Friday 8 February 2019

प्राच्यविद्यामध्ये शब्दांचे फटकारे अन् कौतुक

दर दोन वर्षांनी भरवली जाणारी बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद नुकतीच सांगली येथील प्रसिद्ध विलिंग्डन महाविद्यालयात पार पडली. औपचारिक उद्घाटनानंतर ‘प्राच्यविद्या’ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पूर्वी युरोपमध्ये ऑरिएन्टल काँग्रेस संकल्पना अस्तित्वात होती. साधारण १८७० च्या दरम्यान मध्य युरोपपासून जपानच्या संस्कृतीच अभ्यास करण्याची संकल्पना दृढ झाली. विस्तीर्ण स्वरुपात विस्तारलेल्या भूभागाच्या सार्वंगिक अभ्यास करण्याच्या हेतूने सुरु झालेल्या या परिषदेत नवीन उदयास येणाऱ्या आधुनिक युगाचा उहापोह होत असे. मग अशीच परिषद आपल्याकडे का नाही? आपल्या संस्कृतीची कवाडे जगभरासाठी का खुली करू नयेत? या उदात्त हेतूने १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज २०१९ मध्ये या परिषदेचे १३ वे अधिवेशन सांगलीत पार पडले. 

‘प्राच्यविद्या’च्या नावावरूनच ही संस्कृत भाषेशी निगडीत परिषद असावी, असा बोध होतो. वस्तुत: हे खरेही आहे. कारण या परिषदेत संस्कृत भाषेला आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न झाला. परिषदेच्या उद्घाटनावेळी जरी आयोजकांनी प्राच्यविद्या परिषद ही केवळ संस्कृत भाषा आणि हिंदू धर्माशी निगडीत नसून ही यामध्ये इतर भाषा, धर्मांतील अभ्यासकांसाठी दरवाजे मोकळे आहेत, असे स्पष्ट केले होते. परंतु, जसजशी परिषद पूढे जात होती आणि वेद-पुराणांची दाखले देऊन ज्याप्रमाणे विषय सादर होत होते, यावरून ही परिषद संस्कृत भाषेच्या जवळीचच वाटली. असो.. असे असले तरीही या परिषदचे कवाड सर्वांसाठी मोकळे आहे, हे पालि भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागावरून दिसून आले. या परिषदेत तब्बल १४५ शोधनिबंधांची नोंदणी झाली होती. त्यापैकी जवळपास १३५ शोधनिबंध सादर झाले. या १३५ शोधनिबंधांपैकी तब्बल ४५ शोधनिबंध एकट्या मुंबई विद्यापीठातील पालि भाषा विभागातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे होते. हा आकडा निश्चितच अभिनंदनीय आहे. त्यामुळेच आयोजकांनाही पालि भाषेतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. यंदाचे हे १३ वे अधिवेशन होते आणि सातत्याने मुंबई विद्यापीठाच्या पालि विभागातील विद्यार्थी या प्राच्यविद्या परिषदेत सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे उद्घाटनावेळीच परिषदेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांना या विभागातील विद्यार्थ्यांचे गोडवे गायले. तर परिषदेचे सहसचिव श्रीनन्द लक्ष्मण बापट यांनीही समारोपावेळी पालि विभागाच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले. पालि विभागाच्या विद्यार्थ्यांचे शोधनिबंधही त्याच तोडीचे होते. ‘बाला च पण्डिता च’ अर्थात ‘मुर्ख आणि पण्डित’, ‘सम्मावाचा’, ‘वृद्धाश्रमांची गरजच काय?’, ‘मैत्ता’ अर्थात मैत्री भावना, ‘कार्ला लेण्यांवरील शिलालेख’ असे विविध विषय या परिषदेत हाताळण्यात आले आणि हे सर्व विषय वाखणण्याजोगे होते. विषयांची मांडणी, प्रेक्षागृहातून आलेले प्रश्न, त्यावर उत्तर, उत्तरातून निर्माण झालेला प्रतिप्रश्न हे सर्व पाहण्यासारखे होते.
संस्कृत भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही पूर्ण क्षमतेने विषय सादर केले. नवख्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहण्यासारखे होते. श्लोकांचे स्पष्ट उच्चार, विषयांची मांडणी आणि निष्कर्षापर्यंत येत विषयाचा शेवट आणि त्यानंतर विचारलेला प्रश्नांना सडेतोड उत्तरे, हे सर्व वातावरण अल्हाददायक होते. खतं एवढीच की जर या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाला न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली असती तर परिषद आणखी खुलून दिसली असती. संस्कृतच्या अनेक विद्यार्थ्यांनी विषय तर सादर केले, पण ते तडीस नेताना अडकले. विशेषत: धर्म आणि तत्त्वज्ञान विभागात सादर झालेल्या विषयांमध्ये तर्काचा अभाव प्रकर्षाने दिसून आला. उदाहरण सांगायचे झालेच तर, एका विद्यार्थ्याने ‘व्यक्तिमत्व विकास’ विषय सादर करत असताना सध्याचे ‘सॉरी, ओके, थॅक्स’ या स्मार्ट शिष्टाचाराऐवजी संस्कृत साहित्यात जे ‘पंचयज्ञ’ सांगितले आहेत, ते करावे. जेणेकरून व्यक्तीमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. पण त्यांच्या विषयात तर्काचाच अभाव जाणवला. त्यामुळे मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्या विद्यार्थ्याला अवघडल्यासारखे वाटले. तर अभिजात साहित्यात ‘योगपीठासन स्तोत्र’ सादर करणाऱ्या विद्यार्थ्याला मनशुद्धीचे मॅकॅनिझम विचारले असता तो विद्यार्थी निरुत्तर झाला. एकंदर वाद-संवाद घडत असताना कुठेही द्वेषाचे वलय नव्हते. अर्थात उद्घाटन कार्यक्रमाचा ‘ते’ भाषण सोडले तर सर्व काही खेळीमेळीत चालले. अर्थात येथे ‘त्या’ भाषणाचा उल्लेख करतच नाही, कारण ते अर्थहिन होते. सादर करणारे विद्यार्थी आणि त्यांना प्रश्न विचारणारे मातब्बर यांची जुगलबंदी पाहण्यासारखी होती. परिषद अगदी शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. परिषदेच्या निमित्ताने सांगलीच्या स्थानिक इतिहासाची ओळख देखील झाली. तर्कशुद्ध आणि आध्यात्मिक जोड असणारे निबंध सादर होत असताना त्यावर साधकबाधक चर्चा झाली. मतांचे खंडण झाले. चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेल्या शोधनिबंधनांना शब्दांचे फटकारे बसले. आणि आपल्या गुणकौशल्याने सादर केलेल्या विषयांचे कौतुकही झाले.