Friday 25 December 2015

निर्मळ प्रेमाचा सागर ‘येशू ख्रिस्त’

निर्मळ प्रेमाचा सागर ‘येशू ख्रिस्त’
येशु ख्रिस्त म्हणजे जगाला मिळालेली ‘मैत्री’ची एक देणच आहे. त्यांच्याइतकी अपार मैत्री कोणाकडे असेल, असे बहुदा वाटत नाही. शेवटच्या क्षणपर्यंतही ते बहुजनांच्या हितासाठी, बहुजणांच्या सुखासाठी मंगलमैत्री करत होते. ज्यांनी त्यांना सुळावर चढवले, अशा निर्दयी लोकांचेही भले व्हावे, त्यांना त्यांची चुक समजावी, यासाठी प्रार्थना करत होते. पण ज्यांच्यावर ‘एव्हिल’ आरुढ झालेला असतो, जो अकुशल कर्मांमध्ये इतका बुडाला असतो, की त्याला चांगल्या-वाईटाची जाणीवच उरत नाही. पण जे सदपुरुष आहेत, ते मात्र आपल्या दृढ निश्‍चयापासून कधीच स्वतःला दुर करत नाहीत. हेच येशुंनी केले.
येशु ख्रिस्तांचा आज जन्मदिवस. बॅथेलेहेम या शहरात त्यांचा जन्म झाला; आणि पृथ्वीतलावर जणू देवच अवतरला. म्हणतात ना, अंधारानंतर सुर्योदय होणे हे क्रमप्राप्तच असते. तसेच काहीसे येशुंबाबत झाले. त्यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा रोमन साम्राज्य बहारलेले होते. ऑगस्टस हा रोम साम्राज्याचा सम्राट होता. तो आपल्या क्रुरतेसाठी प्रसिध्द होता. येशूंच्या जन्मावेळी त्याने रोमन साम्राज्याची जनजगणा करण्याचे ठरवले होते आणि सर्वांना  बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदविण्याचे फर्मान सोडले होते. त्याच वेळी येशुंची आई मेरी गर्भवती होती. त्या आपल्या पतीसह बॅथेहेहमला आल्या होत्या; पण त्यांना निवार्‍यासाठी जागा मिळाली नाही आणि उघड्यावरच येशुंचा जन्म झाला. बहुदा एखाद्या महापुरुषाने उघड्यावर जन्म घेण्याची ही दुसरी वेळ होती. येशुंच्या पूर्वी गौतम बुध्दांचाही असाच नेपाळमधील लुंबनी वनात बुध्दांचा जन्म झाला होता. त्याचप्रमाणे एका गोठ्याशेजारी मेरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तसा येशूूंचा जन्म अशा ठिकाणी होईल, हे अपेक्षित नव्हते. मात्र रोमचा सम्राट ऑगस्टसने काढलेल्या फतव्यामुळे हे घडले. येशूंच्या जन्माप्रसंगी ऑगस्टसने आपल्या साम्राज्यातील नागरिकांची गणना करण्याचा आदेश पारित केला होता. त्यानुसार सर्वांवर  बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यामुळे मेरीही आपल्या पतीसह  बॅथेलेहेमला आली होती आणि एका गोठ्याशेजारी येशुंचा जन्म झाला. ‘मैत्रीच्या सागरा’ला जन्म देणारी स्त्री कोणी साधारण नसेल, नक्कीच चारित्र्यसंपन्न असावी, पण समाजात मेरीबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. बहुदा ते निर्माण केलेही असावेत. काही म्हणतात, त्यांचा विवाह झाला नव्हता, तर त्या कुमारी माता होत्या. तर काही ग्रथांमध्ये मेरीच्या पतीचाही उल्लेख आलेला आहे. येशुंच्या जन्माला आता २ हजार १५ वर्षे झाली आहेत, त्यामुळे मेरी नक्की विवाहित होत्या; की कुमारी माता होत्या? हा संशोेधनाचा जरी विषय असला, तरी त्याचे १०० टक्के बरोबर उत्तर मिळणे आता शक्य नाही. असे म्हणतात की, मुलांमध्ये आईवडीलांचे गुण येतात. आजकाल डॉक्टरही महिलांना गर्भवती अवस्थेत आनंदी राहण्याचे सल्ले देतात. जेणेकरुन त्यांची होणारी संतान ही सदृढ आणि निर्मळ मनाची निघावी, हा त्यामागचा हेतू असतो. जर हाच नियम येथे लागू केला, तर येशुंच्या आई किती चारित्र्यसंपन्न असतील, याचा आपण विचारही करु शकत नाही. कारण त्यांनी एका अशा पुत्राला जन्म दिला आहे, ज्याच्या अनुयायांची संख्या आज कोटींच्या घरात आहे.
येशुंच्या बाल्यावस्थेबाबत जास्त काही माहिती इतिहासात उपलब्ध नाही, एक मेंढपाळ म्हणून त्यांची ओळख होती. पण हा असा मेंढपाळ निघाला की, त्याने सर्वांना मैत्री करायला शिकवले, प्रेम द्यायला शिकवले आणि स्त्रीयांनाही सन्मानाने वागणूक द्या, याची शिकवण दिली. त्यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा उल्लेख येथे करावासा वाटतो. एकेवेळी गावातील सर्व मंडळी एका स्त्रीला बांधून दगडाने मारत होते. ग्रामस्थांच्या या कृत्याबाबत येशुंनी सर्वांना विचारले असता ग्रामस्थांनी, ‘ही स्त्री चरित्र्यहिन आहे, पापी आहे’, असे उत्तर दिले. आता येथे एक प्रश्‍न उपस्थित होतो, तो म्हणजे, जर का ती स्त्री खरोखरच चरित्र्यहिन असावी, तर मग काय तिच्यासोबत ज्या पुरुषांचे संबंध आले, ते धुतल्या तांदळासारखे होते का? मग फक्त स्त्रीयांनाच हा दोष का? असा प्रश्‍न पडतो आणि कदाचित हीच भावना येशूंच्या मनाला शिवली असावी. त्यांनीही वेळ न दवडता, ‘जो कोणी पाणी नसेल, ज्यांने कधीही आयुष्यात कोणतीही वाईट कृत्य केले नसेल, त्यांनीच या स्त्रीला दंड द्यावा’, येशूंच्या या वाक्याने लगेचच सर्वांच्याच हातातून दगडे खाली पडलीत. कोणाचेही दोष दाखवताना आपण निर्दोष आहोत का? याचे स्वतः आत्मपरिक्षण करण्याचा धडाच त्यांनी सर्वांना शिकवला. त्यांचा हा धडा आजही जसाच्या तसा लागु पडतो. कारण आजही प्रत्येकजण स्वतःमधील दोष दुर करण्यापेक्षा दुसर्‍यांच्या चुका शोधण्यात धन्यता मानतात. ख्रिचन बांधवांमध्ये वाईन आणि ब्रेडला अनन्यसाधारण महत्व आहे. येशुंनी शेवटचे जेवण म्हणून वाईन आणि ब्रेड ग्रहण केले होते, अशी धारणा आहे. त्यामुळे कोणत्याही मंगलप्रसंगी ख्रिचन बांधव वाईन आणि ब्रेडचा आस्वाद जरुर घेतात.  जेणेकरुन त्यांचे गुण आमच्यातही उतरलीत. त्यांची दया-मैत्रीची क्षमता आम्हालाही प्राप्त होईल, हा त्यामागचा सुप्त हेतू असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार पसरविण्याचे काम ‘त्या’ ४० अनुयायांनी केले. पण आज खरंच येशुंचा अनुयायी त्यांचे विचार अंगीकृत करतो का? हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आणि यंदाच्या ख्रिसमसला येशु ख्रिस्तांमधील असलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा या भावाना आपल्याही अंगी उतराव्यात, याचा संकल्प करावा, म्हणजे खर्‍या अर्थाने मेरी ख्रिसमस साजरा होईल.

Monday 21 December 2015

अमानुष अत्याचाराचा वचपा!

मानवाच्या उत्क्रांतीनंतर स्थलांतर हा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा राहिला आहे आणि भारत हा मानवी वस्ती वाढीसाठी पोषक भुखंड असल्यामुळे भारतात स्थालांतरासाठी अनेकांनी अनुकुलता दर्शवली. साधारण पाच हजार वर्षांपूर्वी युरेशियन येथील रानटी टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले. रानटी युरेशियन टोळ्या आणि येथील स्थानिक नागवंशी यांच्यात संघर्ष झाला आणि जो शेवटपर्यंत या युरेशियन लोकांचा विरोध करत होता, त्यांना या उर्मट लोकांनी शुद्र म्हणून हिनवून अस्पृश्यतेची वागणूक दिली. या अस्पृश्यतेचा उद्रेक झाल्यानंतर जन्म झाला एक अशा इतिहासाचा जो येथील तथाकथित इतिहासकारांनी नेहमीच अंधारात ठेवला.
भारताचा इतिहास हा तथाकथीत उच्च वर्णिय आणि अस्पश्य यांच्यामधील संघर्ष असून दुसरे काही नाही. पण हा संघर्ष कधीच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात उतरला नाही. जातीव्यवस्था ही भारताच्या विकासाला लागलेली मोठी किड आहे. गौतम बुध्द म्हणतात, दुःख संपवायचे असेल तर त्या दुःख उत्पन्न होणार्‍या कारणाच्या मुळाशी गेले पाहिजे. पण भारतात जातीव्यवस्था कशी फोफावली, याचा नेमका इतिहास सापडत नाही. किंबहुना कर्मदरिद्ˆय लोकांनी हा इतिहास लिहून ठेवण्याची मेहनत घेतली नाही. सहाजिकच हे काम तत्कालीन वेळी ज्यांना लिहण्या-वाचण्याचा हक्क होता, त्यांचे होते. पण आपले बिंग फुटेल, या भितीने यांनी इतिहास दडविण्याची खबरदारी नेमकी घेतली. सम्राट अशोकाचा नातू ब्रहदत्त यांच्या हत्येनंतर भारतात जातीवादाने आपली मुळे घट्ट रोवली. बौध्द धम्माचा र्‍हास करण्यासाठी भिक्खुंचे मुंडके कापणार्‍यास पारितोषिके देण्यात येत असत. शुद्रांकडून शिक्षणाचा हक्क काढून घेतला. त्यांना गावाच्या वेशीबाहेर हकलण्यात आले. गुलामीचे जिने जगण्यास भाग पाडले आणि हजारो वर्षांच्या गुलामीचा उद्रेक पेशवाईच्या शेवटाने झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महारा-मागांना मानाचा दर्जा मिळाला होता. महाराजांच्या मावळ्यांमध्ये धनगर, माग, महार, चांभार आदींचा जास्त भरणा होता. त्यात महाराजांकडे निष्ठावंत मुस्लीमही होते. त्यामुळे कोणी राजेंच्या नावावर हिंदुत्वाचा पुरस्कार करत असतील, तर त्यांनी इतिहासातून थोडे धडे घेतले पाहिजेत.
शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविण्यासाठी पोर्तुगिज, ब्रिटीश तडफडत होते; पण राजांच्या दुरदृष्टीमुळे त्यांना ते शक्य नव्हते. त्यांच्या मार्गातला मुख्य अडथळा महार होते. दरम्यान, महाराजांच्या संशयास्पद मृत्यूनंतर (हत्या) महाराष्ट्रात पेशवाईचा जन्म झाला. या पेशवाईला बळ देण्याचे कामही महारांनीच केलेे. प्राचीन काळी महारांना महा+अरी संबोधले जायचे. अरी म्हणजे शत्रू, शत्रुंचा संहार करण्यात तरबेज अशी महाअरी जमात होती. पण नंतर त्याचे अपभ्रश होऊन महार झाले. मुगल आणि ब्रिटीशांच्या फौजेला सीमेवर रोखण्याचे अतुलनीय कार्य महार पार पाडत होते. त्यामुळे तर पेशवाई अबाधित राहिली होती. खर्ड्याच्या लढ्यात सिदनाकच्या नेतृत्वाखाली महार सैनिकांनी पेशव्यांना विजय मिळवून दिला होता. पण या विजयानंतर माधवराव पेशव्याचा उन्मात इतका वाढला की त्याने रणांगनावरच महारांचा अपमान केला. जेव्हा आपले बस्तान बसले, तेव्हा शिंपल्यातील मोती काढून शिंपल्याला केराची टोपली दाखवावी, असे माधवराव पेशव्याने महारांना वेगळे केले. फक्त वेगळेच केल नाही महारांवर अमानुष अत्याचारही केला. मानुसकीला काळीमा; अशी क्रुर वागणूक दिली. पेशवाईने महारांवर किती अत्याचार केले आहेत, याची गणना केली तर संख्या कमी पडायची. पाच हजार वर्षांच्या काळात इतकी क्रुर वागणुक कोणी दिली नव्हती, तेवढी पेशवाईच्या काळात महारांना सहन करावी लागली.  हे पेशवे इतके निष्ठुर आणि क्रुर होते की, ते महारांच्या शिराचा बॉल करुन तलवारीला हॉकीची स्टीक समजून खेळत असत. शनिवारवाड्यात हा खेळ रंजकपणे पाहिलाही जात असे.  गळ्यात मडके, पाठीला झाडू, कंबरेला घंटी, हाता-पायात काळा दोरा ही महारांची ओळख. दुपारी १२ ते ३ या वेळेतच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा; अन्यथा कोणावर या महारांची सावली पडले, तर अनर्थ होई.  त्यांना गावाबाहेर गुरे-ढोरे ओढण्याची, संदेश वाहकाची कामे दिली जात. उष्ट्यांवर पोट भरावे, हा दंडकच!  आणि या अमानुष अत्याचाराचा बदला ‘त्या’ ५०० शुरवीर महारांनी घेतला. तो म्हणजे पेशवाई संपवून. सुमारे २५ हजार पेशवा सैनिकांना केवळ ५०० महार सैनिकांनी चारिमुंड्या चित केले.
(क्रमश)

Wednesday 16 December 2015

नाक दाबून बुक्का मारण्याची गरज

हातावर जळता कोळसा ठेवला, तर त्याचा परिणाम काय होईल, हे वेगळे सांगायला नको. हात जळल्याशिवाय राहणार नाही. याचीच पुनरावृत्ती भारत करत तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाबरोबर मैत्रीपुर्ण संबंध विकसित करण्याच्या मुद्याला आज दुजोरा दिला. पण आपल्या सैनिकांची तिरडी खांद्यावर घेऊन कोणी कसे बरे त्यांच्याशी मैत्री करु शकेल. का आपण इतिहासातून काहीच धडे घेत नाही?
मैत्री प्रस्तापित करणारा देश म्हणून जगाच्या पाठिवर भारताची ओळख आहे. म्हणून काय कोणीही यावं आणि टिकली मारुन जावं, इतकी बिकट अवस्था आमच्यावर आली आहे का? जेव्हा ‘चीन’ची ठेस लागली, तेव्हाच आपण शहाणे होणे गरजेचे होते. तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी चीन बरोबर शांततेचा ‘पंचशील’ करार केला होता. मात्र या कराराचे उल्लंघन करीत चीनच्या सैनिकांनी सीमेवर हल्लाबोल केला. चीनने अनपेक्षित लादलेल्या या युध्दाचा सामना भारताच्या सैनिकांना करावा लागला; आणि शिखस्तही खावी लागली. याच युध्दाची परिणीती म्हणून आजही आपला काही भु-प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. खरे म्हणजे तेव्हा भारत युध्दासाठी तयारच नव्हता. स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताला युध्दाचा सामना करावा लागला. १९४७ ते ४८ दरम्यान काश्मिर मुद्दावरुन भारत-पाक युध्द झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंतर्गत वादाची घडी व्यवस्थित करण्यात सरकार व्यस्थ असताना युध्दामुळे पुन्हा आर्थिक बोजा भारताला सहन करावा लागला. त्यानंतर १९६५, १९७१ च्या युध्दाची भर पडली. याचा विपरित परिणाम आपल्या पंचवार्षिक योजनांवरही झाला. एकंदर विकास खुंटला. आता वर्तमानातही आपण दहशतवादचा सामना करण्यात आपला वेळ खर्ची घालत आहोत.
पाकिस्तान हा आपला कट्टर शत्रु आहे, हे जगजाहीर आहे. पाकने जगाच्या पाठिवर आपली प्रतिमा अबाधीत राखण्यासाठी दहशतवादाला जन्म घातला.  मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट ही त्याची सुरुवात होती. कधी काळी दहशतवादाने फक्त भारताला पोखरले होते, तेव्हा इतर राष्ट्रांनी दहशतवाद बोकळू दिला, आणि आता तो त्यांच्याही उरावर बसू पाहतो आहे, याची जाणीव होताच आता जगभरातील देश दहशतवाद संपविण्यासाठी एकवटले आहेत. दहशतवादाचा उदय ज्या देशातून झाला त्या पाकलाही आता पेरलीली ‘बाभळ’ टोचत आहे. त्यामुळे आता भारताच्या दहशतवादावर चर्चा करण्याच्या प्रस्तावाला तिकडून हिरवा कंदिल मिळतोय. काही महिन्यांपूर्वी दहशतवादावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांकडील राष्ट्रीय सुरक्षा संलागार यांच्यात चर्चा होणार होती. मात्र काश्मिर मुद्दा उपस्थित करत पाकने या चर्चेत  खो घातला; परिणामी नियोजित चर्चेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. खतपाणी घातलेल्या पाकचा आदर्श घेत आता नवी दहशतवादी संघटना उदयास आली आहे. आयसिसने सिरीयात दहशत माजवली आहे. युरोपिय देशांवर आक्रमण होत आहे. अलीकडेच पॅरिसवर मुंबई २६/११ सारखा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर फ्रान्सने दहशवाद्याला ठेचून काढण्याची मोहिम आखली असून इसिसच्या तळांवर क्षेपणास्त्रेही डागली आहेत. आणि दुसरीकडे दहशतवाद मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढणार्‍या पाकनेही आता मान मुरडत चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली आहे. अलीकडेच उफा आणि पॅरिसमध्ये शरिफ आणि मोदींची चर्चाही झाली. पण आता ही चर्चा पुढे सुरु ठेवण्यासाठी युध्द नको, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेविषयी दुमत नाही; पण युध्द नको, हे जगजाहीर करण्याची काय गरज होती. तिकडे शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे, आणि इथे आम्ही गप आहोत. हा आपला दुबळेपणा की सहनशीलता? उलटपक्षी देशाच्या परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांनी खणखाऊन सांगायला पाहिजे होते की, जर कोणी आमच्या नादी लागेल तर त्याची खैर नाही. दहशतवाद हा कळीचा मुद्दा आहेच आणि त्याला संपविणसाठी परराष्ट्रांचे सहकार्य गरजेचे आहे. मग तो पाकिस्तानही का नसो, पण सारासार विचार केला तर आपल्याला धोका हा इसिसपेक्षा लष्कर-ए-तोयबाकडून जास्त आहे आणि लष्कर-ए-तोयबाला लहानाचे मोठे पाकने केले. त्यामुळे पाकसोबत मैत्रीची भाषा नको, तर नाक दाबून बुक्का मारण्याची गरज आहे.

Sunday 13 December 2015

‘कॉंग्रेस’ची कीड ‘कमळा’ला लागली

राज्यात पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई यासारखे ज्वलंत विषय असताना नको त्या मुद्यावर चर्चा घडवून देश चालविणारे आपला वेळ वाया घालवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा फक्त गदारोळामुळे चर्चेचा विषय बनली आहे. विरोधात राहायचे म्हणून विरोध, आणि विरोधीपक्षांच्या मुद्द्याला फारसे महत्व द्यायचे नाही, म्हणून दुर्लक्ष या दोन्ही गोष्टींशिवाय पार्लमेंटमध्ये काहीच होताना दिसत नाही. आज राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यावर मात्र ठोस निर्णय होताना दिसत नाहीत.
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचा विषय हा काही आजचा नाही, ७० च्या दशकापासून खरी त्यांची वाताहत होत आहे.  १९७५ दरम्यान राज्यात भीषण दुष्काळासारखी परिस्थिती होती. त्याचवेळी इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी जाहीर झाली, त्यामुळे जणू दुहेरी संकंटच शेतकर्‍यांवर ओढवले होते. तेव्हापासून शेतकर्‍यांमध्ये ‘कॉंग्रेस’ची कीड घुसली आहे आणि आज तिची लागण इतकी वाढली आहे की, शेतकरी बेजार झाला आहे. तत्कालीन वेळी राज्यात दुष्काळामुळे परदेशी धान्य आयात करण्याची वेळ आपल्यावर आली होती. अमेरिकेने मग हायबे्रड भारतात पाठवला. हायब्रेड म्हणजे ज्वारी सदृश्य धान्य होय. परंतु, या हायब्रेड सोबत कॉंग्रेसनेही आपली पाळेपुळे येथील जमिनीत रोवली. कॉंग्रेस अर्थात एक विषारी गवत. आज पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस गवत हे शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात अनियमित आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे बरेच नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षांत तर हे प्रमाण अधिकच वाढले आहे.
बळीराजाचे पोट हे शेतीवर अवलंबून आहे आणि भारतातील मेट्रो शहरे देखील शेतीमालावर जगत आहेत. पण इथे शेतीमध्येच काही उगवत नसेल, तर खायचे काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कडधान्यांसह डाळींचा भाव गगणाला भिडणे, हा त्याचाच एक भाग आहे. भविष्यातील धोका ओळखून जर यावर आधिक उपाययोजना केल्या असत्या तर ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली नसती. कॉंग्रेसच्या काळात शेतकर्‍यांना योग्य हामीभाव देण्याचा निर्णय होणे अपेक्षित होते. हीच मागणी तेव्हा विरोधामध्ये असलेल्या भाजपाने केली होती. आता भाजप सत्तेमध्ये आहे. एकेकाळी शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आता शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला बगल देताना दिसत आहेत.
हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. पण जेव्हा हे सत्तेत होते, तेव्हा त्यांना शेतकरी दिसले नाहीत का? बॉलीवूडचे दोन कलाकारांनी बीडसाख्या दुष्काळसदृष्य जिल्ह्यात शेतकर्‍यांना मदतीचा हात समोर केला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांनी ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी काम करण्यास सुरुवातही केली आहे. मग जर दोन कलाकार मिळून हे सर्व करु शकतात, मग ज्यांच्या हाती सत्तेची किल्ली आहे, ते का नाही हे सर्व साधू शकत? परंतु, हे सर्व करायला इच्छाशक्ती असवी लागते, बहुदा हे सत्ताधार्‍यांकडे नसावी, म्हणून आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. २००१ पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. जे यापूर्वीच्या सरकारला जमले नव्हते. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन संपेपर्यंत शेतकर्‍यांच्या पदरी काहीतरी पडेल, अशी आपण अपेक्षा बाळगूूया.