Monday 14 August 2017

स्वराज्याची ‘दौलत’

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे झाली. गुलामगिरीच्या प्रदीर्घ दीडशे वर्षांच्या कालावधीत अनेक क्रांतीकारकांच्या स्मृती आज काळाच्या ओघात पुसट झाल्या आहेत. काही विस्मरणातही गेल्या आहेत. परंतु, आजचे स्वातंत्र्य हे त्यांच्या रक्ताची देण आहे. भारताच्या सुवर्ण इतिहासातील ही रत्ने इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवली आहेत. सामाजिक व राजकीय अशा दुहेरी साखळदंडात अडकलेल्या क्रांतीविरांनी ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले होते. गुलामगिरीच्या नकर पाशातून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी उभारलेल्या लढ्यातील योद्ध्यांना मात्र ब्रिटीशांनी ‘लुटारु’चा स्टॅम्प लावला. ब्रिटीश इंडियातील ‘ठग’ ज्यांनी जुलमी राजवटीविरोधात बंड पुकारला, त्यांना इतिहासात नगण्य स्थान मिळाल्याने स्वातंत्र्यलढ्यातील या नायकांच्या गाथा आज मिटत चालल्या आहेत.
रामोशी एक अशी जमात ज्यांनी नेहमीच क्रांती केली. त्यांची निष्ठा आणि पराक्रम पाहून चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामोशी जमातीतील लोकांना महत्त्वाची जबाबदारी दिली होती. शिवरायांच्या मावळ्यांमध्ये बहुतांशी सैनिक आजच्या एससी, एसटी प्रवर्गातील होते. रामोशींवर विशेष जबाबदारी होती. अफझल खानाचा पडाव, सुरत स्वारी ही रामोशी बहिरजी नाईक आणि त्यांच्या बहाद्दर साथीदारांमुळे फत्ते झाली होती. त्यामुळे रामोशींना किल्लेदारी बहाल झाली. कालांतराने सत्तातरे झाली. ब्रिटीशांनी गडकिल्ल्यांवर मोर्चा वळला. परंतु, पुण्यातील उमाजी नाईकांसारख्या किल्लेदारामुळे त्यांचे गडकिल्ले काबाजी करण्याचे स्वप्न भंगले. अखेर ब्रिटीशांनी रामोशींना लुटारु म्हणून घोषित करत त्यांची धरपकड सुरु केली. हे इतके जुलमी होते की, गर्भातील रामोशी देखील लुटारुच; त्याच्यावरही खटला भरला जात असे. हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतात होत होते. लढवय्या जमातींना लुटारु घोषित करुन त्यांचा बिमोड करण्याचा एककलमी कार्यक्रमच ब्रिटीशांनी आखला होता. 
ब्रिटीशांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात पेठून उटलेल्या उमाजींनी संघटन मजबुत करत रक्तरंजीत लढा दिला. १८५७ पूर्वीचा हा उठाव होता. आणि हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर लढा सुरु झाला होता. फरक एवढाच ही तो संघटीत नव्हता. बिहारच्या भागलपूरचे ‘धतुरया’ टोळीचा चतुर सिंग असो, की राजस्थानचे रखवालदार या सर्वांनी ब्रिटीशांविरोधात आवाज उठवला. उमाजी नाईकांनीही अशीच सशस्त्र क्रांती घडवली. पण त्यांचा संर्घष फारकाळ टिकला नाही. ब्रिटीश दस्ताएवजात त्यांना एक दरोडेखोर म्हणून घोषित करत फासावर लटकवले आणि येथून उडालेल्या ठिणगीचा वणवा दौलतराव नाईकाच्या रुपाने भडकू लागला. उमाजी नाईक आणि दौलतराव यांच्यातील कालावधी साधारण ५० वर्षांचा. १८३२ मध्ये उमाजींना फासावर चढवले. तर दौलतराव आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंचा उजवा हात. उमाजी नाईकांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची खुणगाठ मनाशी बांधून दौलतरावांनी रायगड गाठले. जशी शिवाजी-तानाजीची जोडी, तशी वासुदेव-दाैलतराव यांची. फडकेंच्या भेटीपूर्वीच दौलतरावांनी ब्रिटीशांच्या नाकीनऊ आणले होते. ब्रिटीशांचे हस्तक सावकार, जमीनदारांना लुटायचे आणि जे द्रव्य गोळा होईल, ते स्वराज्यकामी आणयचे हे एकच धोरण दौलतरावाने आखले होते आणि रामोशी जमातीतील इतर शूरवीरांना घेऊन एक संघटना बांधली होती. फडकेही अशाच क्रांतीकारकांच्या शोधात होते आणि त्यांना स्वराज्याची दौलत सापडली. फडकेंच्या फौजमध्ये रामोशी, महार, मातंग, कोळी, कुणबी, चर्मकार, नाभिक, मराठा आणि मुसलमान अशा विविध जातीधर्मातील क्रांतीवीरांचा समावेश होता. ब्रिटीश राजवटीच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी धनदांगड्यांच्या घरावर दरोडा घालयाचा आणि त्याचा उपयोग स्वातंत्र्यलढ्यासाठी करायचा, हे काम दौलतरावाचे. या कामात मोलाची साथ मिळायची तरी हरी मकाजी नाईक याची. वासुदेव बळवंत फडकेंच्या लढ्यातील शिलेदार हे दोन ‘नाईक’ होते. दौलतरावाचा शेवट लढताना हुतात्म्य पत्कारत झाला झाला तर हरी नाईकाला त्याच्या कुटुंबासह ब्रिटीशांनी १८७९ मध्ये चकमकीत ठार मारले. 
उमाजी नाईकांच्या समकालीन एक असाही नायक होता जो इतिहासाच्या पानांमधून हरवला आहे. त्याचे नाव चतुर सिंग. अर्थात इतिहासात क्रांतीकारी म्हणून याची गणना झाली नसली तरी त्याने ब्रिटीश राजवटीला जेरीस आणले होते. ब्रिटीश व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी त्यानेही धनदांडग्यांना लुटण्याचा चंग बांधला होता. परंतु, त्याचा लढा रक्तरंजीत नव्हता. ‘धोतरा’ या विषारी गवताच्या फुलांचा वापर करुन जमीनदारांचा विश्वास संपादित करुन त्यांच्यावर विषप्रयोग करायचा आणि त्याची ‘धतुरया’ टोळी सर्व माल लुटायची. मंदिरेही या टोळीने सोडली नव्हती. ब्रिटीश कायद्यात शस्त्रच्या संज्ञेत ‘धोतरा’ नसल्यामुळे नक्की पकडायचे कोणाला? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण चतुर सिंग यांच्याच टोळीतील एका फितुराने घात केल्यामुळे धतुरया टोळी ब्रिटीशांच्या तावडीत सापडली. 
ब्रिटीशांची आर्थिक कुचंबणा करण्यासाठी क्रांतीविरांनी १८०० सालापासूनच सुरुवात केली होती. यात काही पेशेवर ठग होते तर काही स्वराज्याच्या लढ्यासाठी लुटमार करत होते. मद्रास प्रांतात किम सिंग, पुण्यात उमाजी नाईक, बिहारमध्ये चतुर सिंग, झारखंडमध्ये बिरसा मुंडा, पिंडारी जमात आणि अशा अगणीत शुरवीरांनी ब्रिटीश राजवटीला खिळखिळी केली. त्यामुळे ब्रिटीशांनी विल्यम स्लीमनच्या नेतृत्वाखाली ‘ठगांचा’ बंदोबस्त करण्याची एककलमी कार्यक्रम आखला. १८१० पासून जमीनदारांविरोधात जाणाऱ्यांचा बदोबस्त ब्रिटीशांनी लावला. १८२६ ते १८३५ च्या हजारोंच्या संख्येने क्रांतीकारकांना फासावर लटकवले. रामोशींवर तर आईच्या उदरात असतानाच खटले चालवले आणि त्यांना शिक्षा केली. ब्रिटीशांची ही जुलमी राजवट मोडीत काढण्यासाठी उमाजी नाईकांचा आदर्श वासुदेव बळवंत फडकेंनी बंड पुकारला. तत्पूर्वी, १८५७ चा उठाव झाला होता. पण हा श्रीमंतांचा उठाव होता. जमीनीशी सलग्न असलेले किंबहुना जंगलात राहणाऱ्या आदिवासींपैकी बिरसा मुंडाने जमीनदारी व्यवस्थेलाच आव्हान दिले. आदिवासींची आंदोलने उभारली. परंतु, जमीनदारीविरोधात आवाज उठवणे ब्रिटीश शासनाला परवडण्यासारखे नव्हते. परिणामी त्याला तुरुंगवास झाला आणि तुरुंगातच १९९० च्या सुमारास मुंडाने शेवटचा श्वास घेतला. स्वराज्याच्या या ‘दौलती’च्या जोरावर पुढे चाफेकर बंधु, लाला लाजपतराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस आदींनी क्रांतीची मशाल तेवत ठेवली. त्यामुळे आज स्वांतत्र्याचा प्रकाश चहूबाजूने झळकत आहे.