे काही गावे आहेत. तांत्रिक दृष्ट्या बुध्द जोपर्यंत होते, तोपर्यंत धम्म हा फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागापुरता सीमित होता. मात्र याचा विस्तार सम्राट अशोकाने केला, तो सबंध जगभर आज पसरला आहे. कोकण पट्ट्यात बुध्द धम्मा विस्तारला होता, हे येथील आगरी-कोळी बांधवांच्या संस्कृतीतून स्पष्ट जाणवते. आजही येथे मातृसत्ताक पध्दत पहावयास मिळते. मच्छीमार बांधवाने आणलेल्या मासे विक्रीचा व्यवहार हा पूर्णतः महिलांच्या हाती आहे. आगरी-कोळी महिला अबला नाही. ती स्वतःचे रक्षण चांगल्या प्रकारे करु शकते. हे स्वातंत्र्य फक्त बौध्द संस्कृतीत सापडते.