Sunday, 13 December 2015

‘कॉंग्रेस’ची कीड ‘कमळा’ला लागली

राज्यात पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई यासारखे ज्वलंत विषय असताना नको त्या मुद्यावर चर्चा घडवून देश चालविणारे आपला वेळ वाया घालवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा फक्त गदारोळामुळे चर्चेचा विषय बनली आहे. विरोधात राहायचे म्हणून विरोध, आणि विरोधीपक्षांच्या मुद्द्याला फारसे महत्व द्यायचे नाही, म्हणून दुर्लक्ष या दोन्ही गोष्टींशिवाय पार्लमेंटमध्ये काहीच होताना दिसत नाही. आज राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यावर मात्र ठोस निर्णय होताना दिसत नाहीत.
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचा विषय हा काही आजचा नाही, ७० च्या दशकापासून खरी त्यांची वाताहत होत आहे.  १९७५ दरम्यान राज्यात भीषण दुष्काळासारखी परिस्थिती होती. त्याचवेळी इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी जाहीर झाली, त्यामुळे जणू दुहेरी संकंटच शेतकर्‍यांवर ओढवले होते. तेव्हापासून शेतकर्‍यांमध्ये ‘कॉंग्रेस’ची कीड घुसली आहे आणि आज तिची लागण इतकी वाढली आहे की, शेतकरी बेजार झाला आहे. तत्कालीन वेळी राज्यात दुष्काळामुळे परदेशी धान्य आयात करण्याची वेळ आपल्यावर आली होती. अमेरिकेने मग हायबे्रड भारतात पाठवला. हायब्रेड म्हणजे ज्वारी सदृश्य धान्य होय. परंतु, या हायब्रेड सोबत कॉंग्रेसनेही आपली पाळेपुळे येथील जमिनीत रोवली. कॉंग्रेस अर्थात एक विषारी गवत. आज पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस गवत हे शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात अनियमित आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे बरेच नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षांत तर हे प्रमाण अधिकच वाढले आहे.
बळीराजाचे पोट हे शेतीवर अवलंबून आहे आणि भारतातील मेट्रो शहरे देखील शेतीमालावर जगत आहेत. पण इथे शेतीमध्येच काही उगवत नसेल, तर खायचे काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कडधान्यांसह डाळींचा भाव गगणाला भिडणे, हा त्याचाच एक भाग आहे. भविष्यातील धोका ओळखून जर यावर आधिक उपाययोजना केल्या असत्या तर ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली नसती. कॉंग्रेसच्या काळात शेतकर्‍यांना योग्य हामीभाव देण्याचा निर्णय होणे अपेक्षित होते. हीच मागणी तेव्हा विरोधामध्ये असलेल्या भाजपाने केली होती. आता भाजप सत्तेमध्ये आहे. एकेकाळी शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आता शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला बगल देताना दिसत आहेत.
हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. पण जेव्हा हे सत्तेत होते, तेव्हा त्यांना शेतकरी दिसले नाहीत का? बॉलीवूडचे दोन कलाकारांनी बीडसाख्या दुष्काळसदृष्य जिल्ह्यात शेतकर्‍यांना मदतीचा हात समोर केला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांनी ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी काम करण्यास सुरुवातही केली आहे. मग जर दोन कलाकार मिळून हे सर्व करु शकतात, मग ज्यांच्या हाती सत्तेची किल्ली आहे, ते का नाही हे सर्व साधू शकत? परंतु, हे सर्व करायला इच्छाशक्ती असवी लागते, बहुदा हे सत्ताधार्‍यांकडे नसावी, म्हणून आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. २००१ पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. जे यापूर्वीच्या सरकारला जमले नव्हते. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन संपेपर्यंत शेतकर्‍यांच्या पदरी काहीतरी पडेल, अशी आपण अपेक्षा बाळगूूया.

No comments:

Post a Comment