Saturday, 1 August 2015

आषाढी पोर्णिमा आणि बुध्द धम्म

आषाढी पोर्णिमा आणि बुध्द धम्म
बौध्द धम्मात पोर्णिमांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक पोर्णिमा या तथागत गौतम बुध्दांच्या आयुष्याशी जोडल्या गेल्या आहेत. गौतम बुध्दांच्या आयुष्यात प्रत्येक पोर्णिमेदिनी मंगलमय प्रसंग घडले आहेत. आज शुक्रवारी आषाढी पोर्णिमा आहे; या पोर्णिमेलाही गौतम बुध्दांच्या आयुष्यात अनेक महत्वाच्या घडल्या. बौध्द धम्मात जसे वैशाख पोर्णिमेला महत्व आहेत, तितकेच महत्व आषाढी पोर्णिमेलाही आहे. सिध्दार्ंथ गौतम यांची आई महामाया यांना गर्भधारणा, सिध्दार्थ गौतमाचा गृहत्याग करुन परिव्रज्या, पहिले धम्म प्रवचन आणि वर्षावास प्रारंभ याच पोर्णिमेपासून सुरु झाला. वर्षावास मुख्यत्वे भिक्खूंच्या जीवनाशी निगडीत असून तत्कालीन वेळी पाचशेच्या पाचशे भिक्खूंचा संघ एका गावातून दुसर्‍या गावात जात असतं, पावसाळ्यात शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्याची सुरुवात बुध्दांनी केली होती. उपासक म्हणून वर्षावास काळात सर्वांनी उपोसथ पालन केले पाहिजे. जमेल तसे आठ शीलांचे पालन केले पाहिजे.
सम्यक सम्बोधी प्राप्त झाल्यानंतर भगवान बुध्दांनी आषाढी पौर्णिमेला कौण्डिण्य, भद्दीम, महानाम, वप्प व अश्वजीत या पंचवर्गीय भिक्खूसह ऋषीपतन हरणाच्या बागेत सारनाथ येथे पहिला उपदेश दिला; यालाच पहिले धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. पहिला उपदेश देताना सम्यक बुध्द म्हणाले, ‘इदं खो भिक्खवे, जाती पी दुखं, जरा पी दुखं, व्याधी पी दुखं, मरणं पी दुखं!’ अर्थात हे भिक्षू, जन्म दुखःद आहे, जगणे दुखःद आहे, आजार दुखःद आहे आणि मरणे दुखःद आहे. पुढे म्हणातात, ‘संक्खीतेणं पंचुपादन खंदा दुखा’ अर्थात सक्षिप्त मध्ये पाहिलं गेल तर पंचस्कंद दुखःद आहे. (पाच स्कंदः रुप, वेदना, संज्ञा, विज्ञान, संस्कार) पुढे ते म्हणतात, काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा या दुखःचे मुळ आहे. या तृष्णांचा अंत करण्यासाठी आर्यसत्याची जाणीव करुन घ्यायला पाहिजे. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात (सुत्तपिठक, विनयपिठक आणि अभिधम्मपिठक) चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य धम्माचा पाया आहे. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला. भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे. दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे. दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख कां होते? त्याला दु:ख कां भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो. परंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्माच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद या सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही. तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.
कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधीही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो. जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा? तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल. हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो.
भगवान बुध्दांनी अष्ठांग मार्गाचा अवलंब करावा, असा उपदेश दिला. सम्यक दृष्टी, सम्यम संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक कर्म, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे आठ मार्ग आहेत, ज्याच्या माध्यमातून दुखःतून मुक्ती मिळू शकते. रुप अनित्य आहे, वेदना अनित्य आहे, संज्ञा अनित्य आहे, विज्ञान अनित्य आहे आणि संस्कारही अनित्य आहे. सर्व संस्कार हे अनित्य आहेत, असा उपदेश धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात दिला आहे.
जगात आषाढी पौर्णिमा सर्वात मोठा सण व आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान बुध्दांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधःकरातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान उपदेशिले. प्रथमच मानवाला दुःख मुक्तीचे ज्ञान धम्मचक्क पवत्तन सुत्ताच्या द्वारा अर्पण केले. त्यामुळे मनुष्य मात्राने आषाढी पौर्णिमेला हा उपदेश केल्यामुळे या घटनेला पहिले धम्मचक्रप्रवर्तन म्हणून सार्‍या जगाने मानले आहे. भगवान बुध्दांनी याच दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमेला इ.स.पूर्व ५२८ ला भिक्खुसंघाची स्थापना केली आणि भिक्षूंना आदेश केला, ‘चरथ भिक्खवे चारीकं बहुजन हिताय बहुजन सुखायं! लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुस्सानं! देसेथ भिक्खवे, धम्मं आदी कल्याण मज्झे कल्याण परियोसान कल्याणं! सात्थं सव्यज्जनं केवल परिपून्न परीसुद्ध ब्रम्हचरियं पकासेथ!’ अर्थात हे भिक्षुंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही चालत रहा, लोकांवर अनुकंपा करीत देव (देव म्हणजे इश्‍वर नव्हे, दानशुर व्यक्तीच्या अर्थाने अर्थ घ्यावा) आणि मनुष्याच्या सुख आणि हितासाठी प्रयत्नशील रहा, हा मी धम्म जो देत आहे, तो सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्यम कल्याणकारी आहे आणि शेवटीही कल्याणकारी आहे, अशा धम्माचा उपदेश करुन त्यांनी धम्माच्या मार्गावर आरुढ होण्याची प्रेरणा भिक्खूंना दिली. त्याचप्रमाणे बौध्द धम्मामध्ये वर्षावासाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. संघाची स्थापना झाल्यानंतर महिन्याचे तीसही दिवस संघ गावोगावी जाऊन धम्माचे प्रचार व प्रसार कार्य करु लागला. पूर्वीच्या काळात अनेक ठिकाणी वर्षावास होत असत व सारे वातावरण धम्ममय होऊन जात असे. आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरु होतो व अश्विनी पौर्णिमे पर्यंत चालतो. या वर्षी दि. ३१ जुलै पासून ते दि. २७ ऑक्टोबर २०१५ कालावधीत वर्षावास आहे. हा काळखंड पावसाळ्याचा असतो. वैशाखाचा कडक भाजून काढणार्‍या ऊन्हाचा ताप नसतो. वातावरणात सुखद गारवा असतो. माणसांची अवस्था प्रसन्न असते. म्हणून हा कालखंड धम्म श्रवण करण्यास योग्य असतो. बुध्दांच्या आदेशाला अनुसरून भंते वर्षभर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी चारिका करीत धम्म प्रचाराचे व प्रसाराचे महान कार्य करीत असत. पूर्वीच्या काळी आताच्या काळासारखे सारखे दुषित वातावरण नव्हते त्यामुळे खूपच पाऊस पडत असे. पावसाळ्यात या चार महिन्यांच्या काळात त्यांच्या या धम्म प्रचाराच्या व प्रसाराच्या कार्याला मर्यादा पडत असत. पावसामुळे भिजलेले चिवर लवकर वाळत नसे आणि ओले चिवर वापल्यामुळे आजारी पडण्याचा संभव असे. याशिवाय एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी आजच्या सारखी वाहने नव्हती. पायी प्रवास करावा लागत असे. रस्यात चिखल व पाणी साचलेले असल्याने रस्त्यातून चालणे कठीण होत असे. रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेल्या गवतातून अनेक जीवजंतू व प्राणी रस्त्यात वाटेत आल्यामुळे रस्त्याने चालणे अवघड व गैरसोईचे होत असे. शिवाय शेतातून मार्गक्रमण करतांना पिकांचे नुकसान होत असे. भंतेंकडून धम्म प्रचार तर व्हायला पाहिजे. परंतु या अडचणी लक्षात घेऊन आणि चतथ भिक्खवे चारीकं या आदेशाऐवजी भंतेंना वर्षावासाच्या काळात एका ठिकाणी रहाण्याची सवलत दिली गेली. या काळात भंते एखाद्या विहारात, लेण्यात अथवा गावात राहतात. त्या ठिकाणी गावातील लोक एकत्र येऊन धम्म प्रवचन ऐकतात, धम्म देसना घेतात. अशाप्रकारे लोक धम्माच्या प्रवाहात येतात. ध्यानाच्या माध्यमातून सुध्दा अनेकजन धम्म जाणून घेतात आणि दु:खमुक्त होतात. बौध्द धम्म विघातक शक्तींनी व मनुवाद्यांनी बुध्द धम्म भारतातून नष्ट केल्यानंतर या वर्षावासाचे चातुर्मासात रूपांतर केले. आता १९५६ साली बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केल्यामुळे या वर्षावासानिमित्त ठिकठिकाणी धम्म शिबिरांचे कार्यक्रम राबविणे, अनेक बुध्द विहारांमधुन लहान मोठ्यांना सर्वांना वंदना शिकविणे. धम्म शिकविणे असे कार्यक्रम मोठया प्रमाणात राबविले जातात. उपासक म्हणून वर्षावास कसा साजरा करावा, यामध्ये अनेक मतभिन्नता असतील, मात्र उपासक या नात्याने जमेल तसे उपोसथ पालन अर्थात आठ शिलांचे पालन सर्वांनी केले पाहिजे.

- विनय शाक्य

No comments:

Post a Comment