Monday, 14 November 2016

शिक्षणासाठी ‘करुणा’मय फुंकर

सर्व शिक्षा अभियानांतर्गत सरकारने मोफत  आणि सक्तीचे शिक्षण केले. शिक्षणगळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर जनजागृती अभियानही राबविले, मात्र तरीही शिक्षणगळती काही थांबली नाही. सक्तीचे शिक्षण असूनही आजही अनेक मुलं डम्पिंगवर कचरा वेचताना दिसतात. तर कुठे विटभट्टीवर काम करताना दिसतात. घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या या मुलांना दोन वेळचं काही मिळतेय का, याची भ्रांती लागलेली असते. यातूनच अल्पवयीन गुन्हेगारीही वाढत आहे. त्यामुळे उद्याचे भविष्य असलेल्या या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचा विडा काही सामाजिक संस्थांनी उचलला आहे. आजच्या बालदिनाचे औचित्य साधून मुलांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी युद्धपातळीवर स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्यांविषयी हा लेख. 
शिक्षणगळीतीची आकडेवारी काढायची असेल तर मुंबईतील झोपडपट्ट्या चाळल्या तर लगेच मिळेल. मुंबईतील बहुतांशी झोपडपट्टीमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यातही डम्पिंग परिसरात राहणाऱ्या मुलांनी शाळाही पाहिली नसेल. याच मुलांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले जाते. त्यांना बालमजुरीकडे ढकलले जाते. प्रगतीचा आव आणणाऱ्या आर्थिक राजधानी मुंबईचे हे कटू सत्य आहे. परंतु, या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ‘कारुण्या’ ट्रस्टच्या मार्फत होत आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ही संस्था झटत आहे. शिक्षणासह पोषक आहारावरही या संस्थेचा भर आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी या संस्थेने गोवंडीत ‘ज्ञानसाथी’ ही शाळा सुरु केली. उद्देश होता येथील मुलांचा सर्वांगिण विकास करायचा. मग संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी डम्पिंग परिसरात जाऊन मुलांच्या पालकांचे पहिले समुपदेशन केले. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी खेळाच्या माध्यमातून सुरुवात झाली. खेळाबरोबर पौष्टीक आहार मिळताेय, म्हणून मुलंही आकर्षित होऊ लागली. मग मुलांना मुळपदावर आणण्याचे काम सुरु झाले. ‘जो खड्ड्यात आहे, त्याला खड्ड्यात राहू दे, आम्ही अन्नपुरवठा करतो’, अशी काहींची प्रवृत्ती असते. म्हणजे मुलांना आश्रय देणे आिण त्यांच्या नावावर फंड गोळा करणाऱ्या अनेक संस्था आज आपण पाहत आहोत. त्यापैकी काही बोगसही आहेत. केवळ फंड मिळवणे हा त्यांचा धंदा. पण कारुण्या ट्रस्ट याला अपवाद आहे. मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी शिक्षणाला प्राथमिकता दिली. आज ‘ज्ञानसाथी’तील मुलं चांगली शिक्षीत झाली आहेत आिण या संस्थेचे कार्य आजही अविरत सुुरु आहे. आज या संस्थेच्या माध्यमातून ३५० मुलांना दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जात आहे. सोबतच पोषक आहारह पुरवला जातो. ज्ञानसाथीने आपली एक शाखाही स्थापन केली आहे. ‘ज्ञानसाथी-१’ मध्ये २०० मुलं आिण ‘ज्ञानसाथी-२’ मध्ये १५० मुलांना शिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे.
शिक्षणाबरोबर या मुलांना कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. बॉलीवूड कलाकारांनीही ‘कारुण्या’च्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. केवळ शिक्षण ही आजची परिस्थिती राहिली नाही. शिक्षणाबरोबर क्रीडा­-कलामध्येही मुलांना विकसित करणे गरजेचे आहे. दुर्देवाने पालिकांच्या शाळेमधून असे होताना दिसत नाही. ‘कारुण्या’ने डम्पिंग परिसरात राहणाऱ्या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. ही त्यांची अचिव्हमेंट आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी ‘कारुण्या’चे स्वयंसेवक डम्पिंग परिसरात जाऊन मुलांच्या पालकांचे समुपदेशन करत होते. मुलांचे शिक्षण का महत्वाचे आहे, हे पटवून देत होते. त्यानंतर या ‘उनाड’ मुलांना शिक्षणाची गोडी लावणे, हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते. लहानपणापासूनच अशिक्षित राहण्याचा ‘संस्कार’ खोडून काढण्याचे दिव्य काम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. हे करत असताना कार्यकर्त्यांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागला. परंतु, कार्यकर्त्यांचे अधिष्ठान पक्के असल्यामुळे आज ही संस्था यशाचे शिखर गाठू शकली आहे. ‘कारुण्या’च्या या प्रयत्नांना आज यशाची फळे आली आहेत. गतवर्षी राज्यात शिक्षणगळती झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १.६ कोटी होती. मुंबईतही शिक्षणच न घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, कारुण्या सारख्या संस्थांमुळे हे प्रमाण निश्चितच कमी होत आहे.
कारुण्या ट्रस्टप्रमाणेच कर्जत आदिवासी पाड्यातही एक संस्था गरीब-गरजु मुलांना शिक्षण देण्यासाठी झटत आहे. गेल्या ३ वर्षांपासून आदिवासी पाड्यांवर ‘अर्थ’ संस्था काम करत आहे. कर्जत तालुक्यातील डोनेवाडी या आदिवासी पाड्यात ही संस्था कार्यरत असून येथील मुलांना मोफत प्राथमिक संगणक प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या पाड्यात प्राथमिक शाळेचा केवळ एक वर्ग असून यामध्ये पहिली ते चाैथीच्या विद्यार्थ्यांना एकाच खोलीमध्ये बसवले जाते. या चार वर्गांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक. तोही नेहमी गैरहजर असतो. ‘सर्व शिक्षा अभियाना’चे हे कटू वास्तव आहे. परंतु, या मुलांचा शैक्षणिक विकास करण्याची जबाबदारी ‘अर्थ’ या संस्थेने उचलली आहे.

Tuesday, 11 October 2016

Dhammachakra pravartan; वेदना एक्स्प्रेस @ निर्वाण

वेदना एक्स्प्रेस @ निर्वाण
धम्मचक्कपवत्तनदिनाचे अर्थात अशोका विजयादशमीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबरला धम्मदिक्षा घेतली. यंदाचा हा दिवस ११ ऑक्टोबर २०१६ रोजी आला आहे. त्यानिमित्ताने बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर छोटासा प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न. सर्व दु:खांचे मुळ ‘वेदने’तून आहे. सुखद-दुखद वेदनाची जाणीव करत तृष्णेत आपण वावरत आहोत. पण याच पण ‘वेदना’ एक्स्प्रेसच्या माध्यमातून निर्वाणाच्या स्टेशनपर्यंत पोहचता येते, हे कधी आपण जाणलेच नाही.
‘लाईट ऑफ एशिया’ भगवान बुद्धांना शांतीचा दूत म्हणून पाहिले जाते. बुद्धांनी दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला. अष्टांग मार्ग, दहा पारिमिता, पाच-आठ शील आदी उपदेश बुद्धांनी दिले, हे जगमान्य आहे. पण एवढेच सांगून त्यांच्या धम्माची व्याप्ती संपते का, तर नाही. बुद्धांनी दु:ख मुक्तीचा मार्ग सांगितला म्हणजे नेमके काय सांगितले, यावर ‘परि’संशोधन होणे गरजेचे आहे. दु:खाची परिसीमा गाठण्यासाठी त्याची जाणीव समता भावात करणे गरजेचे असते. त्यासाठी ‘वेदने’चा अभ्यास कसा करायचा, हे बुद्धांनी सांिगतले. ‘वेदना’ हे बुद्धांचे सर्वात मोठे संशोधन आहे. आपले जी इंद्रीय आहेत, डोळ्याचा विषय बघने आहे. कानाचा विषय शब्द आहे. जीभेचा विषय चव आहे. नाकाचा गंध ओळखणे आहे. त्वचेचा विषय स्पर्श आहे. मनाचा विषय चिंतन आहे. या इंद्रीय विषयातून बाहेर पडल्यानंतरच दु:ख मुक्ती शक्य आहे. परंतु, वरचरची ‘शुद्धीकरण’ उपयोगी ठरत नाही. त्याला अंर्तमनातून विकारमुक्त व्हावे लागते. त्यासाठी विपस्सनेतूनच हे शक्य आहे.
वरकरणी आपण कितीत म्हटले की, द्वेष करायचा नाही, आसक्ती करायची नाही. मोहरहित जगायचे. मात्र अंर्तमनात विकारांचे प्रोडक्शन सुरुच असते. येथे बाह्यमनावरच नियंत्रण नसते, तर अंतर्मनावर कोठून येणार. आिण नकळत राग, मोह, द्वेषाच्या पडलेल्या गाठी घट्ट करत जातो. इंद्रीय विषयांचा स्पर्श, त्या स्पर्शातून वेदना, वेदनेतून तृष्णा अशी साखळी बनत जाते आिण या साखळीतून स्वत:ला सोडविणे जाम कठिण बनते. दृढ अधिष्ठान पाळू शकत नसल्यामुळे आपण इतरत्र मन गुंतविण्यात धन्यता मानतो. मग कुठे देवापुढे साकडे घाल, नवस बोल, सुखरुप ठेवण्यासाठी पुजा-अर्चा, असे नानाविविध कर्मकांड सुरु होतात. मात्र हे निव्वळ पलायन असते, हे ठावूक असून सुद्धा मांजर दुध पिण्याप्रमाणे सर्वजण नुसते गाढा ढकलत असतात.  हे एकप्रकारे सत्यापासून पळवाट असते. अशा पळवाटीतून मुक्ती साधता येत नाही. म्हणून अंर्तमनात काय चालले आहे, हे बघण्याचे आदेश बुद्धांनी दिले. शरिरावरील ज्या संवेदना होत आहेत, ‘कायस्स पच्चया वेदना’ मन शरिराला स्पर्श करत आहे, आिण या स्पर्शातून सुखद-दुखद वेदना होत आहे आिण प्रतिक्रीया देखील सुरु आहे, मग याला मुक्ती म्हणता येणार नाही. पळवाट मुक्तीचा मार्ग नव्हे. त्यामुळे चित्त आिण शरिर या दोघांच्या संसाराचा सर्व प्रपंच पाहणे आवश्यक आहे.  मन आिण शरिरामुळे होणाऱ्या संवेदना, आिण त्यातून निर्माण होणारा द्वेष, राग, मोह, प्रतिक्रीया करण्याची सवय आिण हे अनित्य कसे आहे, हे समतेने पाहिले पाहिजे. हे वाचून अथवा ऐकूण समजण्यासारखी गोष्ठ नाही. त्यासाठी प्रॅक्टीस करणे गरचेचे आहे आिण याची सुरुवात ‘आनापाना’पासून होते. श्वास हा असे एकमेव साधन आहे, ज्याप्रती आपण कधीच द्वेष व्यक्त करत नाही. किंवा कधी आसक्तीही व्यक्त करत नाही. असे कधीही कोणाला बोलताना एकले नाही की, मला श्वासाची मात्र जास्त हवेय. किंवा मला आता श्वासच नको. परंतु, या श्वासाकडे पाहणेच आपण विचारलो आहे. पाहणे एकाअर्थाने अनुभव करणे आहे. आजही आपण ‘बघ अमुक अमुक पदार्थ कसा झालाय’, असे ओघाने म्हणतो. येथे बघचा अर्थ पाहणे नसून अनुभव घेणे असतो. संत कबीर म्हणतात, ‘सास सास पर ध्यान दे, व्यथा सास ना खोय, ना जाने इस सास का आवन होय ना होय’. याच श्वासाला माध्यम बनवून समतेमध्ये राहण्याचे धडे गिरवायचे असतात. श्वास कसा येतो, कसा जाताेय, हे नॅचरल पद्धतीने पाहिले की समता जागृत होत राहते. प्रज्ञा जागृत होते. विपस्सनेच्या क्षेत्रात जाण्याची ती सुरुवात असते. 

Wednesday, 13 July 2016

बेछुट औद्योगिकीकरण निसर्गाच्या मुळावर


नापिक जमीन, पावसाची कमतरता, अवकाळी संकट यामुळे शेतकरी बेजार झाला असून गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचा आलेख वेगाने वाढत आहे. गतवर्षी भारतासह महाराष्ट्राला भयाण दुष्काळाने ग्रासले होते. त्यामुळे खेड्यांसह शहरी भागातही पाण्याची भीषण टंचाई जाणवली. गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असला तरी अद्यापही काही शहरांमध्ये पाणीटंचाई लागू आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचे महत्व किती असते, हे आता नागरिकांना कळून चुकले आहे. किंबहूना याची जाणीव प्रशासनालाही झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने वन महोत्सवानिमित्त राज्यात दोन कोटी झाडे लावण्याचा सकल्प हाती घेतला होता. यासाठी सरकार आिण्ा या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक. याचा पुढचा टप्पा म्हणजे संवर्धन. आता ते कसे होईल, हे येणारा काळच ठरवेल.
वन संपत्तीचा ऱ्हास आिण वाढते औद्योगिकीकरण हे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत महत्वाचे घटक आहेत आिण या गंभीर प्रश्नावर जागतिक चर्चाही होते. जागतिक पर्यावरण परिषदेत ग्लोबल वाॅर्मिंगविरुद्ध लढण्याच्या आणाभाका हाकल्या जातात. परंतु, याचे मुळ कारण दुर करण्याच्या दृष्टीने कोणताही देश पुढे येताना दिसत नाही. अर्थात आज तंत्रज्ञान आिण औद्योगिकीकरण हा आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाला आळा घालणे व्यवहारीकदृष्ट्या अशक्य आहे, हे मान्य. परंतु, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही ना, याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे दायित्व आहे. गेल्या ५० वर्षांत जागतिक पातळीवर ५० टक्के जंगल नष्ट झाले आहे. एकेकाळी सहज आढळणारे प्राणी आज दुर्मिळ होत आहेत. भारत सरकारलाही ‘सेव्ह टायगर’ सारखी माेहिम राबवावी लागत आहे. गेल्या ५० वर्षांत अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. औद्योगिक युग सुरु झाल्यापासून माणसाचे सरासरी आर्युमानही कमी झाले आहे आिण सरासरी तापमानाचा पाराही दिवसेंिदवस वाढत आहे. पिसाळलेल्या औद्याेगिकीकरणाचा हा परिणाम आहे. परंतु, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, याचे भानच न राहिल्यामुळे पर्यावरणाचे युध्दपातळीवर संरक्षण करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. भारताकडून तशा योजनाही आखल्या जात आहेत, पण हे पुरेसे आहे का?  
सरकारने भारताचा चेहरा-मोहरा बदलण्याची भूमिका स्वीकारली आहे. विकसित देशाच्या रांगेत बसण्यासाठी भारताचे राक्षसी प्रयत्न सुरु आहेत. भुसंपादन हा त्याचाच एक भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करुन तेथे इंडस्ट्रीयल झोन निर्माण केला आहे. गुडगाव आिण नवी मुंबई हे शहरे त्याचे जीवंत उदाहरण आहे. देशात रस्त्यांचे जाळे वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खडी उपयोगात आणली जात आहे. मात्र या खडी येतात कोठून? तर डोंगर फोडून. एकीकडे वृक्षलागवड करायची, आिण दुसरीकडे डोंगर फोडण्याऱ्यांना आवरायचे नाही, ही दुटप्पी भूमिका कशाला हवी? म्हणजे डोंगर काय वनसंपत्तीचा भाव नव्हे का? त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न नको का? दुर्देवाने डोंगरांचे संरक्षण करण्याची कोणतीही योजना सरकारच्या अजेंड्यावर नाही. डोंगरावर प्रहार करणाऱ्या ठेकेदारांना मोकळे राण मिळाले आहे. ही दुसरी गोष्ट आहे की, डोंगर फोडण्याचे कंत्राट अर्थात क्वारी या प्रतिष्ठीत पुढाऱ्यांच्या आहेत.
नवी मुंबईतील बहुतांशी डोंगर ५० टक्क्यांच्यावर फोडून नष्ट केले आहेत. नवी मुंबई हे प्रातिनिधीक उदाहरण आहे, असे प्रकार सर्रास्ा देशभरात सुरु आहेत. औद्योगिक विकासाचा चालणा देण्याच्या उद्देशाने येथे निती आखली जात आहे. परंतु, देशाची सुमारे ७० टक्के लोकसंख्या किंबहून त्याहीपेक्षा जास्त लोकसंख्येचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. पण सरकारच्या दुर्लक्षित धोरणांमुळे या वर्गावर आत्महत्येची वेळ आली आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस गेला आहे. परिणामी उत्पादन थंडावले. 
कृषी विकास हा वनसंपदेचा भाग नव्हे का? तरी बरे, वनमहोत्सव कृषीदिनाचे औचित्य साधूनच आयोजित केला होता. परंतु, या महोत्सवात कृषीक्षेत्राच्या िवकासाच्या दृष्टीने कोणतीही योजना आखल्याचे दिसले नाही. केवळ झाडे लावण्यावर भर दिला. यापैकी ४० टक्के झाडे जरी जगली तरी हे अभियान यशस्वी झाले असे समजावे. पण पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी, दुष्काळाशी सामना करण्यासाठी झाडे लावण्याबराेबरच डोंगर, नद्यांना संरक्षण देणेही तितकेच महत्वाचे आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीने व्यापक योजना राबविल्या पाहिजेत. जमिनीचा कस दिवसेंदिवस खालावत आहे. हा कस कसा अबाधित राहिल, यासाठी वनसंपदेचे रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याला खत, बी-बियाणांचे अद्ययावत ज्ञान दिले पाहिजे. इतर देशांमध्ये मर्यादित शेतजमिन आहे. परंतु, आपल्याकडे विपुल जमिन, नैसर्गिक साधणे आहेत. त्याची उपयोगीता वाढविली तर, भविष्यात दुष्काळाचा सामना करण्याची गरज पडणार नाही.  

Monday, 27 June 2016

जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह

आज आरक्षण असावे की नसावे, या मुद्द्यावरुन दोन गटांमध्ये वाद आहेत. आरक्षणामध्ये जातीच्या कुबड्या नको, आर्थिक निकषांवर आरक्षण योग्य आहे, असे रेटाने म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. तर आमचे आरक्षण कदािप जाऊ देणार नाही, म्हणून रस्त्यावर उतरणारा दुसरा गट आहे. परंतु, आरक्षण आिण सध्याची स्थिती याचा अभ्यास कोणीच करताना दिसत नाही. आर्थिक निकष योग्यच आहे, पण यामुळे जातीचा निकष अवैध कसा ठरु शकतो? मुळात ही संकल्पना कोठून आली, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. आज, २६ जून आरक्षणाचे जणक कोल्हापुर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४२ वी जयंती. त्यांनी जातीव्यवस्था नेहमी नाकारली. कमजोर घोड्याला शर्यतीसाठी तयार करण्यासाठी त्याच्यावर विशेष मेहनत घेतली पाहिजे, तरच तो शर्यतीमध्ये टिकून राहिल, नाहीतर केव्हाचा बाहेर फेकला जाईल, हे त्यांचे धोरण त्यांच्या कर्मठ मंत्र्यांनाही मान्य करावे लागले होते.
आराक्षण कोणाला द्यावे, याचे काही निकष संविधानात आखून दिले आहेत. ब्रिटीशकाळातच याची आखणी झाली आहे. संविधानातही जातीवार आरक्षणाचा उल्लेख आहे. मुळात ते आरक्षण नसून प्रतिनिधीत्व करण्याची संधी आहे. ही संधी ब्रिटीशांनी गोलमेज परिषदेद्वारे केव्हाच दिली होती. अस्पृश्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुहेरी मतदानाचा हक्कही आणला होता. पण तो पुणे करारामुळे अंमलात येऊ शकला नाही. मात्र प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. पण विशिष्ट्य जातीलाच का झुकते माप मिळत आहे? हा आजच्या तरुणांपुढे प्रश्न आहे. याच्या उत्तरासाठी इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. भारतात जातीव्यवस्था का आिण काेणी अस्थित्वात आणली, याचे ठोस पुरावे नाहीत. साधारण ५ हजार वर्षांपूर्वी समुहा-समुहांमध्ये न दिसणारी एक भिंत उभी राहिली, ज्या भिंतीला अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी दरवाजा नव्हता. अन्ा् जातीव्यवस्था रुढ होत गेली. सुरुवातीला व्यवसायावर आधारीत जातीचे नंतर ‘मनु’कृपेमुळे ‘जन्म’जातीत रुपांतर झाले. मुळात जातीची उपजच मनुच्या डोक्यातून झाली आिण टप्प्याटप्प्याने कनिष्ठ गणल्या गेलेल्या जातींवर अस्पृश्यता लादण्यात आली. त्यामुळे विश्िाष्ट्य वर्गाला नेहमीच गुलामगिरीची वागणूक मिळाली. सुरुवातीला होणारे रोटी-बेटी व्यवहारही बंद होत गेले आिण जातीव्यवस्थेने भयावह स्वरुप धारण केले. पेशवाईच्या काळात तर जातीव्यवस्था अत्याचाराच्या अच्युत शिखरावर पोहचली होती. परंतु, प्रत्येक गोष्टीचा अंत हा असतोच, या उक्तीप्रमाणे भारतात बि्रटीशांचे आगमन आिण समाजसुधारणाचे वारे सोबतच आले. किंबहुना ब्रिटीशांमुळे समाजसुधारकांना बळ मिळाले, असे म्हटले तरी वागवे होणार नाही. एक राजा म्हणून आपल्या प्रजेचे हित साधणे हे राजर्षी शाहूंचे कर्तव्यच होते आिण ते हे काम निष्ठेने करत असत. सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. अशातच जेव्हा स्पश्यास्पृश्याची दाहक वास्तवतेची जाणीव होताच त्यांनी दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. परंतु, त्यांच्या या निर्णयाचा त्यांच्या मर्जीतील लोकांनी विरोध केला. पण एक राजा म्हणून हुकूम न गाजवता त्यांनी आरक्षण का महत्वाचे, हे पटवून दिले. कळपात राहणाऱ्यांपैकी एक जर कमजोर असले, तर त्याला शक्ती देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज भासते. त्यासाठी त्यांनी दलितांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. शिक्षणाची सोय केली. सोबतच राहण्यासाठी हॉस्टेलचीही साेय केली. त्यांनी सुरु केलेल्या विक्टोरीया मराठा बोर्डींग स्कूल, डेक्कन रयत संस्था आदी शिक्षण संस्थेत दलित विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के आरक्षण दिले. शिवाय नोकरीमध्ये आरक्षण लागू केले. आरक्षणाची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. ज्या घराने कधी पुस्तकही पाहिले नाही, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न नको का? यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले होते. ज्यांना नोकरीची संधी मिळाली नाही, त्यांना सबळ करण्यासाठी विशेष सवलत दिली होती. संविधानानेही हेच तत्व अवंलबले. पण आता पूर्वीसारखी जाचकता राहिलेली नाही. सर्वांना समान संधी आहेत, मग आता विशेष सवलत का? याचे संधोधन करताना पुन्हा राजर्षी शाहूंच्या धोरणांचा अभ्यास करावा लागतो. आदिवासी पाडा आिण दलित वस्त्यांमधील मुलं कॉलेज जीवनात दाखल होताना इंटरनॅशनल स्कूलमधून पासआऊट होऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्यासोबत स्पर्धा करु शकतो का? तर नाही. ही बौद्धिक असमानता आहे. अर्थात सर्वांची बौदि्धक पातळी ही वेगवेगळी असते, पंरतु, हजारो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या समाजाचे जीन्सही त्याच अनुषंगाने विकसित झालेले असणार. शैक्षणिक वारसा नसल्यामुळे शिक्षणाची ओढही कमीच राहणार. याला कारणीभूत अनुवांशिक परंपरनेने चालत आलेले जीन्स आहेत. यामध्ये बदल करण्यासाठी आंतरजातीय विवाहाची संकल्पना स्वातंत्र्यपूर्व काळाताच तत्कालीन समाजसुधारकांनी मांडली होती. पण आजही ती अस्ितत्वात आलेली नाही, हे दुर्देव.  

Monday, 13 June 2016

... व्यर्था सास ना खोय

भारताला सांस्कृतिक चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. संत मंडळीही याच सांस्कृतिक चळवळीचा एक दुवा आहेत. किंबहुना त्यांनी सांस्कृतिक चळवळीला दिशा दिली. कोणताही समाज घडत असताना प्रबोधन म्हणून ‘गद्य’ एेवजी ‘पद्य’चा मोठा प्रभाव पडतो. त्यामुळेच की काय, संत परंपरेतील मंडळींचे वाङमय काव्य स्वरुपात आहे. त्यापैकीच एक संत कबीर. यांनी आपले उपदेश दोहांतून सांगितले. संत तुकारामांनी जसे भंग न पावणाऱ्या ‘अभंगा’तून तत्कालीन समाजव्यवस्थेवर आसुड ओढले. तसे कबीरांनी ‘दोहां’तून अज्ञानाच्या चिखलात रुतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी आपले जीवन खर्ची पाडले.
‘पोथ्ाी पढपढ जग मुआ’ या दोहात त्यांनी नसत्या उठाठेव करणाऱ्यांवर टीका केली. संत कबीरांचा जन्म १५ व्या शतकातला. वास्तविक पाहता त्यांची खरी जन्मतारीख कोणती, यावरुन इतिकास अभ्यासकांमध्ये मतभेत आहेत. काहींच्या मते त्यांचा जन्म २० मे १३९९ रोजी झाला. काहींच्या मते १४४० ते १५१८ या काळात कबीरांचा जन्म. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालयाने १४ जून ही तारीख कबीर जयंती म्हणून पकडली. तर दिल्लीत २० जून रोजी कबीर जयंतीचा महासोहळाही आयोजित करण्यात आला आहे. असो, एकंदर १५ व्या शतकातील समाजव्यवस्था वर्णाश्रमावर आधारीत होती. विशिष्ट वर्गाला विशिष्ट काम होते. दर्जा होता. त्यामुळे वेद-पुराण-शास्त्रांचा अफाट (?) अभ्यास असणाऱ्यांना ‘पंडित’ म्हणून संबोधले जायचे. मग त्याचे शीलाचरण शून्य असले तरी काहीही हरकत नाही. अर्थात नुसतेच वाचून चालत नाही तर ती शिकवण अंगीकारावी लागते, ही बाब १५ व्या शतकात लुप्त झाली होती. शीलाचरण म्हणजे काय? हेच माहित नव्हते. अशा समाजाला सम्यक मार्गाची शिकवण देणे ही कबीरांसामोर मोठे आव्हान होते. एकतर सूर लागत नाही, त्यात चुकीचा ‘सा’ म्हटल्यावर गाणे बेसुरच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ; मात्र ‘सरगम’च माहिती नसणाऱ्यांना ती कशी शिकवायची हा पेच कबीरांसामोर होता. पण त्यातून त्यांनी मध्यम मार्ग काढत जे चुकीचे आहे ते पटवून देऊन योग्य काय याची ओळख करून िदली. एकंदर समाजव्यवस्थेची घडी मोडण्याचे काम कबीरांनी केले. हा तत्कालीन समाजव्यवस्थेवर मोठा आघात होता. संत मंडळींना बंडखोर म्हणतात, हे त्यामुळेच कदाचित. प्रेम अर्थात्ा मैत्री करण्याची शिकवण त्यांनी दिली. पण मैत्री कधी केली जाऊ शकते? जेव्हा आचरण शुध्द असेल तेव्हा. मैत्री विकस्िात झाल्यानंतर करुणा, मुदिता, उपेक्षा भाव जागृत होतात आिण हे प्रत्यक्षात कसे करायचे? याचेही उत्तर त्यांनी दिले. प्रेम शिकण्यासाठी श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याचा उपदेश दिला. आपल्या शरीरावर प्रकट होणाऱ्या वेदना-संवेदनांना द्वेष-आसक्ती विरहीत भावनेने पाहण्यासाठी त्यांनी श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याचा मार्ग सांिगतला. असे केल्यानेच ‘ढाई आखर प्रेम’ आस्मसात करता येईल. पण प्रेमाची बोली बोलण्यापेक्षा आपल्याकडे व्यर्थ बडबड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यात वाळूच्या कणांच्या संख्येएवढे निरर्थक वाद करणारे भेटतील. त्यामुळे कबीरांवर ‘ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर’ म्हणण्याची वेळी आली होती. अर्थात ही देखील एक शिकवणच आहे. संत मंडळींची कोणतीही वाणी फुकटची नसते. त्यामध्ये गुढ अर्थ दडलेला असतो. शतक १५ वे असो किंवा काळ आत्ताचा असो, माणसांची प्रवृत्ती सारखीच राहते. पण कर्म तसे फळ या नैसर्गिक नियमानुसार बाभळीचे झाड लावल्यानंतर काटेच येणार, हे निश्चित, आिण या जगात कुकर्म करणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्यामुळे कोणाशी जवळीकही नको आिण शत्रुत्वही नको. अर्थात आसक्ती आणि द्वेष नको, असे त्यांना सांगायचे होते. भवचक्रात अडकण्याचे हे दोन कारण आहेत. आसक्ती आिण द्वेष करणारे कधीही सुखी राहू शकत नाही आिण दुसऱ्यांनाही आंनदी जीवन जगू देत नाहीत. याचीच चिंता कबीरांनाही सतावत होती. १५ व्या शतकात ‘मोक्षमुक्ती’चा बोलबाला होता. आजही आध्यात्मिकतेची सांगड घालणाऱ्यांचे तेच ध्येय आहे. पण ही मुक्ती साधण्याच्या मार्गावर काटे पसरल्यामुळे तो मार्ग अस्पष्ट झाला आहे. त्यामुळेच कबीर म्हणतात, ‘चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच मे बाकी बचा ना कोय’. ही कबीरांची वाणी असल्यामुळे थोडी समजण्यात जड जाते. आध्यात्मिक भाषेत सांगायचे झालेच तर जीवन-मरणाचे भवचक्र आहे, त्यामध्ये प्रत्येकजण भरकटत चालला आहे. याचाच त्रास कबीरांना होत आहे. कारण ते या भवचक्रातून मुक्त झाले आहेत आिण इतराच्या मुक्तीचा मार्गही त्यांनी सांगितला आहे. ‘...ढाई आखर प्रेम’, ‘सास सास पर ध्यान...’, ‘...ना काहू से बैर’, ‘...फल लागे अति दुर’ अशा अनेक दोहांतून त्यांनी शुध्द जीवनाचा उपदेश दिला. तरीही ‘दो पाटन के बीच’ प्रत्येकजण भरडला जात आहे. भविष्य आिण भुतकाळात मन सतत भरकटत असल्यामुळे वर्तमानात जगण्याचा आनंद मिळत नाही. जे स्वत:चा श्वास पहायला शिकतात, त्यांना जीवनाची जाणीव कळते आिण वायफळ वेळ घालवत नाही. कारण, ‘ना जाने इस सास का आवन होय ना होय’ हे ते चांगल्या पध्दतीने ओखळतात. 

Thursday, 17 March 2016

संदर्भ विरहीत मालिका ‘अशोका’


 ‘मांझी-द माऊटंन मॅन’, ‘निरजा’, ‘साला खडूस’, ‘मेरी कॉम’ सारख्या वास्तववादी चित्रपटांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. नाट्यक्षेत्रातही समाजाला दिशा देण्याचा ‘प्रयोग’ यशस्वी होत आहे. परंतु, सध्या टेलिव्हीजनवरील मालिकांनी आपली पट्टी सोडली आहे. कथानकाचा पार चोता होईपर्यंत ते चिघळले जात आहे आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवरील मालिकांची तर सहिंताही राहिली नाही. कोणतेही कुठेही संदर्भ जोडून ते प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत. विशेषतः महिलांच्या. कारण मालिका निर्मार्त्यांचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग कोण असेल तर त्या महिला.
टीव्ही मालिकांमध्ये कथानकाचा अत्तापत्ताच नसतो. रेटेल तशी मालिका पुढे रेटली जाते. पाट्या टाकण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. कुठूनही काहीही घुसडवणे ही मालिकांची ‘युएसपी’आहे. आणि आजचा महिलावर्ग या मालिकांमध्ये गुरफटला जातोय. पूर्वीच्या काळी महिलांना स्वातंत्र्य नव्हते. अमानुष नियम त्यांच्यावर लादले जायचे. केरमळमधील इझावास अशी एक अस्पृश्य जमात होती. या जमातीच्या महिलांना कंबरेवरील कपडे घालणे वर्ज्य होते. अर्थात लज्जा झाकण्याचीही त्यांच्यावर बंदी होती. याला मानुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणणेही कमी पडेल. निर्दयी, क्रुर आणि लांछनास्पद प्रकार आपल्या भारतात महिलांबाबत व्हायचे. सध्या महिलांवर अत्याचार होत असल्याची ओरड आहे. दिवसेंदिवस बलात्कारच्या घटना घडत आहे. कॉंग्रेस म्हणतेय भाजपाच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले; तर भाजपा म्हणते, कॉंग्रेसच्या काळात महिलांची सुरक्षा बिकट होती. हे फक्त टोलवाटोलवीची उत्तरे झालीत. पण वास्तविक पाहता, हजारो वर्षांपासून महिलांची अब्रु लुटली जात आहे, ती आजही सुरु आहे. फरक एवढाच पडलाय की, त्यावेळी महिलांना वाचा नव्हती, ती आज आहे. महिलांना सामजिक स्वातंत्र्य मिळाले आहे, पण या सामाजिक स्वातंत्र्यांचा महिला केवळ रटाळ मालिक पाहण्यात आपला वेळी घालवत आहेत. आजकालच्या निर्मात्यांनी महिलांची नस ओळखली आहे. त्यांनी ऐतिहासिक मालिकांमध्येही ‘घोटाळा’ सुरु केला आहे.
आजकालचे निर्माते ‘ही ही मालिका त्या त्या काळातील संदर्भ, लोककथा, काल्पनीकतेची जोड देऊन बनवलेली आहे, याचा वास्तवाशी संबंध नाही’ अशी मालिका सुरु होण्यापूर्वी सूचना देऊन मोकळे होतात. मध्यंतरी अकबरची मालिका फार गाजली होती. महिलांनी ही मालिका अक्षरशः डोक्यावर घेतली होती; ती यासाठी नव्हे की यातून अकबरचा इतिहास उलगडेल, उलटपक्षी बहुतांशी महिलांना या मालिकेली ‘सलीम’वर प्रेम जडले होते. पण कथानकात तारतम्य नसल्यामुळे ही मालिका फार काळ तग धरू शकली नाही. आता ही बाब कलर्स टीव्हीवरील सम्राट अशोकाच्या मालिकेबाबत सांगता येईल. सम्राट अशोकाने फक्त भारतावरच नव्हे तर जगावर आपली छाप सोडली. बौध्द धम्म स्विकारुन पंचशीलचा झेंडा अटकेपार रोवण्याची किमीया अशोकाने केली. पण सध्या त्याच्या नावावर सुरु असलेल्या मालिकेला कोणतेही तारतम्य उरले नाही. मुळात अशोकाबाबत इतिहासाकडे कमी माहिती उपलब्ध आहे; किंबहूना अशोकाचा इतिहास नालंदाच्या अग्नीमध्ये भस्मसातही झाला असेल. नालंदा विद्यापीठावर हल्ला केल्यानंतर भिक्षुंच्या कत्तली झाल्या, विद्यापीठ सहा महिने जळत होते, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे आता अशोकाच्या लहानपणाबाबतची माहिती तोटकीच उपलब्ध आहे. आणि कलर्स टीव्हीवरील प्रसारित होणार्‍या मालिकेच्या निर्मात्यांनी तर अशोकाचा नवा इतिहासच रचायला सुरुवात केली आहे. बिंदूसार राजा हा मुळात शुर-पराक्रमी होता, अशी वर्णने इतिहासात उल्लेखीत आहेत. पण या मालिकेमधील बिंदूसार हा इतरांच्या बुध्दीनूसार आपली मतं बनवणारा दाखवला आहे. त्यात मध्यंतरी चाणक्याचे विनाकारण घुसडवलेले पात्र न पचनी होते. सध्या हे पात्र जरी मृत असले, तरी वेळोवेळी चाणक्य होता; आणि तो अशोकाचा गुरु होता हे प्रक्षकांवर बिंबवण्याचा प्रयत्न वारंवार होताना दिसतो. मुळात अशोकाचा आणि चाणक्याचा केव्हाही संबंध आला नव्हता. अशोकाचे आजोबा, चंद्रगुप्त मोर्या यांचे ते राजकीय सल्लागार होते. अशोकाची ‘स्टोरी’ ही खरी बौध्द धम्म स्विकारल्यानंतर सुरु होते. भारताला आपल्या अधिपत्याखाली आणण्याच्या मनशाने त्याने स्वतःला युध्दात झोकून दिले. तर निर्णायक लढाई कलिंग या लोकशाहीपुरस्कृत गणतंत्र राज्यासोबत झाली. कलिंगनेही अशोकाला कडवी झुंझ दिली; पण विजय शेवटी अशोकाचा झाला आणि हाच अशोकाच्या लाइफमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा रक्तपात नको, अशी शपथ घेतल्यानंतर धम्माची कास धरली आणि प्रवास झाला तो विश्‍वशांतीचा. पण आज कलर्स मालिकेद्वारे अशोकाची प्रतिमा चुकीच्या पध्दतीने मांडण्याचा अट्टाहास होतोय. अशा अनेक मालिका आहेत, ज्या वास्तवाशी निगडीत असून काल्पनिक आहेत. तर काही काल्पनिक मालिकांच्या संहितेचा पत्ता नाही. पूर्वी जाचक अटी लादून महिलांना घरात बसवले जायचे. त्यांचे पाय दोरखंडाने बांधले जायचे. आता फक्त फरक एवढाच आहे की, या मालिकांनी त्यांच्या मनाला जेरबंद केले आहे. हा पिंजरा तोडण्याची आता गरज आहे. 

Wednesday, 9 March 2016

आश्‍चर्य... ‘अभाविप’कडून मनुस्मृती दहन

रोहितची आत्महत्या, कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप, आणि त्याही अगोदर एफटीआयमध्ये गजेंद्र चौहानच्या नियुक्तीवरुन विद्यार्थ्यांचे चिघळलेले आंदोलन यामुळे देशातील विद्यार्थी ‘असहिष्णूते’च्या वातावरणात वावरत आहेत, हे प्रकर्षाने अधोरेखीत झाले आहे. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर नैराश्येची परिसीमा गाठल्यानंतर एखादी व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होते. फक्त प्रवृत्त होते; पण प्रत्यक्षात आत्महत्या करण्याची वेळ केव्हा येते? जेव्हा परिसीमाही आपली मर्यादा ओलांडते, तेव्हा एखादा आत्महत्या करतो. ही परिसीमा ओलंडण्यास एचआरडी मंत्रालयाने रोहितला प्रवृत्त केले; आणि या सर्वांच्या मुळाशी ‘अभाविप’ ठाण मांडून बसली होती. त्यामुळे खलनायकाच्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी ‘अभाविप’चा केविलवाना प्रयत्न महिलादिनी दिसून आला.

मुळात ज्या संघटनेवर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे प्रभुत्व आहे, ती संघटना संघाच्या अजेंड्यापलिकडे जाऊन एखादे पाऊल उचलते, हे पचनी पडले नाही. महिलादिनी अखील भारतीय विद्यार्थी संघटनेने मनुस्मृतीचे ‘काही’ पाने जाळून ब्राम्हण्यवादाचा जाहिर निषेध केला. या कृतीतून नक्की त्यांना काय साध्य करायचे होते? हे मात्र अस्पष्टच राहिले. मनुस्मृतीची केवळ ४० पाने त्यांनी जाळली, म्हणजे इतर पानांवर जे काही लिहले आहे, त्याचे ते समर्थन तर करत नाहीत ना? असा प्रश्‍न येथे उपस्थित झाला आहे. सर्वप्रथम मनुस्मृतीचा उगम कोठून झाला, हे माहिती असणे गरजेचे आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी युरेशियन वैदिक आर्यांनी येथील अनार्यांवर आक्रमन केले. ज्यांनी प्रतिकार केला, त्यांच्यावर अमानुष अटी लादल्या. जातींचा टॉवर उभा केला आणि अतिशय चतुराईने टॉवरला लिफ्टच बसवली नाही. मग जो ज्या मजल्यावर जन्मला, त्याने त्याच मजल्यावर मरावे, असा हुकूमच सोडला. ज्यांनी या व्यवस्थेला प्रखरतेने विरोध केला त्यांना बिल्डींगमधून लाथा-बुक्या मारुन हाकलले. पण पुन्हा विद्रोह नको म्हणून मनुने पीडित समाजावर अतिशय घाणेरडे आणि क्रुर नियम लादले. ते नियम म्हणजेचे मनुस्मृती. या मनुस्मृतीने पीडित वर्गांवर अमानुष अत्याचार केले. या अत्याचाराचे वर्णन करायचे झाले, तर अमानुष, क्रुर सारखे शब्दही तोकडे पडतील. हजारो वर्षांपासून मनुस्मृतीने बहुजनांच्या उरावर ‘तांडव’नृत्य केले. पण जसे सुर्याच्या पहिल्या किरणाने अंधकार नाहीसा होतो, तसे प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करुन जातीव्यवस्थेलाच आव्हान दिले. तत्कालीन वेळी उच्चवर्णियांनी बाबासाहेबांच्या या कृतीचा विरोधच केला होता; पण ते न डळमळता लढले, आणि संविधानाने मनुस्मृतीला केव्हाच उन्मळून फेकून दिले. पण देशात मनुस्मृतीच्या पावलावर पाऊल टाकणारे आजही आहेत, हे कन्हैयाच्या प्रकरणावरुन दिसून आले. कन्हैयाने अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उपयोग करत देशात चाललेल्या गंभीर प्रश्‍नांवर बोट ठेवले. रोहित वेमुला हा पीएचडीचा विद्यार्थी; त्याची फॉलोशीप थांबवली; एचआरडी मंत्रालयाने त्याच्याविरोधात हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवले; मग जेव्हा सरकारच तुमच्या विरोधात उभे राहते, तेव्हा या देशातील लेकरांनी जायचे कुठे? पाकिस्तानात? आहो... ते तर सीमेवरच गोळ्या झाडतील; कारण त्यांना माहित आहे की ही मुलं भारतीय आहेत! रोहित आत्महत्या प्रकरणाची झळ जेएनयूपर्यंत पोहचली. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला देशविरोधी घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक केली; पण जेव्हा ही केस दिल्ली उच्च न्यायालयात गेली, सुनावनीवेळी न्यायालयानेच पोलिसांना फटकारले. देशद्रोहाचा अर्थ कळतो का? असाच खडा सवालच हायकोर्टाने पोलिसांना केला, आणि दुसर्‍या दिवशीच कन्हैयाची जामीनावर सुटका झाली. पण त्याच्या सुटकेने चवताळलेल्या भाजपाच्या एका युवा नेत्याने ‘कन्हैयाची जीभ कापणार्‍याला ५ लाखांचे बक्षीस’ अशी जाहिरातबाजी केली. योगायोगाने अस्पृश्यांनी संस्कृत वचन बोलले तर त्याची जीभ छाटावी, असा वटहूकुम मनुस्मृतीत उल्लेखीत आहे. म्हणजे आरएसएसची एक विंग मनुस्मृतीनूसार कन्हैयाची जीभ कापण्याचे फर्मान सोडतेय, तर दुसरी विंग महिलांबद्दल अपशब्द बाळगणार्‍या मनुस्मृतीचे दहन करतेय. हा विरोधाभास नव्हे का?  आता देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका लागल्या आहेत. आणि भाजपाला आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायाची आहे. रोहित वेमुलाची आत्महत्या, कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप या दोघांचे पडसाद या निवडणुकीच्या निकालावर उमटणार आहेत, हे संघाने चांगले ओळखले आहे. सध्या कन्हैयाचा बोलबाला आहे. देशातील विद्यार्थ्यांसह सामान्य जनताही कन्हैयाच्या बाजूने आहे. त्यामुळे बहुजन समाजाला आपल्याकडे खेचण्याची राजनीती भाजपाला करावी लागणार आहे. त्याचीच सुरुवात मंगळवारी महिलादिनी दिसून आली. ‘अभाविप’ या संघाच्या एका विंगने मनुस्मृतीला विरोध करुन आम्हीही बहुजनांना गुलामीची वागणूक देणार्‍या मनुस्मृतीचा निषेध करतो, हा दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे.

Wednesday, 2 March 2016

‘त्यांची’ पोळी भाजावी, म्हणून आम्हीच पेटवतोय ‘चूल’

‘सेक्सपिअर’ एक ‘वादळी’ नाव... हे नाव आज साहित्यक्षेत्रात अच्युत्य मानाने घेतले जाते. पंधराशेच्या शतकात त्यांनी रचलेल्या कथा आजही जीवंत आणि चालू घडामोडीशी निगडीत वाटतात. आई मुलाचे प्रेमसंबंध पण ते ‘त्या’ वेगळ्या अर्थाने मांडणारा सेक्सपिअर पंधराशेमध्ये जन्मला. एका स्त्री-पुरुषाचे नाते हे कशा पध्दतीने बदलू शकते, हे त्याने आपल्या कथांमधून वेळोवेळी मांडले; पण सेक्सपिअरच्या कथांचा वास्तवाशी संबंध लावताना भारतीयांना थोडे जड जाते. कारण ‘मुक्त’नातेसंबंध तर सोडाच, येथे महिलांना न्यायहक्कांसाठी आंदोलने उभे करावे लागत आहेत.
अगदी ‘रानटी’काळाचा अभ्यास केला असता, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मानव गुफांमध्ये वास्तव करत होता, तेव्हाही स्त्री ही प्रजनन करणारी वस्तू आणि संघ वाढवणारी मशीन म्हणून तिचा वापर होत होता. त्यावेळी महिलांचे अपहरण हे सर्रास व्हायचे. ज्याचा ‘गट’ मोठा, तो नेता...आजही थोड्याबहुत फरकाने हेच सुत्र वापरले जाते. असो, शिकार करुन उपजीविका भागवत असताना मानवाला शेतीचा शोध लागला. आता हे वेगळे सांगायला नको की, शेतीचा शोध हा एका स्त्रीने लावला. स्त्रीने शेतीचा शोध लावला आणि नव्या क्रांतीला सुरुवात झाली. शेतीचे तंत्र पुरुषांनी स्त्रीकडून शिकून घेतले; आणि पुन्हा स्त्रीला गुलाम बनवले. ही गुलामी आजही कायम आहे. केवळ गुलामीची परिभाषा बदलली आहे.
हाजीआली दर्गा आणि शनिशिंगनापूरच्या वादावरुन स्त्री गुलामी पुन्हा अधोरेखीत झाली. नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश ते शनिशिंगनापूर चौथारा दर्शन, या ७० वर्षांच्या काळात भारतीयांच्या मनात ‘रिव्हॉलूशन’ खरेच झाले का? हा संशोधनाचा विषय आहे. अस्पृशांना येथे ‘हक्क’ म्हणजे काय? ‘न्याय’ कशाला म्हणतात? हेच माहित नव्हते. पण शिवरायांनी त्यांना सन्मान दिला, मान दिला. आता ही वेगळी गोष्ट आहे की, तो सन्मान काय फार काळ टिकू शकला नाही. पेशवाई आली आणि गुलामी पुन्हा सुरु झाली. याआधीही त्यांच्या आयुष्यात सन्मानाचे काही ‘दिवस’ आले होते. उदा. बुध्दांचा काळ, सम्राट अशोकाचे शासन, ब्रुहदत्त, कृष्णा, कनिष्क असे बौध्द राजे होऊन गेले, ज्यांनी आपल्या साम्राज्यात समानता प्रस्तापित केली. पण क्रांतीनंतर प्रतिक्रांती झाल्यामुळे एक वर्ग नेहमी अन्य वर्गाच्या अधिपत्याखाली राहिला. मोगलांच्या साम्राज्यातही अस्पृश्यांची अवस्था वाईटच होती. कारण वर्णव्यवस्था अबाधित होती. पण ब्रिटीशांचे शासन आले आणि आम्हीही माणूस आहोत, याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. अन् लढा झाला तो १ जोनवारी १८१८ चा! पेशवाई संपली. पण सामाजिक समता यायला थोडा वेळ लागलाच. महात्मा जोतीराव फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली आणि त्यांचा समाजकार्याचा वारसा डॉ. बाबासाहेबांनी पुढे चालवला. त्यांनी १९३० मध्ये मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारले. काळाराम सत्याग्रह केला. तेव्हा आंदोलन झाले, हे समजू शकते, पण आता मंदिर प्रवेशासाठी भारतात आंदोलने होत आहेत, ही लज्जास्पद बाब नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक प्रश्‍नांना वाचा फोडल्या आणि सरतेशेवटी समाजव्यवस्थाच बदलून टाकली. संविधानाच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून सुरु असलेली ‘कु’व्यवस्थेला धुळ चारली. आजच्या घडीला अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. तरीही शनी चौथार्‍यासाठी महिलांना आंदोलन करावे लागत आहे. महिलांच्या मासिक धर्मावेळी त्या मंदिराबाहेर राहतात. मग ही अस्पृश्यता नव्हे का?
मुंबईतील सीएसटी फॅशन स्ट्रिटला लागूनच जैन धर्मियांसाठी एक पाणपोई आहे. येथे बिगर जैन नागरिकांना पाणी पिण्यास मज्जाव केला जातो. पूर्वी अस्पृश्यांनी सार्वजनिक पाणवठा येथून चुकून पाणी जरी प्यायले, तर त्याची खैर नसे. आता फक्त विनंतीपूर्वक नकार दिला जातो, एवढाच काय तो बदल झालेला आहे. महिला मासिक‘धर्मा’वेळी मंदिरात जाणे टाळतात. ही एकप्रकारची मानसिक गुलामी नव्हे का! महिलांना पाळी येणे ही एक नैसर्गिक बाब आहे, मग न्यूनगंड का बाळगावा? आणि त्याचा मंदिरात न येण्याचा काय संबंध? म्हणजे तुमचा देव इतका कमकूवत आहे का की त्याला एका महिलेच्या स्पर्शाने विटाळ होईल? अशूध्द होईल? मुळात दगड बाहेरचा असो वा आतला, तो कोणत्याही अर्थी शुध्द अथवा अशुध्द होऊच शकत नाही. पण आपली पोळी भाजण्यासाठी काहींनी आपला ‘तवा’ शेकायला ठेवला आहे; आणि नकळत आम्हीही त्यांची ज्या चूलीवर पोळी भाजली जात आहे, त्याला अग्नी देण्यासाठी लाकडांचा पुरवठा करत आहोत. 

Friday, 29 January 2016

दगडाच्या पायी माथा; हट्ट कशाला?

संस्कृतीच्या नावावर आज जे काही घडत आहे, ते धक्कादायक आणि चीड आणण्यासारखे आहे. गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगनापुरचा वाद ज्वालामुखीसारखा महिलांच्या मनात धगधगत आहे. त्याचा उद्रेक प्रजासत्ताकदिनी झाला. भुमाता संघटनेच्या महिलांचे आंदोलन जरी फसले, तरी त्यांच्या आंदोलनाची दखल खुद मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली, हा त्यांचा एकप्रकरे विजयच म्हणावा लागले. पण या सर्व कवायतीमुळे काय साध्य झाले? मुळात विषय हा चौथार्‍याचा नसून समानतेचा आहे. पण जी व्यवस्था ही समता नाकारते, त्याच व्यवस्थेच्या पायी माथा ठेवण्याचा कशासाठी हवाय अट्टाहास?
मंदिर कोणतेही असो, महिलांच्या प्रवेशाबाबत एक नियमावलीच मनुवाद्यांनी आखली आहे. त्या नियमावलीचे पालनही महिला तंतोतत करताना दिसतात. संस्कृतीच्या नावे हे सर्व खपतेही. पण आपली संस्कृती काय? याचा मात्र कोणालाही पत्ता नाही. जो-तो रुढी पंरपरेनुसार पायंडा पाडलेल्या चालीरितींचे आंधळे पणाने समर्थन करताना दिसत आहे. मानवाच्या आयुष्यात पुजा-अर्चा हा भाग का आणि केव्हा आला? याचे मात्र कोणीही उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. सुमारे ५ हजार किंवा त्याही वर्षांअगोदर पुजाची कन्सेंप्ट रुजली असावी. तत्कालीनवेळी आत्ताचे सारखे तथाकथीत ‘देव’ नव्हते. तेव्हा सामान्यतः निसर्गाची पुजा केली जायची. पाऊस, ऊन, वारा, श्रृतू या निसर्गाच्या संपत्तीबद्दल मानवाला ज्ञान नव्हते. साधा पाऊस पडला तरीही तो चमत्कार वाटे, अशी परिस्थिती होती. कोणी जंगलाची पुजा करे, कोणी पवर्तांची! अज्ञानामुळे जन्म घेतलेल्या या पाच हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची आजही जोपासना केली पाहिजे का? अर्थात नाही, कारण त्यावेळचे अज्ञान आज दुर झाले आहे. मग आत्ता विज्ञानाच्या युगात कशाला हवेय असली संस्कृती?
गुरुवारी (२९, जाने.२०१६) पुण्यात मोहन भागवतांनीही संस्कृतीच्या नावावर मंदिरं बांधण्याच्या मुद्दाला समर्थन दिले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात भागवतांना विद्यार्थ्यांनी थेट राम मंदिर कशासाठी? त्यामुळे गरीबांना जेवन मिळेल का? हा प्रश्‍न केला. खरे म्हणजे मंदिरामुळे कोणाचे पोट चालते, हे वेगळे सांगायला नको. पण मंदिरामुळे गरीबांच्या घराची चूल पेटत नाही, हे मात्र वास्तव्य आहे. किंबहूना ज्या चुलीत अर्ध जळते विस्तव आहेत, त्यावरही पाणी फेरण्याची वेळ येते.
राम मंदिराचा मुद्दा भाजपा सरकार प्रत्येकवेळी उपस्थित करत होते; त्या आधारावर मतंही मागितली जात होती. ‘राम मंदिर वही बनायेगे’ अशा वल्गनाही काहींनी केल्या होत्या. मग आता केंद्रात सत्ता आहे ना! का नाही होत राम मंदिर? कारण मुद्दा हा राम मंदिराचा नाहीच, तर जनतेला उल्लू बनविण्याचा आहे. आज देशापूढे अनेक ज्वलंत विषय आहेत. पण संघ मंदिर, संस्कृती याच्यापलीकडे भाषा करताना दिसत नाही. एखादवेळी देशाच्या विकासाची बाब निघते, पण विकास नक्की कोणाचा? हा प्रश्‍न उपस्थित होतो.  देशापुढे आज पाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. गरीबी, बेरोजगारी, सर्वसामान्यांच्या अवाक्यात बसेल असा निवारा, शिक्षण आदी समस्या देशाला आजही भेडसावत आहेत. डॉ. आंबेडकरांनी नद्याजोड प्रकल्प राबवा, अशी मागदर्शक सूचना केली होती. ही १९५० च्या दशकातील कल्पना होती. आज २०१६ उजडले आहेत. अर्थात तंत्रज्ञान क्षेत्राने अमुलाग्र प्रगती केली आहे. पण आजही नद्याजोड प्रकल्प धुळखात पडला आहे. आज भारताला कोणत्या मंदिराची गरज नाही, ना कोणत्या ‘धर्मा’ची! अर्थात धर्म म्हणजे संप्रदायाची. देशाला संप्रदयामध्ये विभागुन टाकले आहे, त्यामुळे प्रगती खुंटली आहे.  

Friday, 25 December 2015

निर्मळ प्रेमाचा सागर ‘येशू ख्रिस्त’

निर्मळ प्रेमाचा सागर ‘येशू ख्रिस्त’
येशु ख्रिस्त म्हणजे जगाला मिळालेली ‘मैत्री’ची एक देणच आहे. त्यांच्याइतकी अपार मैत्री कोणाकडे असेल, असे बहुदा वाटत नाही. शेवटच्या क्षणपर्यंतही ते बहुजनांच्या हितासाठी, बहुजणांच्या सुखासाठी मंगलमैत्री करत होते. ज्यांनी त्यांना सुळावर चढवले, अशा निर्दयी लोकांचेही भले व्हावे, त्यांना त्यांची चुक समजावी, यासाठी प्रार्थना करत होते. पण ज्यांच्यावर ‘एव्हिल’ आरुढ झालेला असतो, जो अकुशल कर्मांमध्ये इतका बुडाला असतो, की त्याला चांगल्या-वाईटाची जाणीवच उरत नाही. पण जे सदपुरुष आहेत, ते मात्र आपल्या दृढ निश्‍चयापासून कधीच स्वतःला दुर करत नाहीत. हेच येशुंनी केले.
येशु ख्रिस्तांचा आज जन्मदिवस. बॅथेलेहेम या शहरात त्यांचा जन्म झाला; आणि पृथ्वीतलावर जणू देवच अवतरला. म्हणतात ना, अंधारानंतर सुर्योदय होणे हे क्रमप्राप्तच असते. तसेच काहीसे येशुंबाबत झाले. त्यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा रोमन साम्राज्य बहारलेले होते. ऑगस्टस हा रोम साम्राज्याचा सम्राट होता. तो आपल्या क्रुरतेसाठी प्रसिध्द होता. येशूंच्या जन्मावेळी त्याने रोमन साम्राज्याची जनजगणा करण्याचे ठरवले होते आणि सर्वांना  बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदविण्याचे फर्मान सोडले होते. त्याच वेळी येशुंची आई मेरी गर्भवती होती. त्या आपल्या पतीसह बॅथेहेहमला आल्या होत्या; पण त्यांना निवार्‍यासाठी जागा मिळाली नाही आणि उघड्यावरच येशुंचा जन्म झाला. बहुदा एखाद्या महापुरुषाने उघड्यावर जन्म घेण्याची ही दुसरी वेळ होती. येशुंच्या पूर्वी गौतम बुध्दांचाही असाच नेपाळमधील लुंबनी वनात बुध्दांचा जन्म झाला होता. त्याचप्रमाणे एका गोठ्याशेजारी मेरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तसा येशूूंचा जन्म अशा ठिकाणी होईल, हे अपेक्षित नव्हते. मात्र रोमचा सम्राट ऑगस्टसने काढलेल्या फतव्यामुळे हे घडले. येशूंच्या जन्माप्रसंगी ऑगस्टसने आपल्या साम्राज्यातील नागरिकांची गणना करण्याचा आदेश पारित केला होता. त्यानुसार सर्वांवर  बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यामुळे मेरीही आपल्या पतीसह  बॅथेलेहेमला आली होती आणि एका गोठ्याशेजारी येशुंचा जन्म झाला. ‘मैत्रीच्या सागरा’ला जन्म देणारी स्त्री कोणी साधारण नसेल, नक्कीच चारित्र्यसंपन्न असावी, पण समाजात मेरीबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. बहुदा ते निर्माण केलेही असावेत. काही म्हणतात, त्यांचा विवाह झाला नव्हता, तर त्या कुमारी माता होत्या. तर काही ग्रथांमध्ये मेरीच्या पतीचाही उल्लेख आलेला आहे. येशुंच्या जन्माला आता २ हजार १५ वर्षे झाली आहेत, त्यामुळे मेरी नक्की विवाहित होत्या; की कुमारी माता होत्या? हा संशोेधनाचा जरी विषय असला, तरी त्याचे १०० टक्के बरोबर उत्तर मिळणे आता शक्य नाही. असे म्हणतात की, मुलांमध्ये आईवडीलांचे गुण येतात. आजकाल डॉक्टरही महिलांना गर्भवती अवस्थेत आनंदी राहण्याचे सल्ले देतात. जेणेकरुन त्यांची होणारी संतान ही सदृढ आणि निर्मळ मनाची निघावी, हा त्यामागचा हेतू असतो. जर हाच नियम येथे लागू केला, तर येशुंच्या आई किती चारित्र्यसंपन्न असतील, याचा आपण विचारही करु शकत नाही. कारण त्यांनी एका अशा पुत्राला जन्म दिला आहे, ज्याच्या अनुयायांची संख्या आज कोटींच्या घरात आहे.
येशुंच्या बाल्यावस्थेबाबत जास्त काही माहिती इतिहासात उपलब्ध नाही, एक मेंढपाळ म्हणून त्यांची ओळख होती. पण हा असा मेंढपाळ निघाला की, त्याने सर्वांना मैत्री करायला शिकवले, प्रेम द्यायला शिकवले आणि स्त्रीयांनाही सन्मानाने वागणूक द्या, याची शिकवण दिली. त्यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा उल्लेख येथे करावासा वाटतो. एकेवेळी गावातील सर्व मंडळी एका स्त्रीला बांधून दगडाने मारत होते. ग्रामस्थांच्या या कृत्याबाबत येशुंनी सर्वांना विचारले असता ग्रामस्थांनी, ‘ही स्त्री चरित्र्यहिन आहे, पापी आहे’, असे उत्तर दिले. आता येथे एक प्रश्‍न उपस्थित होतो, तो म्हणजे, जर का ती स्त्री खरोखरच चरित्र्यहिन असावी, तर मग काय तिच्यासोबत ज्या पुरुषांचे संबंध आले, ते धुतल्या तांदळासारखे होते का? मग फक्त स्त्रीयांनाच हा दोष का? असा प्रश्‍न पडतो आणि कदाचित हीच भावना येशूंच्या मनाला शिवली असावी. त्यांनीही वेळ न दवडता, ‘जो कोणी पाणी नसेल, ज्यांने कधीही आयुष्यात कोणतीही वाईट कृत्य केले नसेल, त्यांनीच या स्त्रीला दंड द्यावा’, येशूंच्या या वाक्याने लगेचच सर्वांच्याच हातातून दगडे खाली पडलीत. कोणाचेही दोष दाखवताना आपण निर्दोष आहोत का? याचे स्वतः आत्मपरिक्षण करण्याचा धडाच त्यांनी सर्वांना शिकवला. त्यांचा हा धडा आजही जसाच्या तसा लागु पडतो. कारण आजही प्रत्येकजण स्वतःमधील दोष दुर करण्यापेक्षा दुसर्‍यांच्या चुका शोधण्यात धन्यता मानतात. ख्रिचन बांधवांमध्ये वाईन आणि ब्रेडला अनन्यसाधारण महत्व आहे. येशुंनी शेवटचे जेवण म्हणून वाईन आणि ब्रेड ग्रहण केले होते, अशी धारणा आहे. त्यामुळे कोणत्याही मंगलप्रसंगी ख्रिचन बांधव वाईन आणि ब्रेडचा आस्वाद जरुर घेतात.  जेणेकरुन त्यांचे गुण आमच्यातही उतरलीत. त्यांची दया-मैत्रीची क्षमता आम्हालाही प्राप्त होईल, हा त्यामागचा सुप्त हेतू असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार पसरविण्याचे काम ‘त्या’ ४० अनुयायांनी केले. पण आज खरंच येशुंचा अनुयायी त्यांचे विचार अंगीकृत करतो का? हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आणि यंदाच्या ख्रिसमसला येशु ख्रिस्तांमधील असलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा या भावाना आपल्याही अंगी उतराव्यात, याचा संकल्प करावा, म्हणजे खर्‍या अर्थाने मेरी ख्रिसमस साजरा होईल.

Monday, 21 December 2015

अमानुष अत्याचाराचा वचपा!

मानवाच्या उत्क्रांतीनंतर स्थलांतर हा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा राहिला आहे आणि भारत हा मानवी वस्ती वाढीसाठी पोषक भुखंड असल्यामुळे भारतात स्थालांतरासाठी अनेकांनी अनुकुलता दर्शवली. साधारण पाच हजार वर्षांपूर्वी युरेशियन येथील रानटी टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले. रानटी युरेशियन टोळ्या आणि येथील स्थानिक नागवंशी यांच्यात संघर्ष झाला आणि जो शेवटपर्यंत या युरेशियन लोकांचा विरोध करत होता, त्यांना या उर्मट लोकांनी शुद्र म्हणून हिनवून अस्पृश्यतेची वागणूक दिली. या अस्पृश्यतेचा उद्रेक झाल्यानंतर जन्म झाला एक अशा इतिहासाचा जो येथील तथाकथित इतिहासकारांनी नेहमीच अंधारात ठेवला.
भारताचा इतिहास हा तथाकथीत उच्च वर्णिय आणि अस्पश्य यांच्यामधील संघर्ष असून दुसरे काही नाही. पण हा संघर्ष कधीच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात उतरला नाही. जातीव्यवस्था ही भारताच्या विकासाला लागलेली मोठी किड आहे. गौतम बुध्द म्हणतात, दुःख संपवायचे असेल तर त्या दुःख उत्पन्न होणार्‍या कारणाच्या मुळाशी गेले पाहिजे. पण भारतात जातीव्यवस्था कशी फोफावली, याचा नेमका इतिहास सापडत नाही. किंबहुना कर्मदरिद्ˆय लोकांनी हा इतिहास लिहून ठेवण्याची मेहनत घेतली नाही. सहाजिकच हे काम तत्कालीन वेळी ज्यांना लिहण्या-वाचण्याचा हक्क होता, त्यांचे होते. पण आपले बिंग फुटेल, या भितीने यांनी इतिहास दडविण्याची खबरदारी नेमकी घेतली. सम्राट अशोकाचा नातू ब्रहदत्त यांच्या हत्येनंतर भारतात जातीवादाने आपली मुळे घट्ट रोवली. बौध्द धम्माचा र्‍हास करण्यासाठी भिक्खुंचे मुंडके कापणार्‍यास पारितोषिके देण्यात येत असत. शुद्रांकडून शिक्षणाचा हक्क काढून घेतला. त्यांना गावाच्या वेशीबाहेर हकलण्यात आले. गुलामीचे जिने जगण्यास भाग पाडले आणि हजारो वर्षांच्या गुलामीचा उद्रेक पेशवाईच्या शेवटाने झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महारा-मागांना मानाचा दर्जा मिळाला होता. महाराजांच्या मावळ्यांमध्ये धनगर, माग, महार, चांभार आदींचा जास्त भरणा होता. त्यात महाराजांकडे निष्ठावंत मुस्लीमही होते. त्यामुळे कोणी राजेंच्या नावावर हिंदुत्वाचा पुरस्कार करत असतील, तर त्यांनी इतिहासातून थोडे धडे घेतले पाहिजेत.
शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविण्यासाठी पोर्तुगिज, ब्रिटीश तडफडत होते; पण राजांच्या दुरदृष्टीमुळे त्यांना ते शक्य नव्हते. त्यांच्या मार्गातला मुख्य अडथळा महार होते. दरम्यान, महाराजांच्या संशयास्पद मृत्यूनंतर (हत्या) महाराष्ट्रात पेशवाईचा जन्म झाला. या पेशवाईला बळ देण्याचे कामही महारांनीच केलेे. प्राचीन काळी महारांना महा+अरी संबोधले जायचे. अरी म्हणजे शत्रू, शत्रुंचा संहार करण्यात तरबेज अशी महाअरी जमात होती. पण नंतर त्याचे अपभ्रश होऊन महार झाले. मुगल आणि ब्रिटीशांच्या फौजेला सीमेवर रोखण्याचे अतुलनीय कार्य महार पार पाडत होते. त्यामुळे तर पेशवाई अबाधित राहिली होती. खर्ड्याच्या लढ्यात सिदनाकच्या नेतृत्वाखाली महार सैनिकांनी पेशव्यांना विजय मिळवून दिला होता. पण या विजयानंतर माधवराव पेशव्याचा उन्मात इतका वाढला की त्याने रणांगनावरच महारांचा अपमान केला. जेव्हा आपले बस्तान बसले, तेव्हा शिंपल्यातील मोती काढून शिंपल्याला केराची टोपली दाखवावी, असे माधवराव पेशव्याने महारांना वेगळे केले. फक्त वेगळेच केल नाही महारांवर अमानुष अत्याचारही केला. मानुसकीला काळीमा; अशी क्रुर वागणूक दिली. पेशवाईने महारांवर किती अत्याचार केले आहेत, याची गणना केली तर संख्या कमी पडायची. पाच हजार वर्षांच्या काळात इतकी क्रुर वागणुक कोणी दिली नव्हती, तेवढी पेशवाईच्या काळात महारांना सहन करावी लागली.  हे पेशवे इतके निष्ठुर आणि क्रुर होते की, ते महारांच्या शिराचा बॉल करुन तलवारीला हॉकीची स्टीक समजून खेळत असत. शनिवारवाड्यात हा खेळ रंजकपणे पाहिलाही जात असे.  गळ्यात मडके, पाठीला झाडू, कंबरेला घंटी, हाता-पायात काळा दोरा ही महारांची ओळख. दुपारी १२ ते ३ या वेळेतच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा; अन्यथा कोणावर या महारांची सावली पडले, तर अनर्थ होई.  त्यांना गावाबाहेर गुरे-ढोरे ओढण्याची, संदेश वाहकाची कामे दिली जात. उष्ट्यांवर पोट भरावे, हा दंडकच!  आणि या अमानुष अत्याचाराचा बदला ‘त्या’ ५०० शुरवीर महारांनी घेतला. तो म्हणजे पेशवाई संपवून. सुमारे २५ हजार पेशवा सैनिकांना केवळ ५०० महार सैनिकांनी चारिमुंड्या चित केले.
(क्रमश)

Wednesday, 16 December 2015

नाक दाबून बुक्का मारण्याची गरज

हातावर जळता कोळसा ठेवला, तर त्याचा परिणाम काय होईल, हे वेगळे सांगायला नको. हात जळल्याशिवाय राहणार नाही. याचीच पुनरावृत्ती भारत करत तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाबरोबर मैत्रीपुर्ण संबंध विकसित करण्याच्या मुद्याला आज दुजोरा दिला. पण आपल्या सैनिकांची तिरडी खांद्यावर घेऊन कोणी कसे बरे त्यांच्याशी मैत्री करु शकेल. का आपण इतिहासातून काहीच धडे घेत नाही?
मैत्री प्रस्तापित करणारा देश म्हणून जगाच्या पाठिवर भारताची ओळख आहे. म्हणून काय कोणीही यावं आणि टिकली मारुन जावं, इतकी बिकट अवस्था आमच्यावर आली आहे का? जेव्हा ‘चीन’ची ठेस लागली, तेव्हाच आपण शहाणे होणे गरजेचे होते. तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी चीन बरोबर शांततेचा ‘पंचशील’ करार केला होता. मात्र या कराराचे उल्लंघन करीत चीनच्या सैनिकांनी सीमेवर हल्लाबोल केला. चीनने अनपेक्षित लादलेल्या या युध्दाचा सामना भारताच्या सैनिकांना करावा लागला; आणि शिखस्तही खावी लागली. याच युध्दाची परिणीती म्हणून आजही आपला काही भु-प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. खरे म्हणजे तेव्हा भारत युध्दासाठी तयारच नव्हता. स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताला युध्दाचा सामना करावा लागला. १९४७ ते ४८ दरम्यान काश्मिर मुद्दावरुन भारत-पाक युध्द झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंतर्गत वादाची घडी व्यवस्थित करण्यात सरकार व्यस्थ असताना युध्दामुळे पुन्हा आर्थिक बोजा भारताला सहन करावा लागला. त्यानंतर १९६५, १९७१ च्या युध्दाची भर पडली. याचा विपरित परिणाम आपल्या पंचवार्षिक योजनांवरही झाला. एकंदर विकास खुंटला. आता वर्तमानातही आपण दहशतवादचा सामना करण्यात आपला वेळ खर्ची घालत आहोत.
पाकिस्तान हा आपला कट्टर शत्रु आहे, हे जगजाहीर आहे. पाकने जगाच्या पाठिवर आपली प्रतिमा अबाधीत राखण्यासाठी दहशतवादाला जन्म घातला.  मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट ही त्याची सुरुवात होती. कधी काळी दहशतवादाने फक्त भारताला पोखरले होते, तेव्हा इतर राष्ट्रांनी दहशतवाद बोकळू दिला, आणि आता तो त्यांच्याही उरावर बसू पाहतो आहे, याची जाणीव होताच आता जगभरातील देश दहशतवाद संपविण्यासाठी एकवटले आहेत. दहशतवादाचा उदय ज्या देशातून झाला त्या पाकलाही आता पेरलीली ‘बाभळ’ टोचत आहे. त्यामुळे आता भारताच्या दहशतवादावर चर्चा करण्याच्या प्रस्तावाला तिकडून हिरवा कंदिल मिळतोय. काही महिन्यांपूर्वी दहशतवादावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांकडील राष्ट्रीय सुरक्षा संलागार यांच्यात चर्चा होणार होती. मात्र काश्मिर मुद्दा उपस्थित करत पाकने या चर्चेत  खो घातला; परिणामी नियोजित चर्चेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. खतपाणी घातलेल्या पाकचा आदर्श घेत आता नवी दहशतवादी संघटना उदयास आली आहे. आयसिसने सिरीयात दहशत माजवली आहे. युरोपिय देशांवर आक्रमण होत आहे. अलीकडेच पॅरिसवर मुंबई २६/११ सारखा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर फ्रान्सने दहशवाद्याला ठेचून काढण्याची मोहिम आखली असून इसिसच्या तळांवर क्षेपणास्त्रेही डागली आहेत. आणि दुसरीकडे दहशतवाद मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढणार्‍या पाकनेही आता मान मुरडत चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली आहे. अलीकडेच उफा आणि पॅरिसमध्ये शरिफ आणि मोदींची चर्चाही झाली. पण आता ही चर्चा पुढे सुरु ठेवण्यासाठी युध्द नको, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेविषयी दुमत नाही; पण युध्द नको, हे जगजाहीर करण्याची काय गरज होती. तिकडे शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे, आणि इथे आम्ही गप आहोत. हा आपला दुबळेपणा की सहनशीलता? उलटपक्षी देशाच्या परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांनी खणखाऊन सांगायला पाहिजे होते की, जर कोणी आमच्या नादी लागेल तर त्याची खैर नाही. दहशतवाद हा कळीचा मुद्दा आहेच आणि त्याला संपविणसाठी परराष्ट्रांचे सहकार्य गरजेचे आहे. मग तो पाकिस्तानही का नसो, पण सारासार विचार केला तर आपल्याला धोका हा इसिसपेक्षा लष्कर-ए-तोयबाकडून जास्त आहे आणि लष्कर-ए-तोयबाला लहानाचे मोठे पाकने केले. त्यामुळे पाकसोबत मैत्रीची भाषा नको, तर नाक दाबून बुक्का मारण्याची गरज आहे.

Sunday, 13 December 2015

‘कॉंग्रेस’ची कीड ‘कमळा’ला लागली

राज्यात पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई यासारखे ज्वलंत विषय असताना नको त्या मुद्यावर चर्चा घडवून देश चालविणारे आपला वेळ वाया घालवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा फक्त गदारोळामुळे चर्चेचा विषय बनली आहे. विरोधात राहायचे म्हणून विरोध, आणि विरोधीपक्षांच्या मुद्द्याला फारसे महत्व द्यायचे नाही, म्हणून दुर्लक्ष या दोन्ही गोष्टींशिवाय पार्लमेंटमध्ये काहीच होताना दिसत नाही. आज राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यावर मात्र ठोस निर्णय होताना दिसत नाहीत.
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचा विषय हा काही आजचा नाही, ७० च्या दशकापासून खरी त्यांची वाताहत होत आहे.  १९७५ दरम्यान राज्यात भीषण दुष्काळासारखी परिस्थिती होती. त्याचवेळी इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी जाहीर झाली, त्यामुळे जणू दुहेरी संकंटच शेतकर्‍यांवर ओढवले होते. तेव्हापासून शेतकर्‍यांमध्ये ‘कॉंग्रेस’ची कीड घुसली आहे आणि आज तिची लागण इतकी वाढली आहे की, शेतकरी बेजार झाला आहे. तत्कालीन वेळी राज्यात दुष्काळामुळे परदेशी धान्य आयात करण्याची वेळ आपल्यावर आली होती. अमेरिकेने मग हायबे्रड भारतात पाठवला. हायब्रेड म्हणजे ज्वारी सदृश्य धान्य होय. परंतु, या हायब्रेड सोबत कॉंग्रेसनेही आपली पाळेपुळे येथील जमिनीत रोवली. कॉंग्रेस अर्थात एक विषारी गवत. आज पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस गवत हे शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात अनियमित आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे बरेच नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षांत तर हे प्रमाण अधिकच वाढले आहे.
बळीराजाचे पोट हे शेतीवर अवलंबून आहे आणि भारतातील मेट्रो शहरे देखील शेतीमालावर जगत आहेत. पण इथे शेतीमध्येच काही उगवत नसेल, तर खायचे काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कडधान्यांसह डाळींचा भाव गगणाला भिडणे, हा त्याचाच एक भाग आहे. भविष्यातील धोका ओळखून जर यावर आधिक उपाययोजना केल्या असत्या तर ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली नसती. कॉंग्रेसच्या काळात शेतकर्‍यांना योग्य हामीभाव देण्याचा निर्णय होणे अपेक्षित होते. हीच मागणी तेव्हा विरोधामध्ये असलेल्या भाजपाने केली होती. आता भाजप सत्तेमध्ये आहे. एकेकाळी शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आता शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला बगल देताना दिसत आहेत.
हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. पण जेव्हा हे सत्तेत होते, तेव्हा त्यांना शेतकरी दिसले नाहीत का? बॉलीवूडचे दोन कलाकारांनी बीडसाख्या दुष्काळसदृष्य जिल्ह्यात शेतकर्‍यांना मदतीचा हात समोर केला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांनी ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी काम करण्यास सुरुवातही केली आहे. मग जर दोन कलाकार मिळून हे सर्व करु शकतात, मग ज्यांच्या हाती सत्तेची किल्ली आहे, ते का नाही हे सर्व साधू शकत? परंतु, हे सर्व करायला इच्छाशक्ती असवी लागते, बहुदा हे सत्ताधार्‍यांकडे नसावी, म्हणून आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. २००१ पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. जे यापूर्वीच्या सरकारला जमले नव्हते. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन संपेपर्यंत शेतकर्‍यांच्या पदरी काहीतरी पडेल, अशी आपण अपेक्षा बाळगूूया.